खूप पाऊस पडत होता. शाळेला दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. नंतर रविवार होता. असं जोडून आल्यामुळे राजू तीन-चार दिवस घरी असणार होता. राजू तसा शहाणा मुलगा. मस्ती करायचा पण सहन करण्याएवढी. आई झोपलेली असेल, टीव्ही बघत असेल तेव्हाच त्याला गोष्टी सांगायच्या असत. आजी देवाचं म्हणत असेल तर त्याचवेळी त्याचं आजीकडे काहीतरी काम असायचं. अशा बऱ्या गटात मोडणारी राजूची मस्ती असायची. अगदी बाळ कृष्णाच्या खोड्या म्हणता येतील अशा.
मध्ये राजूला खायला द्यायला म्हणून राजूच्या आईना छानसे पौष्टिक लाडू बनवले. राजूला आवडणारा सुकामेवा त्यात घातला होता. राजूला खाऊन बघ रे म्हणून आईने एक छोटासा लाडू त्याच्या हातावर ठेवला व बाकीचे लाडू बनवत राहिली. अजून एक दे ना आई लाडू छान झालेत असं म्हणत अजून एक लाडू खाल्ला. त्यावेळी आई म्हणाली," राजू हे पौष्टिक लाडू आहेत. एक किंवा दोनच खायचे तेही सकाळी व संध्याकाळी. असे वारंवार एका मागून खायचे नाहीत बर का." आता उद्या सकाळी मिळणार लाडू. शाळेला सुट्टी आहे ना मधल्या वेळेत खाण्यासाठी केले आहेत. आणि हो सोबत दूधही प्यावं लागणार आहे तुला. शाळेत असतोस तेव्हा तुझा वेळ जातो. भूक लागलेली तुला समजतही नाही. आता घरी आहेस तर करू छानसा खाऊ म्हणून बनवलेत लाडू. राजूने बरंबरं आता नको उद्याच खाईन असं म्हणत हॉलमध्ये आजीला लाडूबद्दल सांगायला गेला. मात्र त्याचे लक्ष आईने कुठच्या डब्यात लाडू भरून ठेवले तिकडे होतं.
झाले दुसरा दिवस उजाडला. बाहेर धो धो पाऊस पडत होता. सर्वांनी नाष्टा केला. आपापली कामं आवरली व जो तो आपला मोबाईल घेऊन रिकामा वेळ घालवत होता. राजूही अभ्यास करतो असं म्हणून वही पुस्तक घेऊन बसला. राजू अभ्यास करीत असलेला बघून आई म्हणाली राजू इथे बस. मी थोडावेळ आराम करते. मग तुला बोर्नव्हीटा देते. राजूही आईजवळ जाऊन बसला. पण त्याचे लक्ष लाडवांच्या डब्याकडे होते. त्याला बालगीत आठवले.
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का
सांग सांग भोलानाथ
दुपारी आई झोपेल काय लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ....
राजू मनातच हसला. थोड्यावेळाने आई झोपली आहे असे समजून राजू दबक्या पावल्याने किचनमध्ये गेला. आवाज न करता लाडवांच्या डब्याचे झाकण काढून चार लाडू खिशात कोंबून परत आई शेजारी येऊन बसला. मनात म्हणाला, काय करू आई लाडू छान झाले की खूप खावेसे वाटतात. तू मात्र एक एकच देतेस म्हणून मी असे लाडू लंपास केले....
एकेक लाडू काढून खाऊ लागला.
संध्याकाळी आईने चार वाजता सर्वांसाठी चहा बनवला आणि राजूसाठी बोर्नव्हीटा. आईला समजले होते राजूने लाडू खाल्ले. पण ती काही बोलली नाही. थोड्यावेळाने संध्याकाळी राजूच्या पोटात दुखू लागले व त्याला जुलाब सुरू झाले. आईने मग त्याला समजावून सांगितले,
"अरे राजू, तू मला न सांगता माझं न ऐकता लाडू खाल्लेस ना. अरे तुझ्यासाठीच बनवले होते. पण तू मात्र माझं ऐकलं नाही. त्रास तुला झाला ना. शाळेला सुट्टी आहे म्हणून बरं. नाहीतर सर्वांना काय सांगून आला असतास घरी परत? असं करू नको. थोड्या प्रमाणात खाऊ खायचा आणि तंदुरुस्त राहायचं कळलं का?
बरं का मुलांनो तुम्हीही आई-बाबांचं ऐका आणि राजूसारखा अधाशीपणा करू नका.
मंजिरी वाटवे