खून, बलात्कार, चोऱ्या प्रकरणांचा समावेश
म्हापसा : कळंगुट पोलिसांनी गेल्या दोन महिन्यांत एकूण ३३ पैकी ३० प्रकरणांचा यशस्वी छडा लावला. यामध्ये अनिवासी भारतीय असलेले आर्नाल्डो डिसोझा (६८), दिल्लीतील पर्यटक हर्ष तन्वर (२५) व दिओदिता फर्नांडिस (६४) या तीन खून प्रकरणांचा समावेश आहे.
दि. १ जुलै ते दि. १ सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीत कळंगुट पोलीस स्थानकात तीन खून, दोन बलात्कार, तीन घरफोड्या, दोन वाहने चोरी प्रकरण, पाच पर्स-मोबाईल हिसकावण्यासह नऊ इतर चोरी, दोन फसवणूक, एक अपहरण, एक विनयभंग, एक दंडनिय विश्वासघात पाच इतर भारतीय न्याय संहिता कायदा व चार ड्रग्स असे एकूण ३३ गुन्हे नोंद झाले आहेत.
त्यातील तिन्ही खून, बलात्कार, फसवणूक, दंडनिय विश्वासघात, अपहरण, विनयभंग, इतर भा.न्या. संहिंता, ड्रग्स, तर इतर चोरीतील ९ पैकी ८ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. इतर चोरीतील मोबाईल व पर्स हिसकावून नेण्याचे ५ अशा ३० गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला आहे. गुन्ह्यांचा तपास लावणारी ही टक्केवारी ९१ टक्के आहे. तर फक्त दोन वाहन चोरी आणि इतर चोरीतील एक अशा फक्त तीन गुन्ह्यांचा अद्याप छडा लागलेला नाही. ओर्डा- कांदोळी येथे गेल्या १४ जुलै रोजी आर्नाल्डो डिसोझा या वृध्द अनिवासी भारतीय नागरिकाचा अज्ञात गुन्हेगाराने खून केला होता. लुटमारीच्या हेतून घराची कौले काढून खून केला होता.
दुसरी खूनाची घटना खोब्रावाडा बागा येथे समुद्रकिनारी घडली. हर्ष अन्वर (दिल्ली) याचा दि. १० ऑगस्ट रोजी मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर क्ऱ्याच जखमा होत्या. खुनाची तिसरी घटना २२ ऑगस्ट रोजी कळंगुट येथील बेन्सन अपार्टमेंटमध्ये घडली होती. दिओदिता फर्नाडिस हिचा खून संशयित आरोपी आखीब उर्फ अमन खलफे व निखिल राजे यांनी लुटमारीच्या हेतूने केला होता.
कांदोळी, बागा व कळंगुट परिसरात पर्स आणि मोबाईल फोन हिसकावून नेण्यासह इतर चोरीतील अट्टल चोरटा अझीझ आसिफ (कर्नाटक) याच्यासह पोलिसांनी सुरज थापा, कुंझंग तमंगड मोहम्मद इस्माईल शेख, सावन बाळू राठोड, राजा मोल्ला, या संशयितांना अटक केली होती..