आरोग्यसंपन्न रानभाज्या

पावसाळा सुरू झाला की, निसर्ग बहरु लागतो. फुलझाडे, बुरशी, वनस्पती यासारख्या निसर्गातील विविध घटकांना अंकूर फुटतो. मासे प्रजनन करतात. याच काळात आपल्याला रानभाज्यांचे सेवन करुन त्यांच्या आरोग्यसंपन्न गुणांचा आनंद लुटता येतो.

Story: साद निसर्गाची |
25th August, 03:46 am
आरोग्यसंपन्न रानभाज्या

वनभाज्या म्हणजेच रानात उगवणाऱ्या भाज्या. या माळरानात, दगडी दुभाजकावर, शेताच्या बांधावर किंवा जंगलात (रानात) उगवतात. ह्या भाज्या कोणतीही शेती न करता किंवा निगा न राखता नैसर्गिकरित्या उगवू शकतात. रानात उगवणाऱ्या भाज्या किंवा रानभाज्या परसबागेत उगवल्या जाणाऱ्या भाज्यांपेक्षा जास्त पौष्टिक व आरोग्यदायी असतात असे म्हटल्यास वावगे ठरू नये. परसबागेतील माती व रानातील मातीच्या सुपीकतेची भिन्न पातळी हे यामागचे मुख्य कारण. बहुतेकवेळा परसबागेतील मातीची सुपीकता वाढवण्यासाठी रसायनयुक्त खताचा वापर केला जातो. हे रासायनिक खत काहीप्रमाणात मातीतून पाण्याद्वारे झाड शोषून घेते. रासायनिक खत घालून उगवलेली भाजी खाल्ल्याने हे खत नकळत आपल्या पोटात जाऊन रोगांना आमंत्रण देते. रानात उगवणाऱ्या भाज्या कोणत्याही रसायनाचा वापर न करता नैसर्गिकरित्या उगवतात. जंगलात मोठमोठी झाडे असतात. ह्या झाडांची पाने जमिनीवर गळून पडल्यानंतर कुजतात व मातीत मिसळून एकरुप होतात. ही मातीसोबत मिसळलेली पाने सेंद्रिय खताप्रमाणे काम करुन मातीची सुपीकता वाढविण्यास मदत करतात. जंगलात उगवलेली भाजी कोणत्याही रसायनाचा उपयोग न करता नैसर्गिकरित्या उगवून आल्यामुळे साहाजिकच रानभाजी शरीरासाठी परसबागेत उगवून काढलेल्या भाजीपेक्षा जास्त स्वास्थ्यकारक ठरते.

रानभाज्यामध्ये बहुउपयोगी मूलद्रव्ये व औषधी गुणधर्म असलेले घटक आढळतात. अळूच्या भाजीतून शरीराला व्हिटॅमिन-ई व मॅग्नेशियम मिळते. ही भाजी हृदयरोगाचा, कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. शेवग्याची भाजी बहुतेक सगळ्याच प्रांतात आढळून येते. मधुमेह, हृदय, संधीवात, बद्धकोष्ठता असा त्रास कमी करण्यासाठी शेवगा उपयुक्त ठरतो. अंबाडी या रानभाजीत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, लोह, झिंक असते. त्यामुळे ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच अशक्तपणा कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. गुळवेलीची भाजी अॅसिडिटीच्या त्रासापासून आराम देते, तर गुळवेलीचा रस पिल्यास पचनक्रिया सुधारते व पोट साफ राहते. शतमूली/शतावरी, शिदोडी/चिखेल, सुरळी, रानटाकळा, काथने, चंदीण, उदळ/नानभोपळी, अंबाडी, मायाळू, पांढरा तेरा, अळू, सुरण, शेवळा/मोगरीकंद, हस्तीपात, कोष्ट, भारंगी, कपाळफोडी, पांढरा कुडा/ कडु इंद्रजव, घोटवेल, मयूराशिखा, उनाडभाजी, करडू, खरमंजरी, सुरेळी, चक्रमुनीस, सुरण, पेवू, फोडशी, भारंगी ही पावसाळ्यात मिळणाऱ्या काही रानभाज्यांची नावे. 

बहुतेक वेळा भाजीला चांगली चव यावी म्हणून आपण ती जास्त शिजवतो. जास्त शिजवल्याने भाजीला जरी चांगली चव येत असली तरी असे केल्याने त्या भाज्यांमधील पोषणतत्त्वे बऱ्याच प्रमाणात कमी होतात. त्यामुळे रानभाजी ही तिच्या मूळ चवीला धक्का न लागू देता व पोषण मूल्ये कमी न करता खावी. 

३७०२ चौरस किलोमीटर जागा व्यापलेला आपला गोवा हा भौगोलिकदृष्ट्या भारतातील सगळ्यात छोटा प्रदेश. पश्चिम घाटाच्या रांगेत ओवलेला गोवा हा जरी सर्वात लहान प्रदेश असला तरी इथे राज्याच्या एका टोकाला उगवणारी रानभाजी दुसऱ्या टोकाला उगवत असेलच असे नाही. काही भाज्या फक्त विशिष्ट ठिकाणीच उगवतात. राज्याच्या पश्चिमेकडील काणकोण भागात उगवणारी 'पेवू रानभाजी' याचे उत्तम उदाहरण होय! 

आजकाल विकासाच्या कामांसाठी सहजपणे वृक्षतोड केली जाते. जंगलेच्या जंगले कापून सपाट केली जातात. रानभाज्यांविषयी जास्त माहिती नसल्याने ही झाडेही विकासकामाच्या भरीस पडतात. दुर्दैवाने, जनजागृती नसल्यामुळे आतापर्यंत कितीतरी आरोग्यदायी झाडे नामशेषही झालेली आहेत. गोव्यात दरवर्षी पावसाळ्याच्या हंगामात काही मोजक्याच संस्था, ग्रामपंचायती रानभाज्यांचे प्रदर्शन घडवून आणतात. पचांयतपातळीवर राबविण्यात येणारे अशाप्रकारचे उपक्रम रानभाज्यांविषयी जनजागृती निर्माण करण्यास व जनतेला रानभाज्यांचे महत्त्व पटवून देण्यास मदत करतात. असे उपक्रम राबविल्यामुळे त्या त्या भागांतील रानभाज्यांची ओळख पटणे सोपे जाते. यासारखे उपक्रम राज्यपातळीवरही घडवून आणले पाहिजेत. रानभाज्या महोत्सवाचे राज्यपातळीवर आयोजन झाल्यास आरोग्यसंपन्न अशा रानभाज्यांविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण होईल, जनतेला रानभाज्याचे महत्त्व पटवून देणे सोपे जाईल आणि जास्तीतजास्त लोक रानभाज्यांचे संवर्धन करण्याच्या दिशेने पाऊले उचलतील.


स्त्रिग्धरा नाईक