मनापासून धन्यवाद! प्रिय टीम इंडिया...

Story: विशेष |
07th July, 04:56 am
मनापासून धन्यवाद! प्रिय टीम इंडिया...

सगळ्यात आधी तर तुमचं खूप खूप अभिनंदन! गेल्या १३ वर्षांपासूनचा आयसीसी वर्ल्डकप ट्रॉफीचा दुष्काळ तुम्ही एकदाचा संपवलात. आपल्याला शेवटची आयसीसी ट्रॉफी मिळाली होती, ती ११ वर्षांपूर्वी - ‘चॅम्पियन्स’ची! अजूनही आठवतं ते शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेलं थरारनाट्य. आणि अर्थातच आठवतं ते, कॅप्टन धोनीचं लहान मुलासारखं स्टंपमागे अत्यानंदाने उड्या मारत नाचणं!

त्यानंतर मात्र एकापाठोपाठ एक पराभव आम्ही मोठ्या मुश्किलीने पचवत गेलो. एकीकडे फायनलमध्ये अगदी शेवटच्या क्षणी विजयाने आपल्याला हुलकावणी दिली तर कधी सेमीफायनलमध्ये उंबरठ्यावरच ठेच लागावी आणि जिव्हारी कळ उमटावी, असे पराभव पदरी पडले. हे सगळं चालू असतानाच ज्या क्रिकेटहिरोंना बघत आम्ही लहानाचे मोठे झालो, तेही एकापाठोपाठ एक निवृत्तीची घोषणा करत मैदान सोडते झाले.

वर्षभरापूर्वीची गोष्ट असेल. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल.  समोर तुल्यबळ ऑस्ट्रेलिया. अगदी पहिल्या दिवसापासूनच ऑस्ट्रेलियाने आपल्या गळ्याभोवती फास आवळायला सुरुवात केली. शेवटी २०९ धावांनी भारताचा पराभव झाला. ही जखम अगदी ताजी असतानाच वनडे वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने पुन्हा बाजी मारत आपल्या तोंडचा घास पळवला. त्यादिवशी पाहिलेले टीम इंडियाचे रडवेले चेहरे विसरणं सहजासहजी शक्य नव्हतं. पुन्हा या चेहऱ्यांनी रडावं असंही तेव्हा वाटत नव्हतं. पण आठ महिन्यांतच हे चेहरे पुन्हा रडले आणि यावेळी मात्र देश हसत होता. त्या चेहऱ्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू म्हणजे आम्हा चाहत्यांसाठी आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवणारा पाऊसच होता.

आयसीसी स्पर्धेत सतत हुलकावणी देत असणारं यश हे टीम इंडियाच्या कपाळावर ‘चोकर्स’चा शिक्का कोरणार, या विचारानेच मन साशंक व्हायचं. त्यातच टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या तारखा जाहीर झाल्या. टीम जाहीर झाली. टीममधले सगळेच प्लेयर्स तसे भरवशाचे होते. पण महिन्याभरापूर्वी झालेल्या आयपीएलने यातल्या अनेकांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. त्यामुळे काहीशी धाकधूक मनात ठेवूनच आम्ही चाहते या वर्ल्डकपला सामोरे गेलो.

वॉर्मअप मॅचमध्ये बांग्लादेशला नमवत स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यानंतर आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिकेला धूळ चारत आपण पुढे जात राहिलो. कॅनडाला हरवणंही तसं काही अवघड नव्हतंच; पण पावसाने त्या मॅचमध्ये एकट्याने दोन्ही इनिंग खेळून काढल्या आणि आपण ‘गृप स्टेज’ सोडून ‘सुपर एट’मध्ये प्रवेश करते झालो. इथंही अफगाणिस्तान, बांगलादेशला लीलया धूळ चारत आपण ऑस्ट्रेलियासमोर आलो. गेल्या वेळचं पुरेपूर उट्टं काढत आपण ऑस्ट्रेलियाची खोड मोडली आणि सेमीफायनलला पोचलो. इथंही इंग्लंडसारख्या तुल्यबळ प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करत आपण दिमाखात फायनल गाठली.

इथं आपल्यासमोर होती साऊथ आफ्रिका. वर्षानुवर्षे चोकर्स म्हणून हिणवला गेलेला हा संघ पहिल्यांदाच आयसीसी फायनलमध्ये पोहोचला होता. तर त्यांच्यासमोर चोकर्स हा शिक्का आपल्या माथी लागू नये यासाठी प्रयत्नपूर्वक लढणारा आपला संघ होता. दोन्ही संघ कागदावर आणि मैदानातही जबरदस्त ठरले होते. पूर्ण स्पर्धेत एकही मॅच न हारलेले हे दोन्ही संघ आज समोरच्याला हारवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरले होते. संपूर्ण स्पर्धेत धडपडत राहिलेल्या विराट कोहलीला नेमका या मॅचला सूर गवसला आणि गंभीर प्रसंगातही खंबीर खेळी करून त्याने स्वतःचं ‘किंग’ असणं पुन्हा एकदा सिद्ध केलं.

आपण उभारलेल्या टी ट्वेन्टी वर्ल्डकप फायनमधल्या आजवरच्या सर्वाधिक आणि आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेनेही पुरेपूर जोर लावला होता. एकवेळ अशी आली जेव्हा विजयासाठी २४ चेंडूंत फक्त २६ धावा आफ्रिकेला करायच्या होत्या. भारताने ती चकाकती वर्ल्डकप ट्रॉफी मिळवण्याची शक्यता अगदीच धूसर झाली होती. पण डेथ ओव्हरमधली बॉलिंग काय असते हे बुमराह, अर्शदीप आणि हार्दिकने त्यावेळी दाखवून दिलं. बुमराह-अर्शदीपने टिच्चून केलेला वेगवान मारा, हार्दिकच्या गोलंदाजीवर धोकादायक क्लासेनचा झेल घेताना पंतने दाखवलेलं प्रसंगावधान आणि हार्दिकनेच टाकलेला चेंडू लांब भिरकावू पाहणाऱ्या मिलरचा सूर्यकुमारने सीमारेषेवर टिपलेला उत्तम झेल, हे सगळंच टीम इंडियाच्या पथ्यावर पडलं. आपण विश्वविजेते झालो.

त्यानंतर किंग कोहलीचा आनंदाने रडून लाल झालेला चेहरा, कॅप्टन रोहित शर्माने मैदानाला साश्रूनयनाने वाहिलेली आदरांजली, गेल्या वर्षभरात टीकेचा धनी झालेल्या हार्दिकच्या डोळ्यांतले आनंदाश्रू हे सगळं काही अविस्मरणीय होतं. यावर कळस गाठला तो कोच राहुल द्रविड यांनी ट्रॉफी हातात आल्यावर केलेल्या जल्लोषाने. अत्यंत शांत, संयमी स्वभावाच्या आपल्या या जॅमीने टीम इंडियाचा कोच म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर अपयश आणि निराशेचा मोठा काळ खरोखरच एक भिंत बनून पचवला. अखेर टीम इंडियाच्या उत्कृष्ट सांघिक खेळामुळे या भिंतीवर एक आयसीसी ट्रॉफी विराजमान झालीच. अगदी कालपरवाच तुम्ही ही ट्रॉफी भारतात आणलीत. तुमच्या स्वागताला लोटलेला आमचा जनसागर हीच आमच्या प्रेमाची पावती. आम्ही भारतीय खेळांवर प्रेम करतो, त्यातही क्रिकेट या खेळावर थोडं जास्तच प्रेम करतो! तुमचा हा विजय आणि त्याला लाभलेला आमचा हा प्रतिसाद हे देशातील इतर खेळाडूंसाठी एक प्रोत्साहन ठरावं, त्यांच्याही पदरी इतकं कोडकौतुक पडावं, असं यावेळी मनापासून वाटतं.

हे पत्र माझ्या एकट्याचं नाही; माझ्यासारख्या देशाच्या कानाकोपऱ्यातल्या सर्वच तरुण चाहत्यांचं आहे. विराट कोहली आणि रोहीत शर्मा या दोन सुपरस्टार्सने आम्हाला क्रिकेट या खेळातला आनंद नव्याने उपभोगू दिला, त्यासाठी त्यांचे आभार मानणारे हे पत्र! उत्तम प्रतिभा असूनही आयसीसी ट्रॉफी मिळवता न आल्याचं राहुल द्रविडचं दुःख पुसून काढणाऱ्या टीम इंडियाच्या तमाम शिलेदारांचे आभार मानणारे हे पत्र! नानाविध अडचणींना तोंड देत कसेबसे दिवस पुढे ढकलणाऱ्या भारतीयांना विश्वविजेतेपदाची सुखद झुळूक अनुभवू देणाऱ्या आमच्या लाडक्या टीम इंडियाचे आभार मानणारे हे पत्र!

- सप्रेम धन्यवाद,

तुमचाच एक चाहता!


प्रथमेश हळंदे