गाझा येथील शाळेवर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विस्थापितांनी शाळेत आश्रय घेतला होता.
तेल अविव : गाझाच्या दराज प्रांतातील एका शाळेवर इस्रायली हवाई हल्ल्यात १०० हून अधिक पॅलेस्टिनी ठार तर डझनभर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. पॅलेस्टिनी वृत्तसंस्था वाफाहने दिलेल्या माहितीनुसार, ज्या शाळेवर हल्ला करण्यात आला ती शाळा विस्थापित नागरिकांसाठी निवारा केंद्र म्हणून वापरली जात होती.
निवारा केंद्रांवर झालेल्या हल्ल्यामुळे एकूणच शाळेच्या कॅम्पसला भीषण आग लागली असून, बचाव कार्य सुरूच असल्याचे समोर आले आहे. गुरुवारीच इस्रायली सैन्याने गाझामधील दोन शाळांवर हल्ला केल्यानंतर किमान १८ लोक ठार झाले होते. दरम्यान इस्रायली लष्कराने जारी केलेल्या निवेदनात त्यांनी हमासच्या कमांड सेंटरवर हल्ला केल्याचे सांगितले.
शनिवारी गाझा शहरातील अल-सहाबा भागातील अल-तबायिन शाळेवर हवाई हल्ल्यानंतर, इस्रायल डिफेन्स फोर्सेसने जारी केलेल्या निवेदनात हमास कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये कार्यरत हमास दहशतवाद्यांवर अचूक हल्ला केल्याचे म्हटले आहे. दरम्यान या भडकलेल्या आगीत अडकून पडलेल्या महिला आणि मुलांपर्यंत बचावकर्ते पोहोचू शकले नाहीत कारण इस्रायली अधिकाऱ्यांनी या भागात पाणीपुरवठा खंडित केला आहे, असे अल जझीराने वृत्त दिले आहे.
बातमी अपडेट होत आहे