ज्यांनी मला जीवापाड जपले

आज तो नसला, तरी त्याच्या मदतीचे ते कर आजही आशीर्वादाच्या रुपात डोक्यावर असल्याचे जाणवू लागतात. नात्यांमध्ये मैत्रीच्या नात्यांची वीण मजबूत करण्यास माझे हे मित्र सार्थकी ठरले. आपल्या आनंदी जीवनात माझे खडतर बालपण तेही जगले.

Story: सय अंगणाची |
03rd August 2024, 02:17 am
ज्यांनी मला जीवापाड जपले

प्रत्येकाचा प्रवास हा एकट्याने सुरु होतो आणि एकट्यावरच त्याचा शेवटही. परंतु या प्रवासात अनेक जीवलग माणसं आपल्याला भेटतात. मग त्यांचा प्रवास आपल्या आयुष्यात अर्धवट असो, अथवा त्यांचा जीवन प्रवास अर्धवट असू शकतो याची काही शाश्वती देता येत नाही. आपण ज्या समाजात जन्माला येतो तेथे जातीवादाचे भेद हे असतातच. आज कालांतराने आपण सगळेच बदलतोय. जातींपेक्षा माणुसकीची नाती आपण जास्त जपतोय. समाजाचे विस्कळीत चित्र पाहिल्यानंतर अगदी पंधरा सोळा वर्षांपूर्वीचे माझ्या बालपणातील प्रसंग आठवू लागतात. ज्यावेळी जातींना जास्त महत्त्व असायचे. मी ज्या धनगर समाजात जन्माला आले ते कदाचित भाग्य असेल म्हणूनच. अनेक प्रसंगांना सामोरे जाताना अनेक जीवलग मित्र-मैत्रिणी भेटल्या. ज्यांचे प्रत्येक संकटात माझ्या अगोदर डोळे भरून यायचे.

आपण एखाद्या समाजात जन्माला येतो त्याला पाहण्याची इतरांची नजर जर वेगळी असेल तर आपल्याला त्यावेळी ते सहन‌ करणं अशक्य असतं. परंतु अशा परिस्थितीत एका लहान वयात इतरांचा विचार न करता मला आपलंच कुटुंब मानणाऱ्या मित्र-मैत्रिणी शालेय शिक्षण घेताना भेटल्या. पायातल्या चप्पला तुटल्या तर स्वतःच्या चप्पला मी नको म्हणताना घालत. 'तू चलत वैतले मुगो घाल तू माझी चप्पला' हे वाक्य आजही तुटलेल्या चप्पलाला फेविक्विक लावून बाजारात नवीन चप्पल खरेदी करताना आठवल्यावर त्या जीवलग मैत्रीची आठवण होते. प्रतीक्षा, चंदन, श्यामसुंदर ही नावे तर आयुष्यभर कायम हृदयात कोरली गेली ती कृष्णा -सुदामाच्या मैत्री सारखी. वर्गात बसण्यासाठी बाक अडवण्यापासून, ते मी शाळेत गैरहजर राहिल्यावर त्याच दिवशी शिक्षकांना घेऊन घरी येऊन विचारपूस करणाऱ्या या मंडळींचा कलांतराने सहवास कमी झाला, तरी संकटात आपण कधीही कुणाला एकटं सोडून नये ही शिकवण त्यांनी मला आयुष्यभरासाठी मैत्रीची भेट म्हणून दिली. 

माझ्या बॅगेत कधी टिफीन नावाची गोष्ट नसायची. परंतु मधल्या सुट्टीच्या वेळेत जणू माध्यान्ह आहाराचे डबे मी स्वतः पुरवल्यासारखे टिफीन माझ्यासमोर सतत असायचे. मग त्याच्यात कधीही टोमणेगिरी नसायची. आज हॉटेलमध्ये जेवताना असू दे, की साधा ब्रेकफास्ट करताना प्लेटमध्ये राहिलेल्या अन्नाला पाहताच क्षणी सेकंदात फस्त होणारे ते डबे आठवू लागतात. आजकालच्या मित्र-मैत्रिणींना मॅचिंग कपड्यात पाहिल्यावर आठवते, माझ्याजवळ पेन्सिल, खोडरबर नसला की अर्धी पेन्सिल, अर्धा खोडरबर माझ्या वहीत दिसायचा आणि मग तो  खरा आनंद, जगण्यातील सुख मात्र डोळ्यात दृष्टीस पडायचे. आपल्या मुलीएवढं आजही तेवढ्याच आपुलकीने बोलणारी प्रतीक्षाच्या आईमध्ये तर कधी मला वेगळेपण जाणवलंच नाही. आजही मला माझं बालपण त्यांच्या बोलण्यामध्ये दिसतं. “सगळं ठीक होईल. तू ही आमच्या बरोबर चांगल्या विद्यालयात ये.” म्हणणाऱ्या चंदन, प्रतीक्षाने आपल्या आईवडिलांना सांगून माझं माध्यमिक विद्यालयात अॅडमिशन आपल्यासोबत केलेलं. कदाचित त्या दोघांमुळे मला आज असंख्य चांगली माणसं आयुष्यात भेटली. याचं कारण म्हणजे मैत्रीची पारख करण्यास त्यांनीच नकळतपणे शिकवले. आपण शिक्षणाच्या किती पायऱ्या पार करू हे माहीत नाही असे सांगणारा, सतत अभ्यासाला कंटाळणारा श्यामसुंदर म्हणजे कालांतराने सगळ्यांच्या जीवनात हास्यमय वातावरण निर्माण करणारा ठरला. “वनिता मेल्या शिकपाचे सोडू नका हा. बरे शिक हा तू...” असं नेहमी मला सांगणारा. बालपणीचं गाव सोडल्यानंतर श्यामसुंदरशी जास्त भेटणं झालं नाही. कधी तरी बाजारात भेटायचा. “शिकता मुगो?” असं म्हणत स्मितहास्य करून निघायचा. 

कालांतराने मी आणि प्रतीक्षा एकत्रित राहिलो काही काळ. चंदन, श्यामसुंदर यांचा प्रवास वेगळा सुरू झाला. शिक्षणाची गोडी नसलेला श्यामसुंदर बारावीनंतर नोकरी करू लागला हे लक्षात आले. आम्ही तिघे मात्र शिक्षणाची एकएक पायरी चढत होतो. महाविद्यालयीन शिक्षण घेताना नकळत एक धक्का अनुभवला तो श्यामसुंदरचं आमच्यातून जाणं. “तुम्ही शिकोन व्हडली मनशा जातली तेन्ना म्हाका विसरो नकात हा. आनि वनिता आमच्या गावान वर्सान एकदा तरी यो हा म्हजे नाटक पळोपाक.” श्यामसुंदरचे हे शब्द कानी पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागले. रंगमंचावरचा रंगच हरवल्यासारखे वाटू लागले. ज्याची मदत अभ्यासात झाली नसली, तरी असंख्य प्रसंगांमध्ये सकारात्मक विचारांची ज्योत पेटवण्याचे कार्य तो सतत करायचा. आज तो नसला, तरी त्याच्या मदतीचे ते कर आजही आशीर्वादाच्या रुपात डोक्यावर असल्याचे जाणवू लागतात. नात्यांमध्ये मैत्रीच्या नात्यांची वीण मजबूत करण्यास माझे हे मित्र सार्थकी ठरले. आपल्या आनंदी जीवनात माझे खडतर बालपण तेही जगले.


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी.