पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदात जे जे उपाय सांगितले आहेत ते आपण या पावसाळ्यात समजून घेत आहोत. तुम्हाला या आरोग्यदायी उपायांचा छान अनुभवही येत असेल व तुमच्या मित्र-मैत्रिणींनासुद्धा तुम्ही ही माहिती सांगत असालंच. असाच एक सोप्पा पण अतिशय उपयुक्त असा उपाय आज आपण शिकणार आहोत.
पावसाळा आला की, आपल्या आजूबाजूला वातावरण थंड होतं, सगळीकडे ओलावा येतो, हवामान दमट होते त्यामुळे आपली पचनशक्ती थोडीशी कमजोर होते, थंडी वाजते, सर्दी - ताप - खोकला यासारखे आजार होतात. आजी - आजोबांचे सांधे दुखतात, पोटऱ्यांमध्ये वात येतो ज्याला कॅच येतात असं म्हणतात. बऱ्याचदा पोटातही दुखतं, उलट्या होतात. या सर्व तक्रारींवर आपल्या घरीच असलेलं औषध म्हणजे गरम पाणी. होय तुम्ही अगदी बरोबर वाचलं, गरम पाणी औषध म्हणून सुद्धा वापरता येतं. आज आपण गरम पाण्याचे फायदे बघू.
पूर्वी जेव्हा वॉटर प्युरिफायर नव्हते तेव्हा पाणी उकळून शुद्ध केलं जात असे. एका ठराविक तापमानापर्यंत तापवलं की पाण्यातील सर्व जंतू, विषाणू नष्ट होऊन, शुद्ध झालेले पाणी पिण्यासाठी वापरत.
जर कोणाला भूक लागत नसेल तर तहान लागेल तेव्हा गरम पाणी प्यायल्याने भूक व्यवस्थित लागते. जेवताना मध्येमध्ये घोट - घोट गरम पाणी प्यावे. गरम पाणी प्यायल्याने अन्नाचे पचन चांगले होते.
तुमच्यापैकी जर कोणी गाणं, भजन शिकत असेल तर नेहमी गरम किंवा कोमट पाणी प्यावे. कारण गरम पाण्याने घशातील कफ सुटतो आणि आवाजसुद्धा सुधारतो. ज्यांना गायक व्हायचंय त्यांनी सुद्धा आतापासून गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास उत्तम.
आपल्या शरीरात लघवी जिथे साठते त्या अवयवाला मूत्राशय असं म्हणतात. गरम पाणी प्यायल्याने मूत्राशय शुद्ध होतो.
ज्यांना सर्दी, खोकला, दमा - श्वास घ्यायला त्रास होणे, उचकी लागणे, पोटात गॅस साठून वेदना होणे असे आजार असतील तर त्यांनी तहान लागली की गरम पाणी प्यावे. म्हणजे हे आजार लवकर कमी व्हायला मदत होते.
ताप आला की काय काय करावं, काय करू नये ते आपण आधीच समजून घेतलं आहे. ताप आल्यावर लगेच गरम पाणी घोट घोट प्यायले असता ताप उतरायला मदत होते.
आजी - आजोबांचे, आईचे हात पाय दुखत असतील, रात्री पायात गोळे येतात असं सांगत असतील तर त्यांना गरम पाणी प्यायला सांगावे व गरम पाण्याने पाय शेकायला सांगावे. असे केल्याने त्यांचे दुखणेसुद्धा कमी होईल.
आहे की नाही सोप्पं पण अतिशय उपयुक्त असं घरगुती औषध??? पावसाळ्यात व हिवाळ्यात गरम पाणीच पिण्यासाठी वापरा. आणि हं एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, पाणी तहान लागेल तेव्हाच प्या आणि ते ही एका जागी बसून घोट - घोट प्या. गटागटा पाणी पिणे, तहान नसताना खूप पाणी पिणे किंवा तहान लागलेली असताना पाणी न पिणे या सगळ्या सवयी आरोग्यासाठी घातक आहेत. लक्षात आहे ना पाण्याची गोष्ट?
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य