लखनौ: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील मोतीगंज-झिलाही रेल्वे स्थानकांदरम्यान पिकौरा गावाजवळ चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचा १८ जुलै रोजी अपघात झाला. प्रशासनाकडून तपास कार्यास गती मिळाल्यानंतर अपघाताचे कारण आता समोर आले आहे. रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाच्या निष्काळजीपणामुळेच दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याचे अपघाताच्या तपास अहवालात सांगण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ट्रेन रुळावरून घसरली त्या ठिकाणी चार दिवसांपासून रुळावर बकलिंगची समस्या उद्भवली होती असे अहवलातून समोर आले आहे.
सुमारे ७० कि.मी. ताशी वेगाने जाणाऱ्या चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेसच्या एकूण १६ बोगी या बकलिंगमुळेच १८ जुलै रोजी रुळावरून घसरल्या, त्यानंतर तीन एसी डबे रुळावरून उलटले. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ३० हून अधिक जण जखमी झाले होते. दिब्रुगड एक्स्प्रेसचा अपघात होण्यापूर्वी झिलाहीच्या कीमनचे काम पाहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याने कनिष्ठ अभियंत्याला फोनवरून रेल्वे ट्रॅक कमकुवत झाल्याचा संदेश दिला होता.
विभाग अधिकाऱ्यांनी ट्रॅकवर किंवा रेल्वेच्या अंतर्गत संगणकीय यंत्रणेवर कोणताही सावधगिरीचा संदेश इंगित केला नाही, त्यामुळे पूर्ण वेगाने धावणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचा अपघात झाला. रेल्वेने स्थापन केलेल्या चौकशी समितीने आपल्या अहवालात या अपघातासाठी लखनौ रेल्वे विभागांतर्गत झिलाही विभागाच्या अभियांत्रिकी विभागाला जबाबदार धरण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकचे फास्टनिंग योग्य नसल्याचेही या अहवालात म्हटले आहे. म्हणजेच, उष्णतेमुळे रुळ विस्तारला आणि सैल झाला होता आणि नीट घट्ट केलेला नव्हता.
ट्रॅकमधील बिघाड लक्षात आल्यानंतर अधिकाऱ्यांनी जागेचे संरक्षण आणि खबरदारीचे फलक लावण्याची तसदी घेतली नाही आणि त्याच ट्रॅकवरून दिब्रुगड एक्स्प्रेसला पूर्ण वेगाने जाऊ दिले, त्यामुळे हा अपघात झाला. ईशान्य रेल्वेच्या ६ अधिकाऱ्यांच्या पथकाने चंदीगड-दिब्रूगड एक्स्प्रेस ट्रेनचे लोको पायलट, मॅनेजर, जिलाही आणि मोतीगंजचे स्टेशन मास्तर यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचे जबाब घेतल्यानंतर आणि घटनास्थळाची तांत्रिक पाहणी केल्यानंतर, आपल्या अहवालात या रेल्वे अपघाताला झिलाहीचा रेल्वे इंजिनीअरिंग विभाग जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
अपघाताच्या सुमारे तासाभरापूर्वी मोतीगंज-झिलाही दरम्यान ट्रॅकमध्ये बिघाड आढळून आला, त्यानंतरही या मार्गावर खबरदारीचे फलक लावण्यात आले नव्हते. सावधगिरीचा संदेश दिला असता तर दिब्रुगड एक्स्प्रेस ताशी ७० किमी ऐवजी ३० किमी प्रतितास वेगाने धावली असती आणि ही दुर्घटना घडली नसती. १८ जुलै रोजी दुपारी २:२८ वाजता हा अपघात झाला. २:३० वाजता मोतीगंजच्या स्टेशन मास्टरला माहिती (वॉर्नींग मेमो) देण्यात आला.