वायनाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी आतापासूनच कृती हवी

Story: अंतरंग |
11th August, 10:13 pm
वायनाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी आतापासूनच कृती हवी

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला पावसाचा जोर आता बऱ्याच प्रमाणात ओसरला आहे. पावसाचा जोर ओसरल्याने जनतेसह सरकारी खात्यांनाही दिलासा मिळाला आहे. सततच्या पावसामुळे गेला महिनाभर झाडे तसेच झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडत होत्या. यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना जराही उसंत घेण्यास मिळाली नाही. धावपळीमुळे अग्निशमन दलाच्या जवानांची पुरती दमछाक झाली. अग्निशमन दलाबरोबर वीज खात्याचे अभियंते व कर्मचाऱ्यांनाही मोकळा श्वास घेता आला नाही. झाडे कोसळून वीज खांब पडणे, वीज वाहिन्या तुटणे असे प्रकार घडत राहिले. उभे केलेले खांबही वाऱ्यामुळे दुसऱ्याच दिवशी कोसळण्याचे प्रकार घडलेले आहेत. सांगायचे तात्पर्य म्हणजे, पाऊस व वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच सरकारी खात्यांचीही पुरती दमछाक होते. वायनाडसारखी दुर्घटना गोव्यात घडली तर... कल्पनाच करता येत नाही.

भूकंप, वादळ, महापूर किंवा आग लागण्यासारखी दुर्घटना कोठेही व केव्हाही घडू शकते. वायनाडमध्ये दरडी कोसळून चारशेहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे केरळ राज्याला सावरण्यास बरेच दिवस लागणार आहेत. दरडी कोसळणे किती विद्ध्वंसक ठरू शकते, याचा प्रत्यय या दुर्घटनेमुळे येतो. वायनाडमध्ये दरडी कोसळून मृत्यूचे तांडव घडले, तेव्हाच गोव्यात विधानसभेचे अधिवेशन सुरू होते. गोवा विधानसभेने वायनाड घटनेबद्दल दु:ख व्यक्त करतानाच मृतांना श्रद्धांजली वाहिली. विविध विषयांवरील चर्चेच्या वेळी आमदारांनी सतर्कतेचा इशारा दिला.

गोव्यातही पाऊस फार पडतो. यावेळी तर इतर राज्यांपेक्षा गोव्यात सर्वाधिक पाऊस पडलेला आहे. आपल्या गोव्यातही दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. धारगळ, मालपे येथे राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी दरड कोसळून माती रस्त्यावर येते. दरडी कोसळण्याच्या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्ग धोकादायक बनलेला आहे. वायनाड घटनेचा बोध घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अधिवेशन संपताच आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक बोलावली. दरडी कोसळण्याच्या घटनांचा बैठकीत आढावा घेतला गेला. सत्तरीत करंझोळ, झर्मे व साट्रे येथे दरडी कोसळलेल्या आहेत. तसेच मुरगाव, पेडणे तालुक्यातही दरडी कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी अभ्यासासाठी स्थापन केलेल्या समितीने प्राथमिक अहवाल दिलेला आहे. या अहवालाचा आढावा घेतानाच धोकादायक दरडींचा शोध घेण्याचेही आपत्ती व्यवस्थापन समितीने ठरविले आहे. 

दरडी कोसळण्यामागे विविध कारणे आहेत. या कारणांचा शोध समितीने घेतलेला आहे. तरी यावर आणखी अभ्यास होण्याची गरज आहे. गोव्याचा आज झपाट्याने विकास होत आहे. जमिनींचे सपाटीकरण करून बांधकामे होत आहेत. डोंगरकापणीसारखे प्रकारही होत आहेत. यामुळे दरडी कोसळण्याचा धोका वाढलेला आहे. हा धोका टाळण्यासाठी डोंगर कापणीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवायला हवे. बेकायदा डोंगर कापणीवर कडक कारवाई व्हायला हवी. राज्यात वायनाडसारखी दुर्घटना टाळण्यासाठी आतापासूनच प्रत्यक्ष कृती करायला हवी.

- गणेश जावडेकर