सात वर्षीय मुलाचा जीव घेणाऱ्या पिटबुल कुत्र्याचा मृत्यू

शवचिकित्सेनंतर होणार मृत्यूचे कारण स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
03rd September 2024, 10:05 pm
सात वर्षीय मुलाचा जीव घेणाऱ्या पिटबुल कुत्र्याचा मृत्यू

म्हापसा : हणजूण येथे ७ वर्षीय मुलगा प्रभास प्रेमानंद कळंगुटकर याचा जीव घेणाऱ्या पिटबुल जातीच्या कुत्र्याचा मृत्यू झाला. शिवोली येथील ‘वेल्फेअर ऑफ अॅनिमल्स ईन गोवा’ या प्राणी कल्याण संस्थेमध्ये या कुत्र्याला ठेवण्यात आले होते. शवचिकित्सेनंतर कुत्र्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

दि. ३१ ऑगस्ट रोजी पशुसंर्वधन आणि पशुवैद्यकीय खात्याने जिल्हा प्राणी कल्याण समितीच्या सल्ल्यानुसार, या खासगी प्राणी कल्याण संस्थेकडे या कुत्र्याची रवानगी केली होती. तत्पूर्वी खात्याने आसगाव येथील ‘इंटरनॅशनल अॅनिमल रेस्क्यू गोवा’ या संस्थेकडे सदर कुत्र्याची रवानगी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा कुत्रा जास्त प्रमाणात हिंसक वृत्तीचा असल्यामुळे या संस्थेने त्याला आपल्याकडे ठेवण्यास असमर्थतता दर्शविली होती. त्यामुळे शिवोलीतील ‘वेल्फेअर ऑफ अॅनिमल्स ईन गोवा’ या संस्थेकडे त्याला देखभालीसाठी ठेवले होते.

मंगळवार, दि. ३ रोजी दुपारी या कुत्र्याचा अचानक मृत्यू झाला. त्यानंतर पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनी सदर संस्थेला भेट देऊन मृत कुत्र्याला ताब्यात घेतले. कुत्र्याची शवचिकित्सा करण्यात आली. या अहवालातून कुत्र्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, कुत्र्याच्या मालकाला पोलिसांनी अटक केल्यानंतर या पिटबुलच्या जेवणखाणाच्या वेळापत्रकात बदल झाला होता. हे कारण देखील त्याच्या मृत्यूमागे असण्याची शक्यता पशुवैद्यकीय खात्याने व्यक्त केली आहे.

प्रभासची आई ही घरकाम करते. गुरुवारी तिने मुलाला आपल्या सोबत कामावर नेले होते. हणजूण येथे आपल्या घराशेजारीच ती घरकामास गेली. तिथे असलेल्या पिटबुल कुत्र्याने या मुलावर अचानक हल्ला चढविला. यात त्याचा मृत्यू झाला होता. पीडित मुलगा खेळत असताना, हा धक्कादायक प्रकार घडला.

कुत्र्याचा मालक अब्दुल कादर ख्वाजा (रा. मुळ पर्वरी) याला हणजूण पोलिसांनी अटक केली होती. सध्या संशयित कोलवाळ कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहे.

हणजूण येथील लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या पिटबुल कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. शिवोलीतील ‘वेल्फेअर ऑफ अॅनिमल्स ईन गोवा’ या प्राणी कल्याण संस्थेकडे त्याला ठेवण्यात आले होते. शवचिकित्सेनंतर या कुत्र्याच्या मृत्यूमागचे कारण समजेल, असे पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.  


हेही वाचा