क्रीडा क्षेत्रात होत असलेले बदल आणि प्रगती तसेच ‘खेलो इंडिया’मुळे देशभरातील खेळाडूंना मिळत असलेले प्रोत्साहन त्यामुळे भारतीय खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धेत आपली चांगली कामगिरी करत आहेत. पुढील अकरा बारा दिवसांमध्ये भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, रौप्य पदकांची अपेक्षा आहे.
पॅरिसमध्ये सुरू असलेला खेळाचा जागतिक महामेळावा ऑलिम्पिकमध्ये भारत पदकांच्या यादीत मागे असला तरी एकाच खेळाडूने एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्य पदके जिंकण्याचा मान मिळवून स्वतंत्र भारतात प्रथमच अशा प्रकारचा विक्रम केल्यामुळे पदकांची उणीव भरून निघाली की काय, असे वातावरण क्रीडा विश्वात आहे. बावीस वर्षीय मनू भाकरने नेमबाजीत दोन कांस्य पदके मिळवून देशात एक नवा विक्रम नोंद केला. सध्या सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत सुमारे आठ खेळाडूंनी एकापेक्षा जास्त म्हणजेच दोन पदके प्राप्त केली आहेत. साहजिकच अशा विक्रमानंतर सवयीप्रमाणे काहींनी नॉर्मन प्रिचर्डने यापूर्वी दोन पदके जिंकल्याची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात ब्रिटिश काळात १९०० साली पॅरिसमध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्येच नॉर्मन प्रिचर्डने हा विक्रम केला होता. भारतासाठी दिलेले त्यांचे योगदानही नाकारता येणार नाही. त्यामुळेच मनू भाकरचा विक्रम हा स्वतंत्र भारतातला विक्रम आहे, असे मानायला हवे. यापूर्वी काही खेळाडूंनी वेगवेगळ्या वर्षीच्या ऑलिम्पिकमध्ये मिळून एकापेक्षा जास्त पदके मिळवलेली आहेत. पण एकाच ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके मिळवण्याचा मान एकट्या मनू भाकरलाच जातो. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी ऑलिम्पिकच्या चौथ्या दिवशी दक्षिण कोरियाविरुद्ध १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजीत कांस्य पदक जिंकले. यापूर्वी मनूला एकेरी स्पर्धेत कांस्य पदक मिळाले होते. सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये भारतातील अन्य खेळाडूंना येत असलेले अपयश काहीसे निराशाजनक असताना आणि एकेक भारतीय खेळाडू मागे पडत असताना मनू भाकरने सलग दोन कांस्य पदके मिळवून देशवासीयांच्या आशा उंचावल्या. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग या दोघांच्या नावावर आतापर्यंत पदके आहेत. अन्य काही खेळांमध्ये भारतीय खेळाडूंना आतापर्यंत अपयश आले असले तरी या दोन विजयामुळे इतर खेळाडूंना हुरूप येणार आहे, हे वेगळे सांगायला नको. भारताच्या क्रीडा क्षेत्राला हा क्षण उभारी देणारा आहे. विशेष म्हणजे, मनूला अजूनही एका स्पर्धेत भाग घ्यायचा आहे.
रियोमधील ऑलिम्पिकनंतर वयाच्या १४ व्या वर्षी मनू भाकरने नेमबाजीत प्रवेश केला. पहिल्याच काही दिवसांच्या सरावानंतर तिने वडिलांना नेमबाजीसाठी वापरण्यात येणारे पिस्तूल आणण्यास सांगितले. तेव्हापासून ती नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. सराव करत आहे. टोकियोतील ऑलिम्पिक स्पर्धेत मनू बाराव्या स्थानावर होती. निराश न होता यंदा पुन्हा सहभागी झालेल्या मनूने सगळी कमतरता भरून काढली. मनूने यापूर्वी २०१८ साली मेक्सिकोत झालेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या स्पर्धेत दोन सुवर्ण पदके मिळवली होती. शांत, संयम राखून खेळणारी मनू आज दोन कांस्य पदकांची मानकरी झाल्यामुळे तिचा प्रवास सर्वांसाठीच प्रोत्साहन देणारा ठरेल.
भारताच्या काही खेळाडूंचे आव्हान ऑलिम्पिकमध्ये संपुष्टात आले आहे. पण बरेच खेळाडू पुढील काही दिवस वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये आपले भवितव्य आजमावणार आहेत. त्यामुळे अजूनही पदके भारतासाठी असतील, यात शंका नाही. गेल्या दोन ऑलिम्पिकपासून सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. भालाफेक, तिरंदाजी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, कुस्ती, नेमबाजी यात अजून महत्त्वाच्या स्पर्धा आणि खेळाडूंचे प्रदर्शन होणार आहे. त्यामुळेच भारताच्या पदक तक्त्यात चांगली भर पडेल, अशी खात्री आहे. सध्याच्या स्थितीत पदकांच्या यादीत भारत मागे आहे. अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान, दक्षिण कोरिया, इटली, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया हे देश पदकांच्या यादीत आघाडीवर आहेत. सुवर्ण पदकांच्या यादीत जपान सर्वात पुढे आहे. ११ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या खेळाच्या कुंभमेळ्यात भारताचे खेळाडू नक्कीच समाधानकारक कामगिरी करून परततील. २०२० साली टोकियोतील ऑलिम्पिकमध्ये भारताला सात पदके मिळाली होती. त्यापूर्वी २०१२ मध्ये ६ पदके जिंकण्यात खेळाडूंना यश आले होते, तर बीजिंगमध्ये तीन पदके मिळाली होती. इतरवेळी एक किंवा दोन पदकांवरच भारताला समाधान मानावे लागले होते. गेल्या दहा - बारा वर्षांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी कमालीची सुधारत आहे. क्रीडा क्षेत्रात होत असलेले बदल आणि प्रगती तसेच ‘खेलो इंडिया’मुळे देशभरातील खेळाडूंना मिळत असलेले प्रोत्साहन त्यामुळे भारतीय खेळाडू वेगवेगळ्या स्पर्धेत आपली चांगली कामगिरी करत आहेत. पुढील अकरा बारा दिवसांमध्ये भारताला सुवर्ण, रौप्य पदकांची अपेक्षा आहे.