ईस्ट दिल्ली संघाला विजेतेपदाचा मुकुट

दिल्ली प्रीमियर लीग : साऊथ दिल्ली उपविजेते

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
09th September 2024, 10:03 pm
ईस्ट दिल्ली संघाला विजेतेपदाचा मुकुट

नवी दिल्ली : मयांक रावतचे दमदार अर्धशतक व सिमरजीत सिंग, रौनक वाघेला यांच्या गोलंदाजीच्या जोरावर ईस्ट दिल्ली संघाने साऊथ दिल्ली संघांना ३ धावांनी पराभूत करून दिल्ली प्रीमियर लीगच्या पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले.
अरुण जेटली मैदानावर झालेल्या अंतिम लढतीमध्ये ईस्ट दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १८३ धावा केल्या.
दुसऱ्याच षटकांत १४ धावा फलकावर लागल्या असताना सलामीवीर सुजल सिंग परतला. अनुज रावतने देखील १० धावा करून तंबूचा रस्ता धरला. कर्णधार हिम्मत सिंग स्थिरावला, असे वाटत असताना, तो देखील २० धावा करून परतला. त्यामुळे ईस्ट दिल्ली संघाची अवस्था ८.५ षटकांत ३ बाद ५६ अशी झाली होती. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या मयांक रावतने चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली.
एका बाजूने सातत्याने गडी बाद होत असताना, मयांकची दुसऱ्या बाजूने फटकेबाजी सुरूच होती. मयांकने ३९ चेंडूत ७ चौकार व ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ७८ धावांची खेळी केली. त्याला हर्ष त्यागीने १२ चेंडूत १७ धावांची खेळी करताना सुरेख साथ दिली. साऊथ दिल्ली संघाकडून कुलदीप यादव व राघव सिंग यांनी प्रत्येकी २ तर दिग्वेश राठीने १ गडी बाद केला.
विजयसाठी आवश्यक असणारे १८४ धावांचे लक्ष घेऊन साऊथ दिल्लीचा संघ मैदानात उतरला. दक्षिण दिल्लीची सुरुवात खराब झाली. कर्णधार आयुष बदोनी व प्रियांश आर्य हे झटपट बाद झाल्याने दक्षिण दिल्लीची अवस्था ५.४ षटकांत ३ बाद ५५ अशी झाली होती. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या तेजस्वी दहियाने एका बाजूने किल्ला लढविण्यास सुरुवात केली.
त्याला सुमित माथूर (१८ धावा), व्हिजन पांचाळ (२५) व दिग्वेश राठी (२१) यांनी चांगली साथ दिली. तेजस्वी दहियाने ४२ चेंडूत ७ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. ईस्ट दिल्ली संघाकडून सिमरजीत सिंग, रौनक वाघेला यांनी प्रत्येकी ३ तर बागवान सिंग, मयांक रावत व हर्ष त्यागी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. ईस्ट दिल्लीच्या मयांक रावतला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रियांश, सिमरजीत सिंग यांची चमकदार कामगिरी

साऊथ दिल्लीच्या प्रियांश आर्यने १० सामन्यात ६७.५६ च्या सरासरीने ६०८ धावा करताना पहिले स्थान मिळविले. एकाच लढतीमध्ये तब्बल १९ षटकारांची बरसात करणाऱ्या आयुष बदोनीने ८ सामन्यात ५२२ धावा केल्या. याचबरोबरीने आयुष बदोनीने या स्पर्धेत तब्बल ५१ षटकारांची आतिषबाजी केली. ईस्ट दिल्ली संघाच्या सिमरजीत सिंग व पुरानी दिल्ली ६ संघाचा आयुष सिंग ठाकूर यांनी १८ गडी बाद करताना संयुक्तरित्या पहिले स्थान मिळविले. नॉर्थ दिल्लीच्या सिद्धार्थ सोलंकीने १९ धावांत ५ गडी ही सर्वोच्च कामगिरी केली.