म्हापसा : नास्नोळा येथे एका भाजी विक्रेत्या महिलेच्या गळ्यातील २ लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी पळविले. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. ही घटना रविवारी ८ रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली. फिर्यादी गायत्री शिरोडकर (४३) या नास्नोळा येथे रवळघाडी मंदिराजवळ भाजी विकण्यासाठी बसल्या होत्या. घटनेवेळी दोघे अज्ञात संशयित दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी फिर्यादीला पाचशे रुपये दिले आणि हे पैसे मंदिरात देणगी करण्यास सांगितले.
फिर्यादीने ते पैसे आपल्या जवळील पिशवीत ठेवताना संशयितांनी तिला पैसे असेच न ठेवता आपल्या जवळील सुवर्णालंकार काढून त्यात ठेवा. यातून तुमची सुध्दा भरभराट होईल असे सांगितले. संशयिताच्या या प्रलोभनाला ती भाळली आणि तिने गळ्यातील मंगळसूत्र काढले व पिशवीत टाकले.
यावेळी संशयितांनी फिर्यादीला बोलण्यात गुंतवून ठेवले आणि पिशवी बदलली व संशयित घटनास्थळावरून निघून गेले. संशयित गेल्यानंतर फिर्यादीने पिशवी पाहिली तेव्हा त्यात ३०० रुपये आणि भेंडीची भाजी होती.आपल्याला संशयितांनी गंडविल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास म्हापसा पोलीस करीत आहेत.