म्हापशात अज्ञातांकडून पालिकेचे ४० वर्षांपूर्वीचे सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th June, 12:40 am
म्हापशात अज्ञातांकडून पालिकेचे ४० वर्षांपूर्वीचे  सार्वजनिक शौचालय जमीनदोस्त

म्हापसा : विठ्ठलवाडी, अन्साभाट येथील म्हापसा पालिकेच्या मालकीचे सार्वजनिक शौचालय अज्ञातांनी जेसीबीचा वापर करून जमीनदोस्त केले. यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिका अभियंत्यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

शनिवार, १५ रोजी संध्याकाळी ५.३० वा. सुमारास विठ्ठलवाडी येथील मॉर्डन सोफ फॅक्टरी जवळील सार्वजनिक शौचालयाची इमारत जमिनदोस्त करण्यात आली. यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. पालिकेच्या मालकीचे शौचालय दिवसाढवळ्या पाडण्याच्या प्रकाराबद्दल रहिवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

हा प्रकार समजताच पालिका कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत शौचालय जमीनदोस्त झाले होते. पालिकेच्या मालकीचे हे शौचालय पाडण्यात आले असले तरीही रात्री उशीरापर्यंत पालिकेने या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

म्हापसा नगरपालिकेने १९८५ मध्ये विठ्ठलवाडी व इतर परिसरातील लोकांच्या सोयीसाठी हे शौचालय उभारले होते. यासाठी येथील एका व्यक्तीने पालिकेला ही जमीन दान केली होती. २०१५ पर्यंत या शौचालयाचा वापर केला जात होता. परंतु देखभाली अभावी ही शौचालय इमारत जीर्ण होऊन मोडकळीस आली होती.

त्यानंतर २०१५ मध्ये स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाची दुरूस्ती करण्याचा निर्णय पालिका मंडळाने घेतला होता. यासाठी ९ लाखांचे अंदाजपत्रक तयार केले होते. भारत पेट्रोलियम कंपनी मार्फत शौचालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण करोना महामारीमुळे ही प्रक्रिया बंद पडून हे शौचालय मोडकळीस आले व चार वर्षांपासून ते वापराविना पडून आहे.

विठ्ठलवाडी येथील सार्वजनिक शौचालयाची इमारत अज्ञातांनी जमिनदोस्त केली आहे. पालिकेने याची गंभीर दखल घ्यावी व चौकशी करून तत्काळ पोलिसांत तक्रार करावी, असे माजी नगरसेवक तुषार टोपले यांनी सांगितले. 

पालिकेच्या शौचालयाची इमारत पाडण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. त्यानुसार संबंधित पर्यवेक्षकाला पाहाणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पालिका अभियंता प्रदीप नार्वेकर यांनी सांगितले.  

हेही वाचा