सांतइस्तेव अपघात : अखेर 'ती' निळ्या रंगाची कार हुबळीत आढळली; दोघे ताब्यात, तपास सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th September, 01:09 am
सांतइस्तेव अपघात : अखेर 'ती' निळ्या रंगाची कार हुबळीत आढळली; दोघे ताब्यात, तपास सुरू

पणजी : गेल्या रविवारी मध्यरात्री तिसवाडी तालुक्यातील सांतइस्तेव बेटावरील आखाडा फेरी धक्क्यावर घडलेल्या दुर्घटनेने जुने गोवे पोलिसांची झोप उडवली होती. बाशुदेव भंडारी चालवत असलेल्या रेंट अ कारचा पाठलाग करणारी निळ्या रंगांची सेडान कार ओल्ड गोवा पोलिसांच्या एका पथकाने बेळगावच्या हुबळी येथे लोकेट केली. याप्रकरणी  बेळगावमधील संशयित यासिम गौस (३२) व सलमान ऊर्फ मोहम्मद गौस (२८) यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

काल शनिवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी बाशुदेव भंडारीचा भाऊ बलराम भंडारी याने जुने गोवे पोलीस स्थानकात नोंदवलेल्या फिर्यादीनुसार माशेल येथे मध्यरात्री गाडीला धक्का लागल्यामुळे एका निळ्या रंगाच्या सेडान कारने पाठलाग केल्यामुळे घाबरलेला रेंट अ कारमधील बाशुदेव मिळेल तेथून रस्ता काढत आखाडा येथील फेरी धक्क्यावर पोहोचला. दरम्यान रात्रीच्या काळोखात अंदाज न आल्याने गाडी थेट नदीच्या पात्रात गेली. यात बाशुदेव सोबत असणारी तरुणी बचावली मात्र, बाशुदेवचा अद्यापही सुगावा लागलेला नाही. किनारी पोलीस व अग्निशामक दलाचे जवान तपासकार्यात गुंतले आहेत. दरम्यान याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१(३).१२६(२)-३(५) आज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवला होता. 

याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करत  ४ शोध पथकांची स्थापना करत त्यांना विविध ठिकाणी पाठवले. बाशुदेव सोबत गाडीत असलेल्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार जीए ०७ असा क्रमांक असलेल्या 'त्या' निळ्या रंगाच्या कारचा शोध घेण्यात आला. दरम्यान काही तांत्रिक स्त्रोत, वाहतूक विभाग व स्थानिक सूत्रांच्या माध्यमातून जुने गोवे पोलिसांनी हुबळी येथे असलेल्या टोयोटा इटीयोस जीए ०७ ई ५३९५ या निळ्या रंगाच्या सेडांन कारचा माग काढला. याच बरोबर दोघा संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी पोलीस स्थानकाचे निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अॅडविन डायस पुढील तपास करत आहेत

कारबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, सदर गाडी मूळ बेळगाव येथे राहणाऱ्या एका इसमाने वास्को येथील व्यक्तीकडून कुंकळ्ळी येथून खरेदी केली होती व ती सध्या बेळगाव येथे वापरण्यात येत होती. दुर्घटना घडली त्या दिवशी यासिम गौस  (३२) व सलमान ऊर्फ मोहम्मद गौस (२८) हे दोघे सदर कार चालवत होते. ते पणजी येथे कॅसिनोत जुगार खेळून मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा बेळगावला जात होते. माशेल येथे रेंट अ कारचा धक्का या निळ्या सेडानला लागला. भीतीने बाशुदेव मिळेल तेथून वाट काढत आखाडा येथील फेरी धक्क्यावर पोहोचला. यादरम्यान वाटेत बासुदेव व यासीम यांच्यात बाचाबाची देखील झाली होती. पुढे फेरी धक्क्यावर पोहोचताच रात्रीच्या काळोखात रस्त्याचा अंदाज न आल्याने बाशुदेव याने गाडी डावीकडे वळवली व यामुळे गाडी थेट नदीपात्रात गेली.

हेही वाचा