“आई थांब ग जरा, तू जा ना तुझं काम कर, मी झोपेन थोड्या वेळात.”
“एकंच शेवटची मॅच ती जिंकली की झोपणार मी” असं करत करत कधी ११:३० - १२ वाजतात कळतंच नाही आणि मग सकाळी शाळेत जायला लवकर उठवत नाही पण मग शाळेला उशीर होईल म्हणून उठावंच लागतं पण फ्रेश वाटत नाही. मुलांनी लवकर झोपावं म्हणून आई-आजी पूर्वीच्या काळी 'निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई’, ‘बाळा जो जो रे' अशी अंगाई गीतं म्हणत असत कारण शांत व पुरेशी झोप ही शरीरातील सर्व कार्ये व्यवस्थित चालू राहण्यासाठी महत्त्वाची असते.
तुम्हाला माहीत आहे का? मन व शरीराला रेस्ट मिळणे एवढाच झोपेचा फायदा नाही, तर अजून अनेक फायदे आहेत.
'लवकर निजे, लवकर उठे, तया ज्ञान, आरोग्य, संपत्ती लाभे' अशी एक म्हण आहे. ही म्हण नेहमी लक्षात ठेवा कारण आपल्या आयुर्वेद शास्त्रातसुद्धा झोप किती महत्त्वाची आहे ते सांगितले आहे.
शांत व पुरेशी झोप झाली तर -
* शरीर व मनाचा उत्साह वाढतो, फ्रेश वाटते.
* आपली काम करण्याची क्षमता वाढते.
* मन प्रसन्न रहाते.
* एकाग्रता वाढते.
* शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते.
* पुरेशी झोप म्हणजे रात्री ११-१२ वाजता झोपून सकाळी ८-९ वाजता उठणे नाही हं. हेल्दी रहाण्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत झोपून सकाळी ६ वाजता उठावे.
खूप कमी वेळ झोपणे, चुकीच्या वेळी झोपणे म्हणजेच सकाळी झोपणे, दुपारी जेवून झोपणे आणि अतिप्रमाणात झोपणे या गोष्टी अयोग्य आहेत.
रात्री उशिरापर्यंत जागरण केले असता त्वचा ड्राय होते, शरीरातील उष्णता वाढते, हात पाय दुखू लागतात, डोकेदुखी सुद्धा सुरू होते. आपल्यापैकी काही जण रात्री खेळत बसता, कार्टून बघता किंवा रील्स बघत बसता त्यामुळे झोपायला खूप उशीर होतो आणि रोज रोज झोपायला उशीर झाला तर त्याचे वाईट परिणाम काही दिवसांनी आपल्याला दिसू लागतील. त्यामुळे झोपायच्या किमान १-१.५ तास आधी टीव्ही, मोबाईल बंद ठेवावे.
शांत झोप लागण्यासाठी -
* जेवण संध्याकाळी ७:३० वाजेपर्यंत पूर्ण करावे.
* झोपायच्या आधी साजूक तूप करंगळीने दोन्ही नाकपुड्यांमध्ये लावावे.
* तळपायांना तूपाने मालिश करावी
* अंथरूण व्यवस्थित नीटनेटकं अंथरावं
* खोलीतले लाईट बंद करावे
* आपल्या आवडीचे संगीत ऐकावे. आपल्याकडे तर छान झोप लागावी यासाठी कितीतरी अंगाई गीतं आहेत. त्यातील एखादं अंगाई गीत आज रात्री झोपताना मुद्दाम ऐका आणि शांत झोपी जा.
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य