मराठी कवितेत रमलेल्या कानडी भाषिक दयाताई

कविता ही प्रत्येकाच्या मनातील भावनांचा हुंकार! संवेदनशील मनाच्या आतल्या कुपीत कवितेचे बीज अंकुरले, की मग ती व्यक्त होताना तिला भाषेचे बंधन नसते. अंतर्मनातून ही कविता स्फुरताना ती शब्दातून साकारते तेव्हा तिच्या आवडत्या माध्यमातून ती व्यक्त होते.

Story: तू चाल पुढं |
06th July, 05:16 am
मराठी कवितेत रमलेल्या कानडी भाषिक दयाताई

ज्येष्ठ साहित्यिका दयाताई मित्रगोत्री या ज्येष्ठ साहित्यिका. मातृभाषा जरी कानडी भाषा असली आणि घरी जरी सर्व कानडी भाषेतूनच संवाद साधत असले तरी शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने त्या मराठीतून लेखन करतात. त्यामुळे मराठी-कानडी हा भाषिक द्वेष त्यांच्यापाशी सापडत नाही, हे विशेष कौतुक आहे. कानडी भाषा आणि मराठी भाषा या दोन्ही भाषांबरोबर त्या कोंकणी, हिन्दी, इंग्रजी या भाषाही अस्खलित बोलतात. कविता हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून त्याचबरोबर त्या ललित लेखनही करतात.

साहित्यनिर्मिती ही लिहिणार्‍या प्रतिभेचा आविष्कार असतो. मग त्यात अडथळा कसा आणि का यावा? असे आपले मत मांडणार्‍या दयाताई १९८६ पासून गोवा विद्यापीठाच्या ग्रंथालयात सीनियर लायब्ररी असिस्टंट म्हणून काम करत होत्या. त्या सध्या आपले निवृत्त जीवन शांतपणे जगत आहेत आणि त्याचबरोबर साहित्याची सेवा करण्याचे कार्य अजूनही त्या करत आहेत.

इतिहास हा विषय घेऊन एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या दयाताई यांनी ग्रंथालय शास्त्रामध्ये मास्टर डिग्री घेऊन काम सुरू केले. हे करत असतानाच त्यांनी ग्रंथालय शास्त्रात एम.फील ही पदवी घेतली. वाचनाची आवड त्यांना लहानपणापासूनच होती. त्यामुळे ग्रंथालयात नोकरी करताना त्याचा चांगला उपयोग झाला. आणि अगदी मनसोक्त वाचनाची त्यांना संधी लाभली.

या मनसोक्त वाचंनामुळेच त्यांना कविता लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. सुरुवातीला लिहिलेल्या कविता वाचताना त्यांना आपण काहीतरी लिहितो आहोत, याचाच आनंद  झाला आणि आपण लिहिलेल्या कविता इतरांनाही आवडत आहेत, हे त्यांना जाणवयाला लागले आणि मग त्यांची लिहिण्याची उमेद वाढत गेली.

ग्रंथालयात नोकरी करताना घरातील जबाबदारीची कामे सांभाळून आल्या गेल्याचे आदरातिथ्य करताना साहित्याची आवड जपताना साहित्य निर्मिती करणे हे कठीण काम आहे. कारण बसलो आणि लिहिले असे होत नाही. लिहिण्याकरता मनाची तयारी व्हावी लागते. असे असले तरी जशी स्फूर्ती येत राहील तसतसे दयाताई लिहित गेल्या आणि त्यांचे साहित्य हे आकार घेऊ लागले.

यातूनच त्यांनी लिहिलेल्या “ पाउलठसे “  या चारोळी संग्रहाचे प्रकाशन झाले. त्यानंतर मौनातली कविता, कवितेच्या सावल्या ही त्यांची कवितांची पुस्तके प्रकाशित झाली. धी गोवा हिंदू असोशीएशन, विलेपार्ले, मुंबई तसेच गोमंत विद्या निकेतन, मडगाव या संस्थांचा काव्यपुरस्कार त्यांना प्राप्त झाला असून स्व.नरेंद्र बोडके यांनी प्रकाशित केलेल्या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. गोवा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्याचा समावेश आहे. कपूर वासनिक यांनी प्रकाशित केलेल्या प्रतिनिधिक काव्यसंग्रहातही त्यांच्या कवितांचा समावेश असून नांदेड विद्यापीठात अभ्यासक्रमात त्याचा समावेश करण्यात आला आहे.  

आतापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या कवी संमेलनात सक्रीय सहभाग घेतला आहे. आकाशवाणी व दूरदर्शन वर कवितांचे सादरीकरण केले आहे. गोव्यातील अनेक दैनिकात, मासिकात आणि दिवाळी अंकात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. या शिवाय त्यांचे ललित लेखही प्रसिद्ध झाले आहेत. दयाताई आज जरी आपले निवृत्त जीवन जगत असल्या तरी त्यांची प्रवासाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. केवळ भारतातच नव्हे तर त्यांनी परदेशातही भटकंती केली आहे. त्यामुळे त्यांना जीवनाचा पुरेपूर आनंद घेता आला. हातावर हात ठेवून आपले जीवन जगण्यापेक्षा जग फिरताना त्याचा आनंद लुटा हे सांगताना दयाताईंच्या डोळ्यांतील चमक लुभावून जाते. साहित्याप्रती लगाव ठेवताना जीवनात आलेले अनुभव आपल्या कवितांमधून मांडताना त्यांची कविता अधिकाधिक प्रगल्भ होत जात आहे.

आज सत्तरीकडे झुकलेल्या दयाताई यांचा कामातील उत्साह अनेकांना लाजवणारा असाच आहे. अनेक साहित्यिक कार्यक्रमांत त्या आजही उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. साहित्याचा आस्वाद अगदी भरभरून घेतात. आणि आपल्यासोबत इतरांनाही साहित्यातून जगण्याचा आनंद देतात.


कविता प्रणीत आमोणकर, रावणफोंड, मडगाव