जसे एखाद्याला स्वप्नात धन सापडते. तो खुष होतो. जाग आल्यानंतर बघतो तो कुठले धन आणि कुठले काय? काही नाही! तसे अर्जुना, या वेदज्ञाचे स्वर्गसुख सर्वथा क्षणिक असते, असे तू निश्चितपणे समज.
ती नही वेदांमध्ये पारंगत होऊनही असे शेकडो यज्ञ स्वर्गसुखाची आस मनी धरून जरी केले, तरी जर ते त्यांचे फळ मला अर्पण करणार नसतील (म्हणजे अर्थातच त्या फलेच्छेमुळे स्वर्गसुखाच्या वासनेने भरून राहणार असतील) तर ते कल्पतरूखाली बसून भीक मागण्यासारखंच आहे! पुण्यवान होण्याऐवजी पापात्मा होण्यासारखेच आहे! इथपर्यंत आपण मागील लेखात आलो होतो. त्यापुढे भगवंतांच्या म्हणण्याचा अभिप्राय काय आहे, ते आता बघुया.
माझ्याशिवाय, माझ्याविना स्वर्गसुख प्राप्त होण्याचा मार्ग जरी पुण्य-पंथ असला, तरी तो मूर्खांचाच म्हणावा लागेल! तसल्या सुखाला ज्ञानी लोक "हानी" असे संबोधतात! ते "विघ्न होय" असे म्हणून त्याची उपेक्षा करतात. एऱ्हवी नरकातल्या दु:खाला पाहूनच स्वर्गात प्राप्त होणाऱ्या परिस्थितीला "सुख" असे संबोधण्यात आले की नाही? पण सत्य, नित्य-आनंदमय व निर्दोष असे जे काही असते ते माझेच रूप आहे. स्वर्ग व नरक या संकल्पना जीवाला नागवून माझ्यापासून दूर नेतात. म्हणून हे धनुर्धर अर्जुना, ते दोन्ही आडमार्ग आहेत आणि तेही चोरांचेच आहेत, हे तू निश्चित जाण. पुण्यात्मक कर्मे करून स्वर्गात जावे व पापात्मक कर्मे करून नरकात पडावे आणि मग हे किरीटी, जे करून माझ्या स्वरूपाची प्राप्ती होते ते शुद्ध पुण्य आहे, असे तू समज. जीव हा पूर्णतया माझ्यामध्येच असूनही ज्या कर्माच्या योगाने मी देव त्या जीवापासून दुरावतो, त्या कर्माला "पुण्य-कर्म" असे संबोधताच कसे येईल? तरीही लोक माझे यजन-याजन करून काय इच्छितात तर स्वर्ग-भोग, स्वर्ग-सुख!!
ज्याच्या योगे माझे स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही, असे पापरूपी पुण्य जोडून ते त्यांना हवाहवासा वाटणारा स्वर्गलोक गाठतात. जिथली राजधानी अमरावती असून सिंहासन हेच अमरत्व आहे! तिथे ऐरावतासारखे राजेशाही वाहन आहे आणि तिथली कोठारे ही नित्यनियमित अमृताने भरलेली असतात. तिथे अष्टमहासिद्धीची भांडारे असतात.
अष्टमहासिद्धी येणे प्रमाणे - १) अणिमा (शरीर अत्यंत सूक्ष्म होणे) २) महिमा (शरीर मोठे होणे) ३) लघिमा (शरीर वजनाने हलके होणे) ४) प्राप्ती (सर्व प्राण्याच्या इंद्रियांशी त्या त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या रूपाने संबंध घडणे) ५) प्राकाश्य (परलोकातील अदृश्य विषयांचेही ज्ञान होणे) ६) ईशिता (शक्तीची, मायेची व तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणी व इतरांच्या ठिकाणी असणारी प्रेरणा ताब्यात येणे) ७) वशिता (विषय भोगत असूनही त्यांच्या ठिकाणी आसक्त न होणे) आणि ८) प्राकाम्य किंवा कामावसायिता (ज्या ज्या सुखाची इच्छा करावी ते ते सुख अमर्याद प्राप्त होणे).
तिथे कामधेनूची खिल्लारे असतात. तिथे चिंतामणी रत्नांची जमीन असते आणि देवगण सेवेसाठी उभे असतात! तिथे कल्पवृक्षांचे बाग-बगीचे असतात आणि त्यात गंधर्वाचे नित्य गाणे-बजावणे चालते.
विलासिनींमध्ये तिथे रंभा व उर्वशी यांच्यासारख्या नृत्यांगना असतात (तपस्व्यांना इंद्रपद प्राप्त होऊ नये म्हणून त्यांना भुलवून तपस्येपासून परावृत्त करण्याच्या कामी इंद्राकडून रंभादिक अप्सरांची योजना होत असते. जन्मत:च तत्वज्ञानी असलेला भगवान व्यासांचा मुलगा शुकाचार्य आजन्म ब्रह्मचारी राहिला. रंभेने यास मोहित करण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता! व्यासांनी यास भागवत शिकविले व ते याने परिक्षितास सांगितले). आणि शय्यागृहात तर मूर्तिमंत कामदेव हात जोडून उभा असतो! तिथे स्वतः चंद्र अमृताचे किरण शिंपून सडा-संमार्जन करतो! आणि वायूसारखे धावणारे नोकरचाकर, दूत आज्ञेचीच वाट पहात असतात! इतकेच काय, तर बृहस्पती व त्यांच्यासारखे इतर ब्राह्मण आशीर्वाद देऊन कल्याणाची इच्छा करायला तत्पर असतात. लोकपालांच्या तोडीचे असे विख्यात सरदार/घोडेस्वार तिथे उपस्थित असतात. ओळींमध्ये देव उभे ठाकलेले असतात व इंद्राचा स्वर्गीय घोडा उच्चै:श्रवा हा त्यांच्या पुढे चालत असतो. पण जोपर्यंत गाठी पुण्यांश असतो, तोपर्यंतच हे सगळे भोगायला मिळते.
ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालम्
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति
एवं त्रयी धर्ममनुप्रपन्ना
गतागतं कामकामा लभन्ते।।२१।।
सरळ अर्थ : आणि ते त्या विशाल स्वर्गलोकाला भोगून पुण्य क्षीण झाल्यानंतर मृत्युलोकाला प्राप्त होतात. याप्रमाणे स्वर्गाचे साधनरूप तिन्ही वेदांत सांगितलेल्या सकाम कर्माला शरण गेलेले व भोगांची इच्छा करणारे पुरुष वारंवार येणे व जाणे (ही) प्राप्त करून घेतात. अर्थात् पुण्याच्या प्रभावाने स्वर्गाला जातात व पुण्य क्षीण होताच मृत्युलोकी येतात.
विस्तृत विवेचन : जसजशी त्या पुण्याची ती पुंजी संपायला लागते तसतसे इंद्रत्वाचे तेज ओसरायला लागते. मग तेच महाभाग त्याच भव्य दिव्य लोकातून मृत्युलोकात परतून येतात. गणिकेच्या भोगात रमलेल्या व्यक्तीची संपत्ती संपल्यावर जसे ती त्याला दारातही उभा करीत नाही, तसे त्या पुण्य संपलेल्या याज्ञिकांचे जीवन लज्जास्पद होते. माझे शाश्वताचे वर्म न जाणल्याने पुण्य प्राप्त करून स्वर्गाची इच्छा करते होतात! त्यायोगे त्यांचे अमरत्व वाया जाते आणि त्यामुळे शेवटी त्यांचे पुन्हा मृत्युलोकांत परतून येणे होते! जसे एखाद्याला स्वप्नात धन सापडते, तो खुष होतो. जाग आल्यानंतर बघतो तो कुठले धन आणि कुठले काय? काही नाही! तसे अर्जुना या वेदज्ञांचे स्वर्गसुख सर्वथा क्षणिक असते असे तू निश्चितपणे समज. एखादा कोणी वेदविद्येत प्रवीण झाला, पण जर त्यास माझे ज्ञान झालेले नसेल, तर तो नुसता पाखडलेला दाण्याविना कोंडा. म्हणून अर्जुना, माझ्याबद्दलच्या ज्ञानाचा लवलेश नसलेला असा फक्त वेदोक्त धर्म व्यर्थ होय! आणि जरी तुला फक्त माझेच ज्ञान प्राप्त झाले, आणि बाकी काहीच ज्ञान मिळाले नाही, तरीही तू
सुखी होशील.
(क्रमश:)
- मिलिंद कारखानीस
(लेखक राज्याचे निवृत्त उपवनपाल
असून ते विविध विषयांवर लेखन करतात.)
मो. ९४२३८८९७६३