सासष्टी : पर्यटकाला आणण्यासाठी गेलेल्या टॅक्सीचालकाला मारहाण

कोलवा पोलिसांत गुन्हा नोंद : संशयितांचा शोध सुरू

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
08th September 2024, 09:39 am
सासष्टी : पर्यटकाला आणण्यासाठी गेलेल्या टॅक्सीचालकाला मारहाण

मडगाव :  किनारी भागातील टॅक्सीचालक व मडगाव तसेच इतर ठिकाणाहून अॅपच्या माध्यमातून टॅक्सींतील चालकांतील वाद शमण्याचे नाव घेत नाही. आता वार्का येथील एका हॉटेलमध्ये पर्यटकाला आणण्यासाठी गेलेल्या टॅक्सीचालकाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोलवा पोलीस स्थानकात अज्ञाता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, वार्का येथील एका हॉटेलमधील पर्यटकाने ऑनलाईन गाडी बुक केलेली होती. त्यानुसार प्रवाशांना आणण्यासाठी गेलेल्या टॅक्सी चालकाला त्याठिकाणी असलेल्या अन्य एका चालकाने अडवले. गाडीचा दरवाजा उघडत नसल्याने मोठा दगड गाडीवर मारण्यासाठी उगारला. त्यानंतर चालकाला बुक्क्यांनी मारहाण केली. त्या चालकासोबत त्याचे वडिलही होते त्यांनीही टॅक्सीसमोर दुचाकी आडवी घालत गाडी अडवून ठेवली. मारहाणीनंतर टॅक्सीचालक कोलवा पोलीस स्थानकात आला. त्यावेळी मडगावातील इतर टॅक्सीचालकही पोलिस ठाण्यावर आले. संशयिताला अटक केल्याशिवाय जाणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. कोलवा पोलिसांनी सदर संशयितावर गुन्हा नोंद केलेला असून गाडीच्या क्रमांकानुसार संशयिताचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

यापूर्वी देखील मोबोर येथे टॅक्सी बुक केलेल्या पर्यटकाला आणण्यासाठी गेलेल्या चालकाला मारहाण झालेली होती. त्यावेळी मारहाण करणार्‍यावर गुन्हा नोंद झाला होता. प्रवाशांना आणण्यासाठी गेल्यावर अडवणूक व शाब्दिक वाद रोजचेच झालेले असल्याचे मडगावातील टेम्पो ट्रॅव्हलर्स, बस व टॅक्सीचालकांकडून सांगण्यात आले.  


हेही वाचा