जागतिक प्राणी दिवसाच्या निमित्ताने…

शेकडो वर्षांपूर्वी कुडतरणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाल्याने प्लेग हा प्राणघातक रोग पसरला होता. या रोगामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्यानंतर यासारखे कितीतरी रोग सतत डोके वर काढत राहिले. श्वानामुळे होणारा रेबीज, पक्षांमुळे होणारा बर्ड फ्लू, डुक्करांपासून पसरणारा स्वायन फ्लू व डासांमुळे पसरणाऱ्या मलेरिया, डेंग्यूमुळे तर आजपर्यंत कितीतरी लोक मृत्यूमुखी पडले.

Story: साद निसर्गाची |
07th July, 04:52 am
जागतिक प्राणी दिवसाच्या निमित्ताने…

प्राण्यांमुळे माणसाला होऊ शकणाऱ्या रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ६ जुलै हा दिवस जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा केला जातो. ६ जुलै १८८५ साली लुईस पाश्चर यांनी रेबीज या प्राणघातक रोगावर यशस्वीपणे लस शोधून काढली होती. प्राण्यांपासून होणाऱ्या रोगांबद्दल जनमानसात जागृती निर्माण व्हावी म्हणून त्या दिवसापासून ६ जुलै हा दिवस जागतिक प्राणी दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. 

२०१५ साली माकडांमुळे पसरलेल्या माकडतापाने गोव्यात खासकरून गोव्यातील सत्तरी तालुक्यात थैमान मांडले होते. त्यानंतर २०१८ साली आणि यंदा परत एकदा या संसर्गजन्य रोगाने आपले डोके वर काढलेले दिसून आले. या तापामुळे कित्येक लोकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. मेलेल्या किंवा ताप आलेल्या माकडाला चावलेली गोचीड जर माणसाला चावली तर त्या माणसाला माकडताप होण्याचा जास्त धोका असतो. काजूच्या हंगामात डोंगरावर जाणाऱ्या लोकांना, गुरे चरायला किंवा लाकडे गोळा करण्यासाठी रानात जाणाऱ्या लोकांमध्ये माकडतापाची जास्त लक्षणे दिसून येत असल्याचे निदर्शनास आले. 

प्राण्यांमुळे पसरणाऱ्या रोगाला झुनोसिस असे म्हणतात. झुनोटिक रोग किंवा झुनोसिस म्हणजे प्राण्यांपासून माणसाला होऊ शकणारा रोग. प्राण्यांना संक्रमित करणारे जीवाणू, बुरशी, परजीवी, जंतू, विषाणू जनमानसात रोग पसरवू शकतात. संक्रमित प्राण्याच्या थेट संपर्कात आल्याने, संक्रमित प्राण्याची लाळ, रक्त, श्लेष्मा, मूत्र, श्वसन स्राव किंवा विष्ठेच्या संपर्कात आल्यास झुनोटिक रोग जडण्याची दाट शक्यता असते. पाळीव प्राण्याने चावा घेतल्यास किंवा ओरखडल्यास हा रोग होऊ शकतो. रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना झुनोटिक संसर्गाचा जास्त धोका संभवतो. 

संक्रमित प्राण्यामुळे दूषित झालेल्या वस्तूला स्पर्श केल्यानेही हा आजार जडू शकतो. मत्स्यालय, पाळीव प्राण्यांसाठी वापरण्यात येणाऱ्या टोपल्या, पिंजरे किंवा कुत्र्याचे घर, प्राण्यांना अन्न व पाणी देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भांड्यांना स्पर्श केल्यानेही झुनोटिक रोग होऊ शकतो. शेतकरी, वेधशाळा कामगार, प्राणीसंग्रहालय किंवा पाळीव प्राणी विक्री दुकानातील कामगार व पशुवैद्यकांना झुनोटिक रोग होण्याचा जास्त धोका असतो. 

बरेचदा खतामुळे जलस्रोतांमध्ये अनेक प्रकारचे झुनोटिक बॅक्टेरिया मिसळले जातात. अशावेळी दूषित पाण्यातून ह्या जीवाणूंचे मानवामध्ये संक्रमण होण्याचा धोका वाढतो. अनेक ज्ञात झुनोटिक रोग वन्य प्राण्यांद्वारे माणसांना किंवा वन्य प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांद्वारे माणसांना होतात. झुनोटिक रोग सौम्य व गंभीर स्वरुपाचा असतो तर कधीकधी हा प्राणघातकही ठरु शकतो. 

वन्यजीवांचा रहिवास नष्ट करून त्यांचे निवासस्थान असलेल्या भागात घरे बांधल्याने वन्य प्राण्यांच्या संपर्कात वाढ होऊ लागली आहे. वन्य प्राणी आणि पशुधनाला स्पर्श करण्याच्या लोकांच्या इच्छेमुळे पाळीव प्राणीसंग्रहालयाची स्थापना झाली. अमेरिका आणि इतर देशांमध्ये पाळीव प्राण्यांची संख्या वाढत असल्याने पाळीव प्राण्यांच्या संपर्कात सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. परिणामी, झुनोटिक संसर्ग होण्याचा धोकाही बळावत आहे. 

प्राण्यांच्या संपर्कात आल्यामुळे होऊ शकणारे आजार टाळण्यासाठी प्राणी किंवा त्यांच्या वातावरणाच्या संपर्कात आल्यानंतर हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुवावे. घरात किंवा घराच्‍या आजूबाजूस उंदीर अथवा इतर प्राण्‍यांचा प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी खबरदारी घ्यावी. परिसरात मृत उंदीर किंवा माकड आढळल्‍यास त्वरित आरोग्‍य विभागास माहिती द्यावी. केरकचरा वाढल्याने घुशींसारख्या कुडतरणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत वाढ होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आजुबाजूचा परीसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी. उघड्यावर शौच करु नये. पाळीव प्राण्यांची स्‍वच्‍छता व निगा राखावी. संसर्गजन्य प्राणी रोगाचा उद्रेक झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. प्राणी रोगाचा प्रादुर्भाव ओळखणे, प्राण्यांपासून होणाऱ्या रोगांची कारणे ओळखणे, पाळीव प्राण्यांना बसण्यासाठी तयार केलेल्या जागेची स्वच्छता राखणे, रोगाच्या लक्षणांबाबत सावध राहणे, परदेशातून प्राणी आयात करताना आवश्यक नियमांचे पालन करणे, पाळीव प्राण्यांना वेळोवेळी प्रतिजैविक लस देणे यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास प्राण्यांमुळे होणाऱ्या रोगांपासून आपण स्वतःचे रक्षण करु शकतो.


स्त्रिग्धरा नाईक