परवानाधारक पिस्तुल साफ करत असताना अनावधानाने गोळी सुटल्याने ही घटना घडली असावी असा पोलिसांचा अंदाज
लुधियाना : आम आदमी पक्षाचे लुधियाना पश्चिम येथील आमदार गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. डीएमसी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आमदार गोगी यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, आमदार गोगी काल शुक्रवारी एका कार्यक्रमात सहभागी होऊन घरी परतले होते आणि त्यांच्या खोलीत जेवण करत होते. इतक्यात बंदुकीचा आवाज आला. त्यांच्या पत्नीने खोलीत जाऊन पहिले असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अंदाजे १२ वाजता त्यांची प्राणज्योत मावळली.
घटनेची माहिती मिळताच लुधियाना आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल डीएमसी रुग्णालयात पोहोचले. यानंतर लगेचच डीसीपी शुभम अग्रवाल, एडीसीपी रमणदीप भुल्लर, एसीपी अक्षरी जैन हेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. डीएमसी इमर्जन्सी विभागात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.
याबाबत माहिती मिळताच आपचे कार्यकर्ते आणि गोगी समर्थक हॉस्पिटलमध्ये पोहोचू लागले. पोलिसांनी शनिवारी याबाबत माहिती दिली. ज्या बंदुकीतून गोळी लागून गोगी यांचा मृत्यू झाला ती २५ बोअरची होती. गोगी आपली परवानाधारक पिस्तुल साफ करत असताना अनावधानाने गोळी सुटल्याने ही घटना घडली असावी असा संशय पोलिसांनी वर्तवला आहे. गोळी उजव्या बाजूने त्यांच्या डोक्यात घुसली होती. असेही पोलिसांनी सांगितले.