भारतीय महिला संघाकडून आफ्रिकेचा धुव्वा

स्मृती मंधानाचे सहावे शतक : आशा शोभनाचे पदार्पणातच ४ बळी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17th June, 12:00 am
भारतीय महिला संघाकडून आफ्रिकेचा धुव्वा

बेंगळुरू: स्मृती मंधानाच्या सहाव्या शतकानंतर पदार्पण सामना खेळत असलेल्या आशा शोभना (२१ धावांत ४ विकेट) हिच्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने रविवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा १४३ धावांनी पराभव केला.
बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने ८ विकेट गमावत २६५ धावा केल्या आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला ३७.४ षटकात १२२ धावांवर गुंडाळले. यासह, भारतीय महिला क्रिकेट संघाने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी अनुभवी सुने लुसने ३३ आणि मारिजन कॅपने २४ धावांचे योगदान दिले. चौथ्या विकेटसाठी दोघांमधील ३९ धावांची भागीदारी तुटल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले.
स्मृती मंधानाच्या सहाव्या एकदिवसीय शतकाच्या जोरावर, भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २६६ धावांचे लक्ष्य ठेवले.लक्ष्याचा बचाव करताना रेणुका सिंगने (३० धावांत १ बळी) पहिल्याच षटकातच कर्णधार लॉरा वुलफार्टला (४) बाद करून भारताला चांगली सुरुवात करून दिली. पूजाने अनेका बोशला (५) पायचीत केले, तर दहाव्या षटकात दीप्तीने तेजमिन ब्रिट्सला (१८) पायचीत करून दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. अवघ्या ३३ धावांत तीन विकेट्स गमावल्यानंतर लुस आणि कॅपने सावध फलंदाजी करत पुढील १० षटकांपर्यंत भारतीय गोलंदाजांना विकेटपासून दूर ठेवले.आशाने कर्णधार हरमनप्रीतकडे कॅच मिळवून ही भागीदारी तोडली. दक्षिण आफ्रिकेच्या पुनरागमनाच्या आशांना दीप्तीने एलबीविंग करून लुसला मोठा धक्का दिला. यष्टिरक्षक फलंदाज सिनालो जाफ्ताने नाबाद २७ धावा केल्या. पण आशाने दुसऱ्या टोकाकडून शेवटच्या तीन विकेट घेत भारताचा विजय निश्चित केला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. भारतीय संघाचा निम्मा संघ ९९ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला होता. मात्र, सलामीवीर आणि उपकर्णधाराने एक टोक राखून आधी अर्धशतक झळकावून आणि नंतर त्याचे शतकात रूपांतर करून संघाला मजबूत स्थितीत आणले. संघाच्या ४६.१ षटकात २३८ धावा असताना मंधाना बाद झाली. तिने १२७ चेंडूत १२ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ११७ धावांची शानदार खेळी खेळली आणि कारकिर्दीतील सहावे शतक पूर्ण केले.
सलामीवीर मंधानाने शेफाली वर्मा (७), डायलन हेमलता (१२), कर्णधार हरमनप्रीत कौर (१०) जेमिमा रॉड्रिग्ज (१७) ऋचा घोष (३) दीप्ती शर्मा (३७) तर पूजा वस्त्राकरने नाबाद ३१ धावा केल्या.
मंधानाच्या सात हजार धावा पूर्ण
मंधानाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सात हजार धावा पूर्ण केल्या. ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. तिच्या पुढे भारताची माजी कर्णधार मिताली राज आहे. जिच्या नावावर १०८६८ धावा आहेत. या यादीत कर्णधार हरमनप्रीत कौर ६८७० आंतरराष्ट्रीय धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यासह, स्मृती महिला क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून ५० हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील झाली आहे. न्यूझीलंडच्या सुझी बेट्सने महिलांच्या एकदिवसीय मालिकेत ३२ वेळा ५०पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर शार्लोट एडवर्ड्स (२८ वेळा) दुसऱ्या स्थानावर आणि मानधना (२७ वेळा) तिसऱ्या स्थानावर आहे.
सलामीवीर म्हणून ५० हून अधिक धावा करणाऱ्या महिला
३२ वेळा सुझी बेट्स
२८ वेळा शार्लोट एडवर्ड्स
२७ वेळा स्मृती मंधाना
२७ वेळा लॉरा वोल्वार्ड
२५ वेळा बेलिंडा क्लार्क