अन्य गोष्टींकडे लक्ष वेधण्यापेक्षा म्हादई प्रकल्पाला मान्यता मिळवून द्या

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांची केंद्रीय अक्षय ऊर्जामंत्री प्रल्हाद जोशींकडे मागणी

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
09th September 2024, 04:34 pm
अन्य गोष्टींकडे लक्ष वेधण्यापेक्षा म्हादई प्रकल्पाला मान्यता मिळवून द्या

पणजी : म्हादई प्रकल्पाला मान्यता मिळवून द्या. गणेश चतुर्थीच्या काळात हात जोडून मी आपल्याला विनंती करतो, अशी मागणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय अक्षय उर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे. 'मुदा' मधील गैरव्यवहार किंवा अभिनेता दर्शन थुगुदीपा याच्या अटकेचा विषय उकरून काढण्यापेक्षा म्हादई प्रकल्पाला मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केले आहे. प्रल्हाद जोशी हे धारवाडचे खासदार आहेत.

म्हादईचे पाण्यावरून गोवा व कर्नाटक या राज्यांमध्ये गेली बरेच वर्षे वाद सुरू आहे. म्हादईचे पाणी वळवण्यास गोव्याचा विरोध आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मागच्या आठवड्यात केंद्रीय वन्यजीव मंडळाने म्हादई प्रकल्पाला मान्यता देण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण यावेळी देण्यात आले. या नंतर कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ही मागणी केली आहे. म्हादई प्रश्नावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

म्हादईच्या पात्राची पाहणी करून हरकतींवर नजर ठेवण्यासाठी केंद्र सरकाराने प्रवाह समिती स्थापन केली आहे. या समितीची ६ सप्टेंबर रोजी होणारी बैठक रद्द करण्यात आली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असले तरी कर्नाटक कडून प्रकल्प पुढे रेटण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.


हेही वाचा