बाबर आझम-शाहिन अफ्रिदीला घरी बसवा

वसीम अक्रम, वकार युनूस यांच्याकडून पाक संघाचे वाभाडे

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
11th June, 12:14 am
बाबर आझम-शाहिन अफ्रिदीला घरी बसवा

न्यूयॉर्क : पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी टी-२० विश्वचषकात भारताकडून पाकिस्तानच्या सहा धावांनी झालेल्या पराभवावरून बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघावर कठोर टीका केली आहे. 

वर्षाच्या सुरुवातीला संघाचा कर्णधार बदलल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी एकमेकांशी बोलत नाहीत. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे आणि तुम्ही तुमच्या देशासाठी खेळता. याचे भान या दोघांना असले पाहिजे. असेच सुरू राहिले तर या दोन्ही खेळाडूंना घरी बसवा, असे वसीम अक्रमने म्हटले आहे.

वकार युनूस म्हणाला, मला वाटते की भारताने खराब फलंदाजी करून पाकिस्तानला हा सामना जिंकण्याची चांगली संधी दिली. ते कदाचित १४०-१५० धावा सहज उभारू शकले असते. शेवटी त्या सात विकेट्स गमावल्याचा फायदा झाला नाही. भारत एक चांगला संतुलित संघ आहे. जर त्यांनी चांगली फलंदाजी केली नाही, तर त्यांना माहित आहे की त्यांच्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजासारखे गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे त्यांची भक्कम गोलंदाजी बाजू आणि क्षेत्ररक्षण देखील आहे, ज्यामुळे ते एक परिपूर्ण टीम बनतात. 

संपूर्ण संघच बदला : अक्रम

अक्रमने फखर जमान आणि इफ्तिखार अहमद हे फलंदाज अनेक वर्षे संघात असूनही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याचे सूचित केले. इफ्तिखार अहमदला लेग साइडवरील एक शॉट माहित आहे. तो अनेक वर्षांपासून संघाचा भाग आहे, पण फलंदाजी कशी करावी हे त्याला माहित नाही. पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की जर ते चांगले प्रदर्शन करत नाहीत, प्रशिक्षकांना काढून टाकले जाईल आणि त्यांच्याबाबत कोणताच निर्णय होणार. पण आता वेळ आली आहे की प्रशिक्षकांपेक्षा संपूर्ण संघ बदलण्याची, असे अक्रम म्हणाला.

पाकिस्तान संघाला ‘मेजर सर्जरीची’ गरज

या पराभवानंतर पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध बाबरच्या नेतृत्वाखालील संघाच्या कामगिरीवर टीका केली. ते म्हणाले की बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला ‘मायनर सर्जरी’ची गरज असल्याचे पूर्वी वाटत होते, परंतु भारताविरुद्धच्या पराभवानंतर ‘मेजर सर्जरी’ची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले.