स्पेनचा २-१ ने पराभव : गोलरक्षक श्रीजेशने घेतला विजयासह निरोप
पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले आहे. टीम इंडियाने स्पेनचा २-१ असा पराभव केला. दोन्ही गोल कर्णधार हरमनप्रीत सिंगने केले. १० गोलांसह तो या स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे.
हा ऑलिम्पिक कांस्यपदक सामना गोलरक्षक श्रीजेशचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. ऑलिम्पिकपूर्वीच त्याने निवृत्ती जाहीर केली होती. ब्रिटनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्रीजेशने ११ पेनल्टी कॉर्नर वाचवले होते. हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला, त्यातही त्याने २ शानदार बचाव केले.
भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे कांस्यपदक जिंकले आहे. टोकियोमध्ये जर्मनीला हरवून भारताने कांस्यपदक जिंकले होते.
ऑलिम्पिकमध्ये १३ वे हॉकी पदक
भारतीय संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये १३ वे पदक जिंकले आहे. संघाचे हे चौथे कांस्यपदक आहे. याआधी या संघाने ८ सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले आहे.
५२ वर्षांनंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये हॉकीचे पदक
भारताने ५२ वर्षांनंतर सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. यापूर्वी भारतीय हॉकी संघाने १९६८ आणि १९७२ मध्ये ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकली होती.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय हॉकी संघाचा अनुभवी गोलरक्षक पीआर श्रीजेश याने हॉकीला अलविदा केला. भारतीय हॉकी संघाने आज म्हणजेच गुरुवारी स्पेनचा २-१ ने पराभव केला ज्यामध्ये श्रीजेशने महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीजेशच्या उत्कृष्ट गोलकीपिंगमुळे भारतीय हॉकी संघाने सलग २ ऑलिम्पिकमध्ये २ पदके जिंकण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यापूर्वी टोकियो ऑलिम्पिकमध्ये श्रीजेशच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने जर्मनीला हरवून कांस्यपदक जिंकले होते. १९८० नंतर पहिले ऑलिम्पिक पदक जिंकण्यात भारतीय हॉकी संघाला यश आले होते.
हॉकीमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर आता पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताच्या नावावर ४ पदके आहेत. यापूर्वी भारताने नेमबाजीत ३ कांस्यपदके जिंकली होती.
श्रीजेश याची कारकीर्द
एर्नाकुलम, केरळ येथे जन्मलेल्या पीआर श्रीजेशने २००६ च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी पदार्पण केले आणि तेव्हापासून तो भारतीय गोल पोस्टची मजबूत भिंत म्हणून संघाचा एक भाग होता. श्रीजेशने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ३०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि भारतीय संघाला दोनदा आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. श्रीजेशने भारतासाठी ४ ऑलिम्पिक स्पर्धा खेळल्या आहेत. (लंडन २०१२, रिओ २०१६, टोकियो २०२० आणि पॅरिस २०२४) ज्यात त्याने दोनदा कांस्यपदक जिंकले. याशिवाय सलग दोन वर्षे एफआयएच सर्वोत्कृष्ट गोलरक्षक ठरलेल्या श्रीजेशला २०२१ मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय त्याला भारताच्या वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कारही तीनदा मिळाला. पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेत्या श्रीजेश याच्या निवृत्तीनंतर भारतीय हॉकी संघाला एका महान गोलरक्षकाची उणीव भासणार आहे. कारण या दिग्गज गोलरक्षकाची पातळी गाठणे इतर कोणत्याही खेळाडूसाठी सोपे नाही.
श्रीजेशची कामगिरी
एफआयएच सर्वोत्कृष्ट गोलकीपर: २०२०-२१
एफआयएच सर्वोत्कृष्ट गोलरक्षक: २०२१-२२
हॉकी इंडियाचा गोलकीपर ऑफ द इयर: २०१४, २०२१ आणि २०२३
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार: २०२१.
पद्मश्री पुरस्कार: २०१७
अर्जुन पुरस्कार: २०१५
हॉकी इंडिया बलबीर सिंग वरिष्ठ खेळाडूचा पुरस्कार वर्ष (पुरुष): २०१५
भारतीय हॉकी संघाची ऑलिम्पिकमध्ये कामगिरी
भारतीय पुरुष हॉकी संघाला एकूण १३ पदके मिळाली आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत १३ पदके जिंकली आहेत. ८ सुवर्ण, १ रौप्य आणि ४ कांस्य सुवर्ण: ८ (१९२८, १९३२, १९३६, १९४८, १९५२, १९५६, १९६४ आणि १९८० मध्ये) रौप्य : १ (१९६० मध्ये) कांस्य: ४ (१९६८, १९७२, २०२०, पॅरिस 2024 मध्ये)बॉक्स लिड