पणजी : विधानसभेत टॅक्सींबाबत केलेल्या वक्तव्यावरुन वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांना धमकावल्याची ऑडिओ क्लिप फिरत आहे. क्लिप फॉरवर्ड करणे थांबवावे आणि धमकी देणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मंत्र्यांच्या खासगी सचिवांनी केली. याकडे सभापतींनी जातीने लक्ष घालावे, अशी मागणीही मॉविन गुदिन्हो यांनी केली.
मंत्री मॉविन गुदिन्हो यांचे खासगी सचिव अजय थोरात यांनी या ऑडिओ क्लिपबाबत पोलीस महासंचालकांना (डीजीपी) पत्र लिहिले आहे. त्यांनी त्यांच्या तक्रारीत लिहिले आहे की, मॉविन हे कॅबिनेट मंत्री असून त्यांच्याकडे महत्त्वाची खाती असून त्यांना समाजात आदर आहे.
२२ जुलै २०२४ रोजी व्हॉट्सॲपवर एक ऑडिओ क्लिप शेअर केली जाऊ लागली. यात एक अज्ञात व्यक्ती टॅक्सीचालक असल्याचा दावा करत असून तो मंत्री गुदिन्हो यांना कोकणी भाषेत धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. गुदिन्हो यांना मारण्यासाठी लोकांना आणि टॅक्सी चालकांना तो प्रवृत्त करत असल्याचे दिसत आहे.
मंत्र्यांना धमकावणे, त्यांना मारणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे माझे पत्र ही तक्रार म्हणून ग्राह्य धरून याप्रकरणी अनोळखी व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू करावी. अनोळखी ऑडिओ क्लिपचा स्रोत शोधून त्या क्लिपचा प्रसार थांबवावा, अशी मागणीही थोरात यांनी केली.
मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून यासंदर्भात सभापतींना पत्रही लिहिले आहे. ॲप आधारित टॅक्सीबाबत विधानसभेत बोलल्यानंतर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे विधानसभा सदस्यांचा हक्कभंग झाला आहे. त्यामुळे संशयितांवर कारवाई करावी, अशी मागणी मॉविन यांनी केली.