पणजी : भारताचे दिग्गज फलंदाज आणि माजी प्रशिक्षक राहूल द्रविड यांनी जंटलमन म्हणजे काय ? याची व्याख्या अधोरेखित केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, टी-२० विश्वचषक जिंकल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने जाहीर केलेला तब्बल २.५ कोटी रुपयांचा बोनस द्रविड यांनी नाकारला आहे. आपल्या कोचिंग स्टाफ इतकाच बोनस आपल्याला देण्यात यावा यासाठी ते आग्रही आहेत. त्यांच्या याच वागण्यामुळे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे बरेच कौतुक होत आहे.
२९ जून २०२४ रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेला अवघ्या ७ धावांनी मात दिली. भारताने १७ वर्षांत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. वेस्ट इंडिजनंतर असे करणारा भारत हा दुसराच संघ. एकेकाळी एकदिवसीय विश्वचषकात याच धर्तीवर भारतीय संघ नामुष्कीजनक पराभव स्वीकारून पहिल्याच फेरीत बाहेर पडला होता. तेव्हा कर्णधार असलेल्या द्रविड यांच्यावर बरीच टीका झाली होती. त्याच धर्तीवर त्यांनी १७ वर्षानंतर विश्वचषक जिंकला.
भारताच्या विजयात कोच द्रविड यांची रणनीती बरीच कामी आली. २०२२ साली अधिकृतपणे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी रुजू झाल्यानंतर द्रविड-शर्मा या जोडगोळीच्या नेतृत्त्वाखाली भारताने २०२२च्या टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरी, २०२३चा आशिया कप (टी-२० फॉरमॅट) कसोटी-एकदिवसीय-टी-२० फॉरमॅटच्या अनेक द्विपक्षीय मालिका, वर्ल्ड टेस्ट-चॅम्पियनशिपची अंतिम फेरी, एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी आणि आता टी-२० विश्वचषक जिंकणे अशी भरीव कामगिरी केली आहे.
भारतात पोहोचल्यानंतर भारतीय विश्वविजेत्या संघाचे जंगी स्वागत झाले. मुंबईत पार पडलेला सोहळा खूपच नेत्रदीपक होता. बीसीसीआयने भारतीय संघाच्या निर्भेळ यशाची दखल घेत तब्बल १२५ कोटी रुपयांच्या पुरस्काराची घोषणा केली. यात भारताच्या मुख्य संघातील १५ खेळाडूंना ५ कोटी. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या खात्यात ५ कोटी तर इतर कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफ यांना अडीच कोटी रुपये मिळणार होते. तर ४ राखीव खेळाडू, बॅकरूम स्टाफ आणि निवड समितीचे सदस्य व बीसीसीआयचे इतर अधिकारी यांना १ कोटी प्रत्येकी दिले जाणार होते.
दरम्यान बक्षीस जाहीर झाल्याच्या १-२ दिवसांनंतर, द्रविड यांनी बीसीसीआयला त्यांची बक्षीस रक्कम ५ कोटींवरून २.५ कोटी रुपये करण्याची विनंती केली. संघाच्या विजयात जेवढा आपला वाटा आहे, तितकाच वाटा माझ्या कोचिंग स्टाफचा देखील आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी ही उत्कृष्ट दर्जाची झाल्यानेच आपण हा विश्वचषक जिंकू शकलो. असे म्हणत त्यांनी नम्रपणे आपल्याला कोचिंग स्टाफ प्रमाणेच बोनस दिला जावा असा आग्रह धरला. द्रविड यांच्या या स्टँडने सर्व क्रिकेट फॅन्स भारावून गेलेत. त्यांनी 'राहुल सर.. तुमच्या सारखे तुम्हीच.. !' 'एक ही तो दिल है कोच साहब, कितनी बार जितोगे ?' अशा आशयाचे ट्विट आणि कमेंट केलेत.
या याधीही द्रविड यांनी असेच केले आहे. यापूर्वी २०१८ मध्ये, भारतीय संघाने पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली अंडर-१९ वर्ल्ड चषक जिंकला होता, तेव्हा देखील राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकाची भूमिका वठवत होते. यावेळी मायदेशी परतल्यानंतर बीसीसीआयने द्रविड यांना ५० लाख रुपये, तर सपोर्ट स्टाफला २० लाख रुपये बोनस जाहीर केला. द्रविड यांनी बोनसची रक्कम स्वीकारण्यास तत्काळ नकार दिला होता. सर्व प्रशिक्षकांना समान बोनस मिळावा यासाठी ते तेव्हाही आग्रही होते.
त्यानंतर बीसीसीआयने त्यांच्या विनंतीस मान देत आपला निर्णय बदलला आणि द्रविडसह सर्व प्रशिक्षकांना २५ लाख रुपयांचा बोनस दिला. यावेळी खेळाडूंना ३० लाख प्रत्येकी मिळाले होते. राहुल द्रविड यांनी मैदानात आणि मैदानाबाहेर देखील आपल्या आचरणाने आपली जंटलमन ही छबी कायम राखली आहे.