विरोधकांनी वास्तव स्वीकारण्याची गरज!

नव्या लोकसभेत शक्तिशाली असा विरोधी पक्ष दिसणार आहे. आता त्याचा वापर कामकाज रोखण्यासाठीच फक्त केला जाणार असेल तर ते आपल्याच पायावर दगड घालून घेण्यासारखे होईल. काँग्रेसला अठराव्या लोकसभेत गुणात्मक कामकाजावरच अधिक भर द्यावा लागेल तरच त्यांचा पुढचा प्रवास लाभदायक ठरेल, एवढेच आज सांगता येईल.

Story: विचारचक्र |
11th June, 12:42 am
विरोधकांनी वास्तव स्वीकारण्याची गरज!

अमेरिकेत सुरू असलेल्या टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत परवा रविवारी न्यूयॉर्क येथे खेळल्या गेलेल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महत्त्वपूर्ण सामन्यात प्रत्येक भारतीय रोहित शर्माच्या संघाच्या विजयासाठी प्रार्थना करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय विरोधक मात्र पाकिस्तानचा विजय व्हावा यासाठी देव पाण्यात बुडवून बसले होते असे म्हटले तर अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. पाकिस्तानचा विजय एकवेळ दृष्टिपथातही होता त्यावेळी भारतीय संघाच्या पराभवावर नेमक्या प्रतिक्रिया काय द्यायच्या याची तालीम आपले संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली चालू होत्या, अशीही चर्चा आहे. पण हाय रे दैवा! भारतीय संघाने पाकिस्तानच्या घशातून त्यांच्या विजयाचा घास अक्षरशः काढून घेतला आणि चित्तथरारक अशा विजयाची नोंद केल्याने अनेक राजकीय धेंडांना पोटदुखीचा बराच त्रास झाला. पाकिस्तानचा विजय झाला असता तर त्याचे सारे खापर तिसऱ्यांदा रविवारीच पंतप्रधानपदी आरूढ झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या माथ्यावर फोडण्याची सारी तयारी झालीही होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुदैव की, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी जी जिगर दाखवली त्यास नशिबाची साथ मिळाली आणि पाकिस्तानची पुरती फजिती झालेली पाहण्याची वेळ मोदी विरोधकांवर आली. 

एकदिवसीय विश्वचषक अहमदाबादला हातातून निसटल्यानंतर ममता बॅनर्जी, उध्दव ठाकरे, संजय राऊत आदिंनी नरेंद्र मोदींवर नाना आरोप आणि चिखलफेक केली. त्याच्या आठवणी ताज्या असतानाच आणखीन एक संधी विरोधकांकडे चालून आली होती, पण दुर्दैव असे की मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे सलग तिसऱ्या वेळी हातात घेतली त्याच दिवशी पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रावर क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने मिळवलेल्या विजयाने एकूण विजयोत्सवास सोनेरी किनार लाभली जी अनेकांच्या पचनी पडली नाही. भारतीय क्रिकेट संघाला यदाकदाचित या सामन्यात हार पत्करावी लागली असती तर त्यावर कसे व्यक्त व्हायचे यासाठीची विरोधकांची स्क्रिप्ट अगदी तयार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी पनवती असल्यानेच हे घडले आहे आणि ही सुरुवात मोदींसाठी अशुभ असल्याचा जावईशोधही त्यांनी लावला असता. पण कोट्यवधी भारतीयांच्या सुदैवाने तसे घडले नाही आणि विरोधकांची आणखीन एक स्क्रिप्ट कचऱ्याच्या डब्यात गेली. राजकीय विरोधालाही अखेर मर्यादा असायला हव्यात, जेथे थांबायची गरज असते तेथे थांबायलाच हवे पण तसे होताना आज दिसत नाही. भारतीय संघाच्या पाकिस्तानवरील विजयाचे अगदी मनापासून कोणी मोदी विरोधकांनी स्वागत केल्याचे दिसून येत नाही, मात्र भारतीय संघ हरला असता तर त्याची सांगड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याशी घालून त्याला वेगळीच दिशा देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलाच नसता, असे म्हणण्याचे धाडस कोणी करेलच असे म्हणता येणार नाही.

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ होतानाचा राष्ट्रपती भवनात आयोजित भव्य दिव्य सोहळा रविवारी सायंकाळी साऱ्या जगाने पाहिला. पाकिस्तानचा अपवाद सोडल्यास भारताच्या सगळ्याच शेजारी देशांचे राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान या सोहळ्यात प्रत्यक्ष हजर राहून त्याचा आनंद लुटत होते, तर त्या तेथे न्यूयॉर्कमध्ये आपलाच संघ आपला शत्रू देश असलेल्या पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावर अमेरिकेच्या साक्षीने लोळवत होता. यातून नेमका निष्कर्ष काय काढावा, तो कोणीही काढावा, पण पाकिस्तानच्या पराभवाने कोणी चिंतित झाले असेल तर त्यांच्या पोटात का दुखतेय हे न कळण्याएवढी सर्वसामान्य जनता निश्चितच निर्बुद्ध नाही. निवडणुकीच्या मैदानावर जे काही घडले आणि जो निकाल आला तो तेवढ्याच नम्रतेने स्वीकारून पुढे जाणे ही काळाची गरज आहे, पण तसे होताना दिसत नाही. उघड्या डोळ्यांना जे स्पष्ट दिसते ते स्वीकारण्याची तयारी अजिबात दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवाहरलाल नेहरूंच्या विक्रमाशी बरोबरी करणाऱ्या शपथविधी सोहळ्यात सगळे शेजारी देशांचे राष्ट्राध्यक्ष वा पंतप्रधान उपस्थित राहतात पण विरोधी काँग्रेस पक्षाच्या सांसदीय नेत्या सोनिया गांधी, काँग्रेसचे पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून ज्यांचे नाव घेतले  जात होते ते राहुल गांधी तसेच अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या सोहळ्यावर बहिष्कार घालावा यामागील कारणे न समजण्यासारखी आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची तेवढी उपस्थिती या सोहळ्यात दिसून आली. आता त्याबद्दल त्यांना त्या पक्षात कोणी जाब विचारणार नाहीत, एवढी निदान आशा आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्वबळावर २४० जागा जिंकल्या असताना नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदासाठीच्या विक्रमी शपथविधी सोहळ्यास अपशकून करण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून झाला आणि अजून जो होत आहे, त्याचे कोणी समर्थन करू शकणार नाही. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनापर्यंत जाऊन त्यांना राहुल गांधी मिठी मारत असतानाचा तो जुना प्रसंग आठवा. आज राहुल गांधी यांच्याकडून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अशाच मिठीने अभिनंदन झाले असते आणि निवडणुकीत जे काही घडले ते सगळे विसरून महान अशा भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय सुरू करण्यात आपले पूर्ण सहकार्य राहील एवढेच काय ते आश्वासन मिळाले असते, तर ते सोन्याहून पिवळे ठरले असते. पण राहुल गांधींचे जे तथाकथित सल्लागार आहेत त्यांना हे पटणारे नाही. नरेंद्र मोदी आमच्या सर्वांच्या नाकावर टिच्चून सलग तिसऱ्यांदा  पंतप्रधान होत आहेत, हे वास्तव विरोधकांना पचवणे जड जात आहे आणि अजून मोदींच्या मार्गात नवी विघ्ने कशी निर्माण करता येतील यावरच विरोधकांचा भर दिसतो. ईव्हीएम यंत्रांचा मुद्दा आता मागे पडला, हेही बरे झाले. अठराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीच्या निकालाने देशाला हीच सर्वात मोलाची भेट दिली आहे, असे मी म्हणेन. नव्या लोकसभेत शक्तिशाली असा विरोधी पक्ष दिसणार आहे. आता त्याचा वापर कामकाज रोखण्यासाठीच फक्त केला जाणार असेल तर ते आपल्याच पायावर दगड घालून घेण्यासारखे होईल. सलग तीन निवडणुकांत एकदाही शंभरी पार करू न शकणाऱ्या काँग्रेसला अठराव्या लोकसभेत गुणात्मक कामकाजावरच अधिक भर द्यावा लागेल तरच त्यांचा पुढचा प्रवास लाभदायक ठरेल, एवढेच आज सांगता येईल. 


वामन प्रभू

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच 

क्रीडा विश्लेषक आहेत)            

मो. ९८२३१९६३५९