विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरूच ! नीट यूजी, यूजीसी-नेटनंतर एफएमजीई-२०२४ पेपरही फुटला

परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा उद्या सहा जुलै रोजी पार पडणार आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे, काल ४ जुलैपासूनच टेलिग्रामवर पेपर विक्री होत असल्याची बातमी समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
05th July, 01:56 pm
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरूच ! नीट यूजी, यूजीसी-नेटनंतर एफएमजीई-२०२४ पेपरही फुटला

केरळ : टेलिग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशनच्या प्रश्नपत्रिका विकल्या जात असल्याची माहिती केरळ पोलिसांना मिळाली व त्यांनी याप्रकरणी गुन्हादेखील दाखल केला. ६ जुलै रोजी होणाऱ्या एफएमजीई-२०२४ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याच्या जाहिराती ४ जुलैला सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशनद्वारे परदेशातून एमबीबीएस केलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळतो.  ही परीक्षा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनद्वारे आयोजित केली जाते.

तिरुअनंतपुरममधील सिटी सायबर क्राइम पोलिसांनी एफएमजीई-२०२४ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या विक्रीची जाहिरात करणाऱ्या टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, असे राज्य पोलिस प्रवक्त्याने सांगितले. प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, हा गुन्हा सार्वजनिक परीक्षा (अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध) कायदा २०२४ अंतर्गत नोंदवण्यात आला आहे, या कायद्यांतर्गत नोंद झालेला केरळमधील अशा प्रकारचा हा पहिलाच गुन्हा आहे.पोलिसांच्या सायबर विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून, टेलिग्राम चॅनेलसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चोवीस तास देखरेख सुरू केली आहे.

फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशनची परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत आव्हानात्मक आहे. त्याचा निकाल सरासरी १० ते ३० टक्क्यांच्या दरम्यानच लागतो.  या परीक्षेत ३०० बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असलेला एक पेपर असतो. पेपर एकाच दिवशी दोन भागात दिला जातो आणि प्रत्येक भागात १५० प्रश्न असतात. हे प्रश्न सोडवण्यासाठी १५० मिनिटांचा अवधी मिळतो. परदेशी वैद्यकीय पदवीधरांनी त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर १० वर्षांच्या आत FMGE/NEXT परीक्षेला बसणे अनिवार्य आहे. जर एखाद्याने परदेशातून एमबीबीएस केले असेल आणि त्याला भारतात वैद्यकीय परवाना घ्यायचा असेल, तर त्याला एमबीबीएस पदवी पूर्ण झाल्यानंतर १० वर्षांच्या आत FMGE/NEXTपरीक्षेला बसावे लागते. ही परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. 

हेही वाचा