एक आदरणीय व्यक्तिमत्त्व... माझे गुरुजी

जन्मानंतर सुरू होतो जगण्याचा प्रवास. मग तो काही काळाचा असला‌, तरी त्या प्रवासात अनेक माणसं येतात. काही आयुष्यभरासाठी सोबत राहतात, तर काही जण काही क्षणांसाठी आपल्यासोबत राहतात. शिक्षक काय असतो आणि तो आपल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे घडवू शकतो याचं ज्वलंत उदाहरण गुरुजींनी निर्माण केलं. कदाचित त्यांच्यासारखं होणं जमेल की नाही माहीत नाही, परंतु त्यांनी रुजवलेलं माणुसकीचं बीज माझ्या शिक्षकीपेशात मात्र नक्की रुजलं जाईल.

Story: सय अंगणाची |
20th July, 03:56 am
एक आदरणीय व्यक्तिमत्त्व... माझे गुरुजी

बालपणीचा माझा प्रवास तसा खडतरच. शिक्षणाची जाण घरात तशी थोडी फारच. त्यामुळे अंगणवाडी आणि माझा संबंध कधी आलाच नाही. एकदिवस संध्याकाळच्या वेळी गोऱ्यापान चेहऱ्याची व्यक्ती आमच्या घरी आली. आई बाहेरच अंगणात होती. त्यांनी आईला हात जोडून नमस्कार केला आणि आपला परिचय करून दिला. आईने त्यांना बसण्याची विनंती केली. मला पाहताच त्यांनी वनिता बाळा इकडे ये म्हणून आपल्याजवळ बोलावले. शाळेत जातेस का असं विचारल्यावर मी त्यावेळी मान हलवतच नाही असे उत्तर दिले. तासभर ते आईशी बोलत होते. घरातून निघताना वनिता उद्यापासून आमच्या शाळेत यायचं हा असं सांगून माझ्या डोक्यावरून हात फिरवून ते गेले. ते गेल्यानंतर मी आईवर प्रश्नांचा भडिमार केला. त्यानंतर आईने मला समजावून सांगितले.

आईच्या बोलण्यावरून मी शाळेत जायला तयार झाले. त्यादिवशी संध्याकाळी दिगा काकांच्या दुकानावरून आईने मला पाटी ‌आणि पेन्सिल आणली. दुसऱ्या दिवशी एका प्लास्टिक पिशवीत पाटी, पेन्सिल घालून आईने मला वाड्यावरच्या नकळत कधी तरी शाळेत जाणाऱ्या मुलांसोबत त्यादिवशी शाळेत पाठवले. भीतीने माझे हात पाय थरथरत होते. पायात जुनं पॅरागोनचं चप्पल, हातात मोकेंबोवाली तांबड्या पिवळ्या रंगाची पिशवी अशा स्थितीत माझा शालेय जीवनातील प्रवास सुरू झाला तो त्या गोरापान चेहरा असलेल्या प्राथमिक शाळेचे शिक्षक संजीव बर्वे गुरूजींमुळे. माझ्या जीवनात एक प्रकाशमय ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याचे महान कार्य ज्यांनी केले ते माझे आदरणीय, आधारस्तंभ बनले कायमस्वरूपी. हाताला धरून अक्षर ओळख ते गणवेशापर्यंत स्वत:च्या मुली एवढं त्यांनी सांभाळले. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा कधीच चुकवणार नाही हे घरी येऊन आईला सांगितले त्यावेळी आई ही चकितच झाली. शर्टचा कॉलर तर कधीच मला सरळ करता येत नसे. शाळेत पाऊल ठेवताच गुरुजी मला ते काम नीटनेटकेपणाने कसं करायचं हे सांगायचे. कालांतराने बदल हा अपेक्षित होताच आणि झालाही. एक -दोन दिवसांत मला व्यंजन, बाराखडी तोंडपाठ झालेली. लिहिताही यायची. फक्त क्ष काढायला तीन-चार दिवस लागले. सतत गुरुजी माझ्या हाताला धरून पाटीवर गिरवायचे. 

आज हे सगळे प्रसंग आठवताना काही प्रसंग व्यक्त करताच येत नाहीत. हृदयाला भिडणारे प्रसंग आयुष्यात घडले त्यावेळी शिक्षक या नात्याने संजीव गुरूजी ठामपणे पाठीशी उभे राहिले. कुठली गोष्ट कधी त्यांच्यापासून लपवून ठेवताच आली नाही. समोर दिसले की अश्रूंने डोळे भरायचे. कधी रागात ओरडले तर तेवढ्याच आपुलकीने समजवायचे. परिस्थितीशी झुंज देत आपण जायचं कितीही आणि काहीही झालं तरी हे घोषवाक्य त्यांनी माझ्या हृदयी कोरलेले. शालेय जीवनात नकळत मी त्यांच्या कुटुंबाशी ही जोडले गेले. गुरुजींचे बाबा म्हणजेच तात्या, त्यांची आई म्हणजे आमची आज्जी‌ आणि त्यांची अर्धांगिनी म्हणजे माझी नयन टीचर. वनिता कशी आहेस म्हणत आपल्या कवेत घेणाऱ्या मिनाक्षी, नेहा, साक्षी या त्यांच्या तीन मुली ज्यांनी मला बहिणींसारखी कठीण काळातही साथ दिली. गुरुजींनी आपल्या कुटुंबासारखीच शाळा आणि शाळेतील विद्यार्थ्यांना सांभाळले. प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत नाहीतर विद्यार्थी पुढे शिक्षण घेऊन, यश प्राप्त करेपर्यंत गुरुजी आपल्या विद्यार्थ्यांना कधी विसरले नाहीत. 

आज ही त्यांना विद्यार्थी, त्यांचे आईवडील यांची नावे तोंडपाठ असतील. शाळेत, गावात प्रत्येक घरात संजीव गुरुजींचे व्यक्तिमत्त्व फुलले होते. शिक्षकी पेशा एवढ्याच भोवती त्यांचं जीवन नव्हतं. कुळागर, गुरेढोरे ही ते सांभाळायचे. मध्यंतरी अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या परंतु खडतर प्रवास तडीपार करणाऱ्या गुरुजींनी प्रत्येक गोष्टीवर मात केली. ज्या ज्या शाळेत गेले तेथे माझ्यासारखे विद्यार्थी त्यांनी घडविले. आजही हमखासपणे वनिता माझी विद्यार्थिनी म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहाताच नकळत आनंदाश्रू तरळू लागतात. कदाचित संजीव बर्वे गुरुजी नसते तर माझे व्यक्त हात मला कधी सापडलेत नसते अन् माझ्या पेनातील शाही ही अर्धवट सुकली असती. माझ्या अशिक्षित पालकांमध्ये त्यांनी साक्षरतेचे विचार पेरले जे सतत मला प्रोत्साहन देत राहिले. वनिता जिद्द सोडून नकोस. यश उशिरा जरी पदरी पडले तरीही आज बदलत्या वेळेत गुरुजींचा सहवास कमी झाला असला तरी एखादेवेळी दोन शब्द जरी त्यांचे कानी पडले तरी धाडसीपणा जागृत होतो. शिक्षक काय असतो आणि तो आपल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे घडवू शकतो याचं ज्वलंत उदाहरण गुरुजींनी निर्माण केलं. कदाचित त्यांच्यासारखं होणं जमेल की नाही माहीत नाही परंतु त्यांनी रुजवलेलं माणुसकीचं बीज माझ्या शिक्षकीपेशात मात्र नक्की रुजलं जाईल. नाती, कुटुंब, समाज यांना एकजुटीने जपून सदैव लहान लहान गोष्टीतून आपलं व्यक्तिमत्त्व स्वत: घडवायची ताकद मात्र गुरुजींनी माझ्यामध्ये निर्माण केली. आई-बाबा आणि गुरुजी‌‌ यांनी मला नुसतं घडवलं नाही तर इतरांना घडवण्याची ज्योत माझ्यामध्ये प्रज्वलित ठेवली.


ओनिता रामा वरक, पाल-ठाणे‌, सत्तरी.