संन्यास दीक्षा देणाऱ्या महंताची आखाड्यातून ७ वर्षांसाठी हकालपट्टी
प्रयागराज : येथिल महाकुंभ सोहळ्यात १४ वर्षांच्या वयात संन्यास घेऊन चर्चेचा विषय ठरलेल्या मुलीला अवघ्या सहा दिवसांत संन्यास मागे घ्यावा लागला तिला संन्यास दीक्षा देणारे महंत कौशल गिरी यांनी या मुलीला चुकीच्या पद्धतीने आपली शिष्या बनवल्याचे समोर आले. यामुळे श्रीपंचदशनाम जुना आखाड्यातून त्यांची ७ वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली.
जुना आखाड्याच्या नियमांनुसार, कोणत्याही अल्पवयीन व्यक्तीला संन्यासी बनवण्याची परंपरा नाही. सदर प्रकार चर्चेत आल्यानंतर श्रीपंचदशनाम जुना आखाड्याच्या श्रेष्टींनी यावर चर्चा केली व बैठकी अंती सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आला असे आखाड्याचे संरक्षक हरीगिरी महाराज म्हणाले.
माहितीनुसार या मुलीचे नाव राखी सिंह असून ती आग्रा येथील रहिवासी आहे. तिचे वडील पेठ्याचा व्यवसाय करतात. राखी आपल्या कुटुंबियांसह कुंभमध्ये आली होती. तिच्या कुटुंबीयांची जुना आखाड्याच्या संतांवर श्रद्धा आहे. येथील संतांच्या सहवासात काही दिवस घालवून पुन्हा घरी जावे असा बेत ठरवून हे चार जणांचे कुटुंबीय येथे आले होते. दरम्यान येथील नागा साधू आणि एकंदरीत वातावरण पाहून १४ वर्षांच्या राखीने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. पालकांसोबत पुन्हा घरी जाण्यासही तिने नकार दिला.
हा निर्णय पाहून आईवडिलांना जबर धक्का बसला. त्यांनी तिचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला पण राखी बधली नाही. तेव्हा वडिलांनी ही बाब महंत कौशल गिरी यांच्या कानी घातली. महंतांनी राखीला संन्यास दीक्षा देण्याबाबत सांगितले. तेव्हा आई-वडिलांनी राखीला जुना आखाड्याच्या महंत कौशलगिरींना दान दिले. पुण्यप्राप्तीसाठी आम्ही कौशल गिरी यांच्या आश्रयाला आलो होतो. आता आपली मुलगी संन्यास घेऊन धर्मप्रसाराच्या मार्गाला लागली आहे. यामुळे तिच्या इच्छेनुसार त्यांनी गुरुपरंपरेनुसार कन्यादान केले असे तिची आई म्हणाली
ठरल्यानुसार संगम घाटावर राखीला प्रथम संगम स्नान घालण्यात आले. तिला संन्यास दीक्षा देत तिचे नाव बदलून गौरी गिरी महाराणी असे ठेवण्यात आले. १९ जानेवारीला महाकुंभात तिचे पिंडदान केले जाणार होते. संन्यास घेतल्यानंतर स्वतःच स्वतःचे पिंडदान देण्याची परंपरा आहे. महामंडलेश्वर महंत कौशल गिरी यांनी राखीचे पिंडदान करण्याची तयारीही केली होती, मात्र त्याआधीच आखाडा सभेने ही कारवाई केली.