अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला पराभूत करत पटकावले वर्षातील दुसरे ग्रॅडस्लॅम
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्व्ल स्थानी असणाऱ्या इटलीच्या जॅनिक सिनरने चालू वर्षातील दुसऱ्या ग्रॅडस्लॅम विजेतेपदावर आपले शिक्कामोर्तब केले. यूएस ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला पराभूत करताना ही कामगिरी केली.
ऑस्टेलियन ओपन व यूएस ओपन अशा दोन्ही स्पर्धा एका वर्षात जिंकणारा जिंकणारा तो चौथा खेळाडू ठरला.
येथील आर्थर अश स्टेडियमवर झालेल्या पुरुष गटाच्या अंतिम फेरीत जॅनिक सिनरने २ तास १६ मिनिटात अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला ६-३, ६-४, ७-५ असे पराभूत केले. अपेक्षेप्रमाणे इटालियन सिनरने लढतीत पहिल्यापासूनच वर्चस्व राखले. पहिला सेट सिनरने ६-३ असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देखील त्याला विशेष कष्ट घ्यावे लागले नाहीत. दुसऱ्या सेटमध्ये देखील त्याने फ्रिट्झला सहज मागे टाकले. हा सेट देखील सिनरने ६-४ असा खिशात टाकला. तिसऱ्या व अंतिम सेटमध्ये अमेरिकेच्या फ्रिट्झने पुनरागमन केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. जॅनिक सिनरने तिसरा सेट देखील ७-५ असा जिंकून स्पर्धेच्या विजेतेपदावर आपली मोहोर लावली.जॅनिक सिनरने उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये जॅक ड्रेपरला ७-५, ७(७)-६, ६-२ असे पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसऱ्या बाजूने टेलरने फ्रिट्झने त्याचाच देशबांधव असलेल्या फ्रान्सिस टियाफोचे आव्हान ४-६, ७-५, ४-६, ६-४, ६-१ असे मोडून काढताना अंतिम फेरी गाठली होती.
ऑस्ट्रेलियन ओपन, यूएस ओपन जिंकणारा चौथा खेळाडू
जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात जॅनिक सिनरने रशियाच्या डॅनील मेदवेदेवला ३-६, ३-६, ६-४, ६-४, ६-३ असे पराभूत केले होते. त्यामुळे एकाच वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन व यूएस ओपन स्पर्धा जिंकणारा तो चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी ही कामगिरी मॅट्स विलँडर, रॉजर फेडरर व नोवोक जोकोविच यांनी केली होती.
जागतिक क्रमवारीत बाराव्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला विजेतेपद मिळविण्याची चांगली संधी होती. मात्र संधीचे रूपांतर तो करू शकला नाही. त्याने ही लढत जिंकली असता, तो २००३ नंतर यूएस ओपन जिंकणारा अमेरिकेचा पहिला खेळाडू झाला आसता. फ्रिट्झ २०१६ पासून ग्रँडस्लॅम स्पर्धेत सहभागी होत असून अजून एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा तो जिंकू शकला नाही.
जॅनिक सिनरचा स्पर्धेतील प्रवास
पहिली फेरी : मॅकेन्झी मॅकडोनाल्ड
दुसरी फेरी : अलेक्स मिशेलसेन
तिसरी फेरी : ख्रिस्तोफर ओ’कॉनेल
चौथी फेरी : टॉमी पॉल
उपांत्यपूर्व फेरी : डॅनील मेदवेदेव
उपांत्य फेरी : जॅक ड्रेपर
अंतिम फेरी : टेलर फ्रिट्झ