गोव्यातल्या ग्राहक चळवळीतला जागल्या

सर्वसामान्य लोकांचे आर्थिक स्तरावरील शोषण करण्याचे कार्य काही व्यापारी आणि खासगी आस्थापने त्यांच्या निरक्षरता, अज्ञानाचा गैरफायदा उठवत करत असतात. खरेतर गोवा राज्य सरकारच्या यंत्रणांनी या साऱ्या बाबी रोखण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक असताना, त्यांचे कार्य आपण स्वीकारून रोलंड मार्टिन्स निर्भिडपणे करत आहे, ही स्पृहणीय बाब आहे.

Story: विचारचक्र |
09th July, 11:45 pm
गोव्यातल्या ग्राहक चळवळीतला जागल्या

लोकशाही शासन प्रणालीत नागरिकांना त्यांच्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव करून देणे विशेष महत्त्वाचे असते. आज अत्यल्प सुशिक्षित लोकमानसात अशी जागृती आहे आणि त्यामुळे उद्योग व्यापारांच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांना सातत्याने लुटले जाते. योग्य मोबदला देऊनही विकत घेतलेल्या वस्तूचे समाधान मिळत नाही. दूरदर्शन संच, धुलाई मशीन, वाहन यासारख्या महागड्या वस्तू खरेदी करताना ग्राहकांना बऱ्याचदा फसवणुकीला सामोरे जावे लागते. गोव्यात मात्र एखाद्या खरेदी केलेल्या वस्तूच्या बाबतीत फसवणूक झाली, तर त्याविरुद्ध न्याय मिळवून देण्यासाठी, मुर्दाड व्यापाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी रोलंड मार्टिन्ससारखा खंदा लढवय्या आहे. गोव्यात ग्राहकांना जागृत करण्याचे कार्य अव्याहतपणे करणारे हे व्यक्तिमत्त्व आपल्या विद्यार्थीदशेपासून अन्याय, अत्याचाराविरुद्ध लढा देणारे होते. प्रोग्रेसिव्ह स्टुडन्टस् युनियनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवासी बस वाहतूक करण्यासाठी अर्ध्या तिकिटाची सवलत मिळवून देण्यासाठी जी चळवळ झाली होती, त्यात रोलंड मार्टिन्स अग्रेसर होते. चर्चासत्रे, व्याख्याने, पथनाट्ये, वादविवादाच्या माध्यमातून गोव्यातील उपेक्षित, पददलित, सर्वसामान्यांनी आपल्या न्यायासाठी जेव्हा चळवळी केल्या, त्यात रोलंडचा सहभाग हमखास होता.

भगतसिंग, चंद्रशेखर आझाद या देशप्रेमी क्रांतिकारी युव‌कांच्या जीवन आणि कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्या समवयस्क तरुणांच्या साथीने रोलंड कार्यरत झाला होता. आपली चळवळ कायम रहावी म्हणून रोलंडने लिलियन डिकॉस्टा यांच्या मदतीने ‘गोवा डेस्क रिसोर्स सेंटर’ची १९९८ मध्ये स्थापना केली. विविध विषयांवर गोव्यातील जनतेला माहिती मिळावी, वाहतुकीचे नियम आणि अटी, जागरूक ग्राहक आदी चळवळी चालू राहून इथल्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय होऊ नये, त्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये म्हणून रोलंडने आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या पाव शतकापेक्षा ज्यादा कालखंड कार्य चालू ठेवलेले आहे. गावोगावी, शहरोशहरी सार्वजनिक सेवा सुविधा पुरविणाऱ्या सरकारी आणि बिगर सरकारी संस्था, व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात. काही काही वेळा दसरा, दिवाळी यासारख्या उत्सवांपूर्वी प्रद‌र्शनांचे आयोजन करून कमी किमतीत माल विकताना निकृष्ट, दर्जाहीन माल पुरवतात. त्यांच्या आमिषाला बळी पडतात. सजावटीपासून खाण्याचे जिन्नस विकताना नामंकित कंपन्या ग्राहकांची वारेमाप फसवणूक करतात आणि यासंद‌र्भात ग्राहकांना त्यांच्या ग्राहक हक्कांची जाणीव करून देण्यात रोलंडनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.

गोव्यात आजपर्यंत वेगवेगळ्या विषयांबाबत चळवळी झाल्या, त्यांची माहिती संकलित

करण्याचे शिस्तबद्ध काम या प्रतिष्ठानने केलेले आहे. विविधांगी विषयांवरची नियतकालिके, साप्ताहिके, मासिके यांचा भरणा प्रतिष्ठानच्या ग्रंथालयात आहे. पर्यटन, बालहक्क, मानवी हक्क, पर्यावरण, स्त्री सशक्तीकरण अशा विषयांवरचे माहितीपट, पुस्तके, चित्रप्रदर्शन यांची सुविधा प्रतिष्ठानकडे आहे. दर आठवड्याला गोव्याला भेडसावणाऱ्या ज्वलंत विषयांवर संपन्न होणारा ‘फ्रायडे बाल्काव’ सुजाणांना एकत्र येण्यासाठी व्यासपीठ प्रदान करत होते. रोलंडने चालू ठेवलेली ‘गोवा कॅन’ ही चळवळ शहरापासून खेड्यांत पोहचलेली असून, लोकशाही मूल्यांचे पालन करून चालू असलेली चळवळ गोव्यासाठी आशेचा किरण आहे. ‘फ्रायडे बाल्काव’सारख्या व्यासपीठामुळे रोलंड मार्टिन्सने गोव्यातल्या असंख्य सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांना समर्थपणे वाचा फोडण्याचे कार्य बजावले होते. रोलंड मार्टिन्सला उपजत जिज्ञासा, कल्पकता लाभल्याकारणाने विविध विषयांवर समाजात, वि‌द्यार्थ्यांत जागृती करण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, हे अचूक ओळखून वेळोवेळी तसे प्रयोग यशस्वी केलेले आहेत. समाजाला वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान लाभावे, अज्ञान लोप पावावे आणि त्यांची भ्रष्टाचार, लाचलुचपत या साऱ्या जहरी विळख्यातून मुक्तता करण्यासाठी त्यांनी आरंभलेले प्रयत्न सफल ठरलेले आहेत, हे त्यांच्या चळवळीचे यश आहे.

गोमंतकीय लोकचळ‌व‌ळींशी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ जोडले गे‌लेले रोलंड मार्टिन्स हे झपाटलेले व्यक्तिमत्त्व असून, त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय, आर्थिक आदी विविध विषयांवर जागृती करण्यासाठी प्रयत्न आरंभलेले आहेत. गोव्यासारखा राज्यात पर्यटना‌चा व्यवसाय तेजीत असल्याकारणाने, त्याच्या सावलीत अनेक अनिष्ट व्यवसायांची साखळी वाढत चालली आहे. रेल्वे स्थानकांवर भिकाऱ्यांचे तांडे पूर्वीच्या काळी गोव्यात सहसा पहायला मिळत नव्हते. परंतु आज गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी अपंग, असहाय्यांना हतबल करून भिकारी म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी भीक मागण्यास प्रवृत्त केलेले आहे. भिकाऱ्यांचे हे तांडे नियंत्रित व्हावे, त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे म्हणून ‘गोवा कॅन’ या संघटनेमार्फत राज्य, जिल्हा प्रशासन‌ स्तरावर जागृती व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांमार्फत योग्य उपाययोजना हाती घ्यावी, यासाठी सातत्याने दबाव तंत्र उक्ती, कृतीद्वारे रोलंड मार्टिन्सने निर्माण केलेले आहे. 

सर्वसामान्य लोकांचे आर्थिक स्तरावरील शोषण करण्याचे कार्य काही व्यापारी आणि खासगी आस्थापने त्यांच्या निरक्षरता, अज्ञान यांचा गैरफायदा उठवत करत असतात. खरेतर गोवा राज्य सरकारच्या यंत्रणांनी या साऱ्या बाबी रोखण्यासाठी उपाययोजना करणे बंधनकारक असताना, त्यांचे कार्य आपण स्वीकारून रोलंड मार्टिन्स निर्भिडपणे करत आहे, ही स्पृहणीय बाब आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी चळवळीपासून आजतागायत रंजलेल्या, गांजलेल्या काष्टकरी समाजाला सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी त्याने सुरू केलेल्या विविध स्तरावरच्या चळवळींनी महत्त्वाचे योगदान केलेले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून रोलंड मार्टिन्स ही गोव्यासाठी व्यक्ती म्हणून न राहता, ती अखंड कार्यप्रवण राहिलेली लोकचळ‌वळ झालेली आहे. समाजातल्या लोकांचे आर्थिक शोषण होऊ नये, अपंग, विकलांगपणाचा गैरफायदा घेत त्यांची पिळवणूक केली जाऊ नये या हेतूने गोवा कॅन ही संस्था कार्यरत आहे. विविध प्रकारे सरकारला आपण करांची भरणा करत असल्याने, त्याबदल्यात आम्हाला पौष्टिक अन्न, चवदार आणि निर्मळ पाणी, शुद्ध हवा पुरवणे, चांगले रस्ते, गटार, केरकचरा व्यवस्थापन, सांडपाण्याचा नियोजनबद्ध निचरा करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु बऱ्याचदा सरकारी यंत्रणा मूग गिळून गप्प राहतात. मामलेदार, जिल्हाधिकारी हतबल होतात, त्यावेळी त्यांना जागृत करून आपल्या कर्तव्याचे पालन करण्यासाठी रोलंड मार्टिन्स प्रवृत्त करत असतात, ही प्रेरणादायी बाब आहे आणि त्याचे दर्शन या निर्भयी कार्यकर्त्यातून गोव्याला घडत आहे.


प्रा. राजेंद्र केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.)

मो. ९४२१२४८५४५