सरडा, मांजराला शिकारी कुत्र्यांसमोर टाकायचा . इंफ्लूएन्सरला अटक
जालंधर : पंजाबमध्ये इंस्टाग्रामवर लाईक्स आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी एका तरुणाने मुक्या प्राण्यांवर अत्याचार करायला सुरुवात केली. त्याने शिकारी कुत्रे पाळले होते . तो मांजर आणि जंगली सरडे पकडायचा. मग तो त्यांचे मागचे पाय बांधून शिकारी कुत्र्यांसमोर फेकून देत असे. ३-४ कुत्रे मिळून या जनावरांचा फडशा पाडायचे आणि या युवकाला असुरी आनंद व्हायचा. त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करून मग तो त्यात पंजाबी गाणी जोडायचा आणि इन्स्टाग्रामवर रील म्हणून अपलोड करायचा. इंस्टाग्रामवर थिल्लर डायलॉगबाजी करायचा.
त्याची रील मुंबईतील एका प्राणीप्रेमीपर्यंत पोहोचल्यावर त्याने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर जालंधर ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून असे अनेक व्हिडिओ जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनदीप जालंधरच्या शाहकोट शहरातील मोहल्ला बागमध्ये राहतो.अटकेनंतर त्याची चौकशी केली असता, आरोपीने सांगितले की, त्याला इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध व्हायचे आहे. त्याला सोशल मीडियावर जास्तीत जास्त व्ह्यूज मिळवायचे होते. सोशल मीडियावर अशा गोष्टी क्वचितच पाहायला मिळतात, म्हणून त्याने अशा रिल्स काढायला सुरुवात केली.
हे व्हिडिओ पोलिसांना मिळालेले आहेत. एका व्हिडिओमध्ये त्याने मांजरीचे मागचे पाय बांधले आहेत. त्यानंतर तो कुत्र्यांकडे फेकतो. यानंतर कुत्रे त्याला ओढून ओरबाडून ठार करतात. याशिवाय अन्य एका व्हीडिओत तो जंगली सरडा कुत्र्यांसमोर फेकतो, त्यालाही हे फाडून मारतात. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३२५ आणि प्राणी क्रूरता कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याच्या साथीदारांचीही चौकशी करत आहेत.