अयोध्या : अयोध्येत शनिवारी (प्रतिष्ठा द्वादशी) राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सोहळा सुरू झाला, त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत पोहोचले आहेत. आज शनिवारपासून राम मंदिर परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होत आहेत, हा उत्सव पुढील तीन दिवस चालेल.
सोहळ्याची सुरुवात यजुर्वेदाच्या पठणाने झाली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सकाळी १०.३० च्या सुमारास रामललाचा अभिषेक केला. तर दुपारी १२.३० वाजता देवाची भव्य आरती पडली, त्यानंतर रामललाला ५६ पक्वानांचा भोग लावण्यात आला. या निमित्त मंदिर फुलांनी सजावण्यात आले आहे. यंदा व्हीआयपी दर्शनावर बंदी असेल.
रामजन्मभूमी परिसरात विविध ठिकाणी हा सोहळा होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात लोकगायिका मालिनी अवस्थी यांसारखे प्रसिद्ध कलाकार परफॉर्म करणार आहेत. पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल, कवीकुमार बिस्वास आदीही उपस्थित राहणार आहेत. मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात अनेक धार्मिक विधींसह रामलीलाही होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी कुबेर टिळा येथे भक्तांना संबोधित करतील.
११ ते १३ जानेवारी दरम्यान अयोध्येच्या विविध चौकात विविध राज्यांतील संगीत समूह कीर्तन करणार आहेत. पूर्वीच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेल्या देशभरातील संतांना वर्धापन दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विशेष आमंत्रण पाठवण्यात आले आहे. अशा सुमारे ७०० संतांची यादी राम मंदिर ट्रस्टने तयार केली आहे.
जगद्गुरू रामानुजाचार्य आणि स्वामी ज्ञानानंद हे तीन दिवस रामकथा सांगणार आहेत. याशिवाय लखनऊच्या सपना गोयल आणि २५० महिला या कार्यक्रमादरम्यान सुंदरकांड पठण करणार आहेत. यानंतर कुमार विश्वास आणि मालिनी अवस्थी शनिवारी मंदिराच्या आवारातील अंगद टिळा येथे सादरीकरण करतील, तर रविवारी अनुराधा पौडवाल आणि कविता पौडवाल सादरीकरण करतील. त्यानंतर संगीत आणि भक्ती कार्यक्रमांची मालिका सुरू होईल.
अंगद टिळा जागेवर जर्मन हँगर तंबू उभारण्यात आला असून, ५ हजार लोकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. या कार्यक्रमात मंडप आणि यज्ञशाळेतील शास्त्रीय सांस्कृतिक कार्यक्रम, विधी आणि दैनंदिन रामकथा प्रवचन यांचा समावेश आहे. डिसेंबरमध्ये, राम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा म्हणाले होते की, राम मंदिर संकुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे आणि त्यांना आशा आहे की ते २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यांत पूर्ण होईल.