दबावामुळे खेळाडूंना अपयश

कुठल्याच स्पर्धेत पदके केवळ प्रतिभेवरच जिंकणे शक्य नाही. ऑलिम्पिकमध्ये तर नाहीच. तुम्ही दबाव कशाप्रकारे हाताळता यावरही यश ठरलेले असते. भारतीय खेळाडू दबावामुळे चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले.

Story: संपादकीय |
09th August 2024, 11:55 pm
दबावामुळे खेळाडूंना अपयश

ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी तशी निराशाच आली. एरवी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांमध्ये ठसा उमटवणारे भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये कुठल्या दबावाखाली राहतात, त्याचा अंदाजही येत नाही. यावेळी सहभागी झालेले सगळेच खेळाडू हे सर्वोत्तम कामगिरी करणारे होते. काही प्रकारांमधील अपवाद वगळता पश्चिमी देशांतील किंवा चीन, जपानच्या खेळाडूंना टक्कर देऊ शकतात असे खेळाडू भारताकडे होते. दबावाचा सामना कसा करायचा याचे योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये केवळ निराशाच हातात आली. खेळाडूंना मोठ्या स्पर्धांसाठी केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक तयारी करण्याचीही आवश्यकता आहे, हेच या स्पर्धेतून दिसून आले. हाताशी आलेले क्षणही गेले. सर्वच बाजूंनी भारतीय खेळाडूंकडून देशवासीयांची निराशा झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये भारत कधी मजल मारेल असा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. देशात चांगले खेळाडू घडविण्यासाठी आता केंद्र सरकारनेच एखादी योजना आखण्याची गरज आहे. कारण अशा ऑलिम्पिक स्पर्धा होत राहतील, पण देशातील खेळाडूंना म्हणावे तसे यश मिळेल याची हमी देता येत नाही. त्यामुळेच खेळासाठीच्या धोरणात बदल करून खेळाडू तयार करण्यासाठी नव्याने सुरुवात करावी लागेल. टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये भारताने १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्यसह ७ पदके पटकावली होती. मात्र, यावेळी भारताला केवळ १ रौप्य व ५ कांस्यसह केवळ ६ पदकांवर समाधान मानावे लागले. आता भारताने या ऑलिम्पिकमधील निराशा मागे टाकून आगामी लॉस एंजलिस ऑलिम्पिक २०२८च्या तयारीला लागणे गरजेचे आहे. या चार वर्षांमध्ये खेळ या विषयाला जास्त महत्त्व देतानाच त्याची सुरुवातही आताच करावी लागेल.

एकंदरीत पाहता यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडू देशावासीयांची अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. पण ज्या खेळाडूंनी आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवली त्यांचेही योगदान विसरता येणार नाही किंवा वगळता येणार नाही. मनू भाकरने दोन कांस्यपदके मिळवून स्वतंत्र भारतात विक्रम केला. नीरज चोप्राने मागच्यावेळी सुवर्ण आणि यावेळी रौप्यपदक आणले. हॉकीच्या टीमने तर उत्कृष्ट कामगिरी केली. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या जोडीने कांस्य मिळवले. स्वप्नील कुसाळेने कांस्य मिळवले. अमन सेहरावतने पुरुषांच्या ५७ किलो कुस्ती प्रकारात कांस्यपदक पटकावले. विनेश फोगट कदाचित सुवर्णपदकाची मानकरीही ठरली असती, पण तिला शेवटच्या क्षणी अपात्र ठरविण्यात आले. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये एकूण ११२ भारतीयांनी १६ स्पर्धांच्या ६९ पदकांसाठी स्पर्धा केली होती. फक्त आतापर्यंत ६ पदके आली. त्यामुळे ही निराशाही मोठी आहे.

कुठल्याच स्पर्धेत पदके केवळ प्रतिभेवरच जिंकणे शक्य नाही. ऑलिम्पिकमध्ये तर नाहीच. तुम्ही दबाव कशाप्रकारे हाताळता यावरही यश ठरलेले असते. भारतीय खेळाडू दबावामुळे चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले. केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूंसाठी अनेक उपक्रम सुरू केले. ‘खेलो इंडिया’सारखा उपक्रम सध्या प्रचंड चर्चेत आहे. या उपक्रमामुळे खेळाडूंना एक निश्चित दिशा प्राप्त होत आहे. आता या खेळाडूंना दबाव कसा हाताळायचा याचे प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा दरवेळी ऑलिम्पिक कोटा जास्त मिळवूनही पदके मिळवण्यात अपयशच येईल. मनू भाकरने चांगली कामगिरी करून दोन पदके पटकावली. दुर्दैवाने तिला तिसरे मिळवता आले नाही. मनूच्या कामगिरीतून सर्वांनीच बोध घ्यावा लागेल. स्पर्धेत भारताने सहाच पदके जिंकली असली तरी प्रत्यक्षात हातातली अनेक पदके गमावली आहेत. अनेक क्रीडा प्रकारांत भारतीय खेळाडू चौथ्या क्रमांकावर येऊन अडकले. तिथे टप्पा गाठला असता तर आज पदक तक्त्यात भारताची स्थिती वेगळीच असती. २५ मीटर पिस्तूल प्रकारात मनू भाकर आपल्या तिसऱ्या कांस्यपदकापासून दूर राहिली. मीराबाई चानू वेट लिफ्टिंगमध्ये सलग दुसरे ऑलिम्पिक पदक मिळवण्यापासून चुकली. मिश्र स्किट शूटिंगमध्ये भारत चीनविरुद्ध एका गुणाच्या फरकाने मागे राहिला. बॅडमिंटनमध्ये लक्ष्य सेन, शुटिंगमध्ये अर्जुन बाबुता, तिरंदाजी अशा अनेक प्रकारांमध्ये भारत चौथ्या स्थानावर राहिला. दबाव झेलण्याचे तंत्र आत्मसात केले असते तर कदाचित स्थिती बदलली असती. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी केवळ निराशाच आहे. पूर्वीच्या तुलनेत खेळाडूंवर पैसा अधिक खर्च होत आहे. सर्व सुविधा पुरवण्यात येत आहेत. सरावासाठी चांगले प्रशिक्षक, सराव करण्यासाठी गरज असलेल्या देशांतही खेळाडूंना पाठवले जाते. पण ऑलिम्पिकसारख्य स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू आजही मागे पडताना दिसतात. निखत झरीन, मीराबाई चानू, अमित पंघाल, मनिका बत्रा या व अशा दिग्गज खेळाडूंसमोर पुढील ऑलिम्पिक खेळण्याची अजूनही संधी आहे. पुढच्या चार वर्षांत चांगले खेळाडूच तयार करण्यावर लक्ष द्यावे लागेल. अन्यथा स्थिती सुधारण्याची शक्यता नाही.