सकाळी सकाळी टाच दुखते ?

सिद्धी चाळीशीतली नोकरदार महिला... तिची नेहमी तक्रार असते की, पायांच्या टाचा दुखताहेत.... पाय जमिनीवर टेकवल्यावर वेदना येतात व जातात. यामुळे कामावर भरपूर त्रास होतो. सकाळी उठल्या उठल्या पाय जमिनीवर लावता येत नाही. ही स्थिती तुम्हाला ओळखीची वाटत आहे का...?

Story: आरोग्य |
08th June, 12:32 am
सकाळी सकाळी टाच दुखते ?

सध्याची आपली जीवनशैली खूपच धावपळीची आणि दगदगीची आहे. दिवसभर आपण घर, नोकरी व किचनचा तोल सांभाळताना यातल्या जास्त वेळेस उभेच असतो. दिवसभर आपले लक्ष नसल्याने सकाळी झोपेतून उठून पाय खाली लावल्यावर पाय ठणकण्याचे आधी जाणवते. चालण्यास जमत नाही, तीन चार पावले कुटत चालल्यावर कुठेतरी थोडे बरे वाटते. 

पुढे जास्त वेळ बसून उठल्यावरही असेच दुखते. महिलांच्या बाबतीत अशा प्रकारची पाय दुखण्याची ही समस्या सर्रासपणे आढळली जाते. अगदी साधारण समस्या असं मानून आपण टाचदुखीकडे दुर्लक्ष करत जातो. हळूहळू कालांतराने ही समस्या मोठी होत जाते आणि आपले दैनंदिन जीवन अवघड करते.

आपल्या शरीररचनेनुसार शरीराचे बहुतेक वजन पोटरी वरून टाचांवर पडत असते. टाचांच्या रचनेमुळे शरीराचे वजन ते सहजपणे सहन करू शकते. चालताना व धावताना, जेव्हा टाच जमिनीवर आदळते, तेव्हा टाच शॉक अॅबजोर्बर सारखे काम करते व पायावरील दाब शोषून घेते. 

शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त दाब पायावर पडल्याने टाच दुखी सुरू होते. खूप वेळ उभे राहणे, कठीण पृष्ठभागावर सतत काम करणे, अयोग्य चपलांचा वापर, वाढलेले वजन, अपुरी झोप, पाणी कमी पिणे, जीवनसत्त्वांची कमतरता अशी अनेक कारणे यासाठी कारणीभूत असू शकतात.

टाचदुखीची कारणे

वाढलेले वजन: सामान्यपणे जेव्हा आपल्या पायांवर आपल्या शरीराचा अतिरिक्त भार येऊ लागतो तेव्हा टाचा किंवा गुडघे दुखायला लागतात. वजनवाढ झालेली असल्यास व टाचदुखीचा त्रास होत असल्यास आपले वजन आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करावा.

सतत उभे असणे : रोज स्वयंपाक करताना ओट्याजवळ दीड-दोन तास आपण उभे असतोच, त्यानंतर ऑफिसमध्येही अनेकींना उभे रहावे लागते. रोज उभे राहिल्याने काही वर्षानंतर टाचदुखीचा त्रास होऊ शकतो.

चुकीच्या मापाचे चप्पल : कधी कधी फॅशनच्या नावाखाली आपण आरामदायक चप्पलापेक्षा चुकीच्या मापाच्या, घट्ट सोल असलेल्या पण छान दिसणाऱ्या, फॅन्सी चपलाची निवड करतो. यामुळे पायावर तणाव येतो व  टाचेचे दुखणे मागे लागू शकते.

व्हिटॅमिन्स​​​​​​​ आणि कॅल्शिअमची कमतरता: आपल्या आहाराकडे नीट लक्ष न दिल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन्स आणि कॅल्शिअमची कमतरता निर्माण होऊ शकते. यामध्ये देखील टाचदुखी होऊ शकते.

व्यायामाचा अभाव : आपल्या पोटरीचे स्नायू घट्ट (टाईट) असल्यास, चुकीच्या पद्धतीने उभे राहण्याची सवय असल्यास, व्यायामाचा अभाव असल्यास टाचदुखीचा त्रास होऊ शकतो.

 वरील कारणांमुळे प्लांटार फॅसिआयटिस, ऍचिलीस टेंडिनायटिस, हील स्पर हे त्रास सुरू होऊ शकतात, ज्यामुळे टाचदुखी होते.

टाचदुखीवर उपाय

व्यायाम व चालणे: वजन जास्त असल्यास आपल्या वजनाचा भार पायांवर येतो. नियमित व्यायाम केल्याने व चालण्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते व पायदुखी कमी होते.

तणाव विरहित राहणे व नीट झोप घेणे : सततचा ताणतणाव, वेगवेगळ्या गोष्टींचे टेन्शन आणि विचार यामुळेही अंग आणि पायदुखीची समस्या उद्भवू शकते. ताणामुळे अपुरी झोप आणि त्यामुळे शरीराला आवश्यक तो आराम न मिळाल्याने पायदुखीची समस्या उद्भवते. यामुळे ताणविरहित राहणे व नीट झोप घेणे आवश्यक आहे.

स्ट्रेचिंग व स्ट्रेंदनींग : ताण पडल्याने, ताकद कमी झाल्याने व व्यायामाच्या अभावामुळे पोटरीचे स्नायू आखडतात व घट्ट होतात. यामुळे शरीराचे वजन पोटरीकडून टाचेवर योग्यरित्या पोचत नाही. अशा स्थितीत पोटरीचे स्नायू स्ट्रेच करणे व त्यांची ताकद वाढवणे आवश्यक ठरते.

कॉन्ट्रास्ट बाथ थेरपी : पाय दोन मिनिटे गरम पाण्यात बुडवून ठेवणे व एक मिनीट साध्या थंड पाण्यात बुडवून ठेवणे व असे ३-४ वेळा केल्याने टाचदुखीवर आराम मिळू शकतो.

बर्फ लावणे: पायाच्या सोलवर बर्फ झालेल्या पाण्याची बॉटल रोल करावी. व दुखणार्‍या जागी बर्फ लावल्याने सूज व दुख कमी होण्यास मदत होते.

योग्य पादत्राणे वापरणे : उंच टाचांचे, घट्ट सोलच्या चपला न वापरता योग्य मापाच्या चपला वापरणे व त्यासह टाचेला आधार देणार्‍या मऊ इनसोलचा वापर करावा. शुजच्या आत योग्य प्रकारचे हील सपोर्ट किंवा पूर्ण सोल सपोर्ट वापरल्याने पायाला बऱ्यांपैकी आधार मिळतो.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर