पीडित अल्पवयीन मुलीने जबाब फिरविल्याने युवकाची निर्दोष सुटका

वैद्यकीय पुरावे नसल्याचाही फायदा : जलदगती व पोक्सो न्यायालयाचा निवाडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st August 2024, 12:19 am
पीडित अल्पवयीन मुलीने जबाब फिरविल्याने युवकाची निर्दोष सुटका

पणजी : बार्देश तालुक्यातील १६ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी वैद्यकीय पुरावे नसल्यामुळे तसेच पीडित मुलीने जबाब फिरविल्यामुळे न्यायालयाने संशयित युवकाची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. याबाबतचा निवाडा पणजी येथील जलदगती व पोक्सो न्यायालयाच्या न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.

या प्रकरणी पर्वरी पोलिसांनी १३ जून २०२३ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी आपली १६ वर्षीय मुलगी बेपत्ता असून तिचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पर्वरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीने पीडित मुलीचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान जुलै २०२३ मध्ये पीडित मुलगी शेजारच्या राज्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक सीताराम मळीक यांच्या नेतृत्वाखाली एक पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आले. पोलिसांनी शेजारच्या राज्यात जाऊन संशयिताला ताब्यात घेतले. तसेच पीडित मुलीला आणि संशयिताला गोव्यात आणले. त्यानंतर पीडित मुलीचा जबाब नोंद केला असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी संशयिताच्या विरोधात पीडित मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी संशयितांविरोधात भादंसंच्या कलम ३६३,३७६, ३५४ आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४ व १२ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी ८ जुलै २०२३ रोजी संशयित युवकाला अटक केली. याच दरम्यान पीडित मुलीने वैद्यकीय चाचणी करण्यास नकार दिला. त्यानंतर न्यायालयाने संशयित युवकाला २१ जुलै २०२३ रोजी सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर पोलिसांनी तपास पूर्ण २३ ऑगस्ट २०२३ रोजी संशयित युवकाविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन १२ फेब्रुवारी २०२४ रोजी संशयित युवकाच्या विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरू केला. दरम्यान, पीडित मुलीची न्यायालयात उलटतपासणी केली असता, मुलीने आपला जबाब फिरविला. तसेच या प्रकरणी वैद्यकीय पुरावे नसल्यामुळे न्यायालयाने संशयित युवकाची निर्दोष सुटका केली. 

हेही वाचा