आपत्कालीन नियंत्रणची आज डिचोलीत बैठक

मान्सूनपूर्व कामांचा बैठकीत घेणार आढावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
29th May, 12:31 am
आपत्कालीन नियंत्रणची आज डिचोलीत बैठक

डिचोली शांतादुर्गा सर्कल जवळील नाल्याची मशिनरी घालून गाळ काढताना जलस्रोत खात्याचे कामगार. 

डिचोली : आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा, मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी बुधवारी सकाळी १० वा. छ. शिवाजी महाराज विद्यालयाच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीस आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेंद्र शेट तसेच तालुक्यातील विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मान्सूनपूर्व कामाची लगबग सध्या सुरू असून गेले दहा-बारा दिवस मान्सूनपूर्व वादळी पावसाने तालुक्यात थैमान घालताना सव्वा कोटीच्या आसपास नुकसानी घडवून आणली आहे. त्यातच डिचोलीत भुयारीवीज वाहिन्यांचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. आचारसंहितेमुळे काही ठिकाणी कामात अडथळे निर्माण झाल्याने विलंब झाला असला तरी हे सर्व काम मान्सून सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने बैठकीत चर्चा होणार आहे. तालुक्यातील मायनिंग पीठे, धोकादायक खाणी, गटार व्यवस्था, आपत्काली यंत्रणा सजग करणे, सर्व पंचायतीत आपत्कालीन नियंत्रण कक्ष सुरू करणे, तसेच वीज, पाणी, रस्ते तसेच धोकादायक वृक्ष यांबाबत जागृती आदींबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे.
पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करणे यामध्ये गटार साफ करणे, नालेसफाई, बंधारे खोदणे तसेच आरोग्याबाबत जागृती आदींचा आढावा बैठकीत घेण्यात येणार आहे. दरम्यान, डिचोली नदीच्या नाल्यात जलस्रोत खात्याने मंगळवारी गाळ उपसण्यासाठी मशिनरी म्हणून काम सुरू केले आहे.

पावसाळ्यात लोकांना त्रास होऊ नये, पुराचा फटका बसू नये, वीज, पाणी, आरोग्यसेवा तसेच आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्याच्या दृष्टीने स्थानिक आमदार डॉ. चंद्रकांत शेटये यांनी या बैठकीत विविध अधिकाऱ्यांना बोलावले आहे. या संदर्भात विविध विषय चर्चा करून सोडवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

हेही वाचा