कानपूरमधील कालिंदी एक्स्प्रेसमध्ये स्फोट घडवण्याचा कट उघडकीस आला आहे. येथे रेल्वे रुळावर ठेवलेल्या एलपीजी सिलेंडरला ट्रेन धडकली. यामुळे मोठा आवाज झाला, त्यानंतर चालकाने ट्रेन थांबवली. पोलिसांनी घटनास्थळावरून पेट्रोलने भरलेली बाटली, आगपेटीच्या काड्या आणि स्फोटके जप्त केली आहे.
कानपूर : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये महिनाभरात रेल्वे अपघात घडवण्याचा आणखी एक कट उघडकीस आला आहे. रविवारी रात्री ८:३० च्या सुमारास प्रयागराजहून भिवानीकडे जाणाऱ्या कालिंदी एक्स्प्रेसची रेल्वे लाईनवर ठेवलेल्या एलपीजी सिलेंडरला टक्कर झाली. दरम्यान असाच प्रकार १७ ऑगस्ट रोजी रात्री २:३० च्या सुमारास साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले होते तेव्हा देखील अशीच सामग्री तेथे सापडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ सप्टेंबर रोजी रात्री ८:३० च्या सुमारास कालिंदी एक्स्प्रेस अनवरगंज-कासगंज रेल्वे मार्गावर बराजपूर आणि बिल्हौर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या एलपीजी सिलेंडरला धडकली. लोको पायलटला ट्रॅकवर काही संशयास्पद वस्तू दिसली आणि त्यानंतर त्याने ब्रेक लावला, पण तरीही ती वस्तू ट्रेनला धडकली आणि मोठा आवाज झाला. नंतर चालकाने ट्रेन थांबवली आणि गार्ड आणि इतर लोकांना याची माहिती दिली.
या घटनेचा तपास करण्यासाठी दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या असून तपास सुरू केला आहे. एटीएसच्या कानपूर आणि लखनौ युनिट घटनास्थळी पोहोचले आणि पुरावे गोळा केले. घटनेची माहिती मिळताच अनवरगंज स्थानकाचे रेल्वे अधीक्षक, आरपीएफ आणि इतर रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी तपास केला असता, पोलिसांना झुडपात सिलिंडर, पेट्रोलची बाटली, आगपेटीच्या काड्या आणि अन्य स्फोटके असे अनेक घातक पदार्थ आढळून आले. अर्धा तास थांबवल्यानंतर गाडी येथून रवाना करण्यात आली. पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी येऊन तपास केला. सर्व संशयास्पद वस्तू तपासासाठी पाठवण्यात आल्या आहेत.
यापूर्वी १७ ऑगस्टच्या रात्री कानपूर-झाशी मार्गावरील साबरमती एक्स्प्रेसचे (१९१६८) इंजिनसह २२ डबे रुळावरून घसरले होते. ही ट्रेन वाराणसीहून अहमदाबादला जात होती. या अपघाताचीही चौकशी करण्यात येत आहे. इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि यूपी पोलिस या अपघाताची चौकशी करत आहेत. अपघाताचे पुरावे जतन करण्यात आले आहेत. या घटनेत प्रवासी किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अहमदाबादला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करत माहिती दिली.
कानपूरमध्ये यापूर्वी अनेक मोठे रेल्वे अपघात झाले आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये इंदूर-पाटणा एक्स्प्रेस कानपूर देहाटमधील पुखरायन रेल्वे स्थानकाजवळ रुळावरून घसरली, यात सुमारे १५० लोकांचा मृत्यू झाला, तर १५० हून अधिक लोक जखमी झाले. देशातील मोठ्या रेल्वे अपघातांमध्ये या अपघाताचा समावेश होतो. यानंतर २०१७ मध्ये औरैयाजवळ कैफियत एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरले, यात ७० हून अधिक प्रवासी जखमी झाले.