मस्तीखोर गोट्याची कमाल

Story: छान छान गोष्ट |
16th June, 06:07 am
मस्तीखोर गोट्याची कमाल

गोट्या नावाचा एक मुलगा होता. तो जरासा मस्ती करायचा. सतत काही न काही करत राहायचा. स्वस्थ बसणे जणू काही त्याला जमतच नसायचे. या स्वभावामुळे शाळेत सतत शिक्षकांकडून त्याला शिक्षा मिळे. मस्तीखोर म्हणून मुले त्याला चिडवत.  मग तो चिडून अजून मस्ती करायचा. त्याच्या आईला याचा खूप राग येई. ती त्याला समजवयाची की, बाळा सतत मस्ती करणे बरे नव्हे. त्याला हे समजायचे. तो खूप प्रयत्न करायचा मस्ती न करण्याचा पण एकदा कानफाट्या नाव पडल्यामुळे शाळेत काहीही झाले तरी मुले त्याच्याकडे बोट दाखवायची. गोट्याला पुस्तक वाचायला खूप आवडायची. पुस्तक वाचताना मात्र तो तहान भूक विसरून जायचा. मस्ती करणं विसरून जायचा. साहसी मुलांच्या गोष्टी वाचायला त्याला फार आवडायच्या.

एकदा शाळेतून सर्व मुलांना ट्रेकिंगसाठी एका डोंगरावर नेण्यात आले. गोट्यावर नजर असल्यामुळे शिक्षकांनी त्याला आपल्यासोबत ठेवले होते. गोट्याला ट्रेकिंग फार आवडायचे. त्यामुळे तो रमत गमत ट्रेकिंगचा आनंद घेत गेला. काही मस्तीखोर मुले शिक्षकांचा डोळा चुकवून दरीसारख्या भागात असलेल्या तळ्याकडे गेली. अंदाज न आल्यामुळे सर्व मुलं खाली घसरली. मोठ्ठा गोंधळ झाला. काय करावे कुणाला सुचेना. गोट्या मात्र लगेच आजूबाजूला निरीक्षण करू लागला. तिथे त्याला काही वेली दिसल्या. त्याने लगेच त्या तोडून खाली दरीत फेकल्या. व दुसरे टोक शिक्षकांना धरायला सांगितले. त्या दोरीच्या सहाय्याने मुले वर चढू लागली,  गोट्या त्यांना  मार्गदर्शन करत होता. पण एक मुलगा घाबरून खालीच राहिला. गोट्या लगेच दरीत उतरला आणि त्या मुलाला वर चढण्यास मदत केली. हे सगळं करताना त्याला हातापायाला जखम झाली. वर सुखरूप आल्यानंतर शिक्षकांनी सर्वांना मलमपट्टी केली.  यानंतर  सगळेजण  घरी  परतू लागले. त्यावेळी  शिक्षकांनी गोट्याचे  कौतुक केले. सर्वांनी गोट्याचे खूप कौतुक केले. घरी जाऊन आईला हे सांगितल्यावर तिला खूप आनंद झाला. गोट्याला त्या दिवशी समजले की, आपली ऊर्जा मस्तीत न घालवता चांगल्या कारणासाठी वापरली तर सर्वांनाच आनंद होतो.  या  त्याच्या  साहसाबद्दल  त्याला २६ जानेवारीला  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पदक मिळाले. गोट्या हुशार होताच पण त्या दिवसापासून तो शहणाही झाला.


आयुष सुभाष परब, इयत्ता: सहावी, के.ब. हेडगेवार विद्यामंदिर, कारापूर, तिस्क-साखळी