आला पावसाळा, डासांपासून सांभाळा !

पाऊस खिडकीतून बघण्यास जेवढा हर्षदायक वाटतो, तेवढाच रेनकोट-छत्री सांभाळत पावसातून फिरताना तो नकोसा वाटून जातो. अजून एका कारणासाठी हा नकोसा वाटू लागतो, ते म्हणजे पावसासोबत येणारे आजार.

Story: आरोग्य |
06th July, 04:40 am
आला पावसाळा, डासांपासून सांभाळा !

आजारांचा हंगाम असणाऱ्या पावसाळ्यात फ्लूसोबत डासांपासून होणारे संसर्गही बर्‍याचशा प्रमाणात आढळून येतात. एरवीही डासांमुळे होणाऱ्या संसर्गांचा उपद्रव वर्षभर होत असला तरी पावसाळ्यात याचे प्रमाण खूप वाढते.

पावसाळ्यात डासांपासून पसरणारे संसर्ग कोणते? 

मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, झिका, फिलारियासिस, व्हायरल एंसिफिलाइटिस हे डासांमुळे होणारे संसर्ग, जास्त प्रमाणात आढळून येतात. गोव्यात सध्या डेंग्यूच्या संसर्गाचे रूग्ण वाढतच चालले आहेत. तसेच झिका संसर्गाचे रुग्णही आढळून येत आहेत.

मलेरिया : मलेरियाच्या आजारासाठी व्हायव्हॅक्स आणि फॉल्सीपेरम ह्या प्रकारचे डास सर्वात जास्त कारणीभूत ठरतात. फॉल्सीपेरममुळे झालेल्या मलेरियामध्ये सेरेब्रल ताप व शारीरिक प्रणालीमध्ये त्रास निर्माण होऊ शकतो व गंभीर ठरू शकतो. मलेरिया हा संसर्ग झालेल्या ऍनाफिलिस डासाद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पसरतो. लक्षणांमध्ये खूप जास्त ताप येणे, थंडी वाजणे, थरथरणे, डोकेदुखी, उलटी येणे हे दिसून येते. काही रुग्णांमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होणे, कावीळ, किडनी व श्वसनसंस्था निकामी होणे हे त्रास होऊ शकतात.

घाण पाण्याची डबकी, अस्वच्छ ठिकाणी मलेरियाच्या डासांची वाढ होते. रुग्णांची लक्षणे, ताप, ब्लड स्मीयर आणि मलेरियल अँटीजेन टेस्टिंग यावरून आजाराचे निदान केले जाते. अंगात ताप असताना घेतलेल्या रक्तावरून सर्वात अचूक निष्कर्ष काढले जाऊ शकतात. रक्त तपासणीबरोबर इलेक्ट्रोलाईट्स, यकृत व किडनी यांच्या तपासण्यादेखील केल्या जाऊ शकतात. औषधांमध्ये क्लोरोक्वीन, आर्टेमिसिनिन ग्रुप, टेट्रासायक्लिन्स इत्यादींचा समावेश होतो. यासोबत उपचारांमध्ये भरपूर द्रव पदार्थांचे सेवन करून शरीर हायड्रेटेड ठेवण्यास सांगितले जाते.

डेंग्यू : डेंग्यूचा संसर्ग हा ‘एडिस इजिप्ती’ ह्या प्रकारच्या डासांमार्फत पसरतो. हे डास दिवसा चावणारे असतात. ह्या डासांची उत्पत्ती साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. विषाणू बाधित डास चावल्यानंतर डेंग्यूची लक्षणे साधारणतः पाच ते सात दिवसांत दिसू लागतात. अधिक तीव्रतेचा ताप, डोळे आणि डोके दुखी, अंगदुखी, अशक्तपणा, तोंडाला कोरड पडणे, उलट्या होणे, त्वचेवर लाल व्रण उठणे ही लक्षणे दिसतात. शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर प्रमाणात रक्तस्त्राव होणे, शरीरातील अनेक अवयव निकामी होणे, रक्तदाब कमी होणे आणि संपूर्ण शरीर यंत्रणा कोलमडणे असे गंभीर प्रकार देखील होऊ शकतात. 

सिरीयल प्लेटलेट आणि अँटीजेन टेस्टिंग यासारख्या लक्षणांवरून आजाराचे निदान केले जाते. प्लेटलेट पेशी वीस हजारापेक्षा कमी होत असल्यास रुग्णास रक्त प्लेटलेट्स ट्रान्सफ्यूजन कराव्या लागतात. म्हणजे ब्लड बँकेतून मागवून रुग्णास चढवाव्या लागतात. रुग्णाची अवस्था अतिशय गंभीर झालेली असल्यास त्याला संपूर्ण वेळ वैद्यकीय देखभाल मिळावी यासाठी रुग्णालयात भरती करून क्रिटिकल केयर द्यावी लागू शकते.

चिकुनगुनिया : चिकुनगुनियाचा विषाणू थेट डास चावल्याने पसरवला जातो. यामध्ये अचानकपणे ताप व सांधेदुखी दिसून येते. अचानक उच्च ताप येणे, सांधेदुखी, डोकेदुखी, मायल्जिया, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, मळमळ, उलट्या होणे, पुरळ येणे ही लक्षणे दिसतात. रक्ताच्या नमुन्यावर आयजीजी, आयजीएम, आरटी पीसीआर टेस्ट्स करून आजाराचे निदान केले जाते. यावर कोणतीही विशिष्ट थेरपी उपलब्ध नसल्याने उपचारांमध्ये द्रव पदार्थांचे भरपूर प्रमाणात सेवन, नॉन-स्टिरॉइडल एनालजेसिक्स आणि लक्षणांवरील उपचारांसाठी अँटिव्हायरल्सचा समावेश केला जातो. 

झिका ताप : स्नायू दुखणे, डोकेदुखी, ताप, त्वचेवरील चट्टे, डोळे दुखणे, डोळे गुलाबी होणे ही झिका तापाच्या संसर्गाची सर्वसामान्य लक्षणे आहेत. याशिवाय झिका संसर्ग झालेल्या गर्भवती महिलांचा गर्भपात होण्याचा आणि नवजात बाळामध्ये जन्मजात दोष उत्पन्न होण्याचा देखील संभव असतो. आयजीएम-एलिसा अँटीबॉडीज टेस्टिंग करून आजाराचे निदान केले जाते. 

फिलॅरियासिस : डासाच्या चाव्यातून होणारा आणि पसरणाऱ्या या संसर्गात खूप जास्त ताप, थंडी वाजणे, अंग थरथरणे, पाय किंवा आजारग्रस्त भाग सुजणे, लालसरपणा, स्क्रोटम ग्रंथी वाढणे ही लक्षणे दिसतात. हत्तीरोग हा फिलॅरियासिसमुळे होतो. अंगात ताप असताना ब्लड स्मीयर टेस्टिंग करून आजाराचे निदान केले जाते. डीसीसी अँटिबायोटिक्स व लक्षणांवर औषधे देऊन उपचार केले जातात.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर