‘चांद्रयान-४’द्वारे इस्रो आणणार चंद्रावरील खडकाचे नमुने : डॉ. विठ्ठल तिळवी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th May, 04:37 pm
‘चांद्रयान-४’द्वारे इस्रो आणणार चंद्रावरील खडकाचे नमुने : डॉ. विठ्ठल तिळवी

पर्वरी : मंगळावरील दुसऱ्या मोहिमेची तयारी ‘मंगळायन-२’ आधीच सुरू झाली अाहे. चांद्रयान-४ मोहिमेद्वारे इस्रो चंद्रावरील खडकाचे नमुने आणणार आहे, अशी माहिती येथील गोवा उच्च शिक्षण परिषद आणि उच्च शिक्षण संचालनालयाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ. विठ्ठल तिळवी यांनी दिली दिली. अमेरिकन दूतावासाने अमेरिकेच्या स्वातंत्र्याला २४८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई येथील ताजमहाल हॉटेलात आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात डॉ. तिळवी बोलत होते.


अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी व अमेरिकन कॉन्सुल जनरल माईक हॅन्की यांच्यासोबत चर्चा करताना गोव्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विठ्ठल तिळवी.

यंदाच्या वर्षी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची ‘अमेरिका-भारत सहकार्य' अशी संकल्पना होती. यावेळी डॉ. तिळवी यांनी भारतातील अमेरिकन राजदूत एरिक गार्सेटी, कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्यात्या डॉ. सुष्मिता मोहांती, तसेच अंतराळ-उद्योग आणि अवकाश संबंधित इतर विविध संस्थांमधील प्रतिनिधींची भेट घेतली.
 
माहिती विश्लेषणासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ हवे

परग्रहावरील मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अमेरिकेकडे जसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. तसे मनुष्यबळ भारतामध्ये उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे. ‘मंगळायन २' आणि ‘चांद्रयान -४' या मोहिमेद्वारे जी माहिती मिळणार आहे, त्या माहितीचे विश्लेषण करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज असल्याची माहिती डॉ. विठ्ठल तिळवी यांनी दिली.

प्रत्येक महाविद्यालयात संशोधन विकास सेलची स्थापना

उच्च शिक्षण संचालनालय आणि गोवा उच्च शिक्षण परिषदेत राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात संशोधन विकास सेल स्थापन करून सक्षम मानव संसाधन तयार करण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती डॉ. विठ्ठल तिळवी यांनी यावेळी दिली.

‘इंटरनॅशनल स्पेस स्टेशन'वर असेल भारतीय अंतराळवीर

या वर्षाच्या शेवटी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर म्हणजे अंतराळ प्रयोगशाळेत अमेरिका एका भारतीय अंतराळवीराला पाठवणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राजदूत एरिक गार्सेटी यांनी या कार्यक्रमात केल्याची माहिती डॉ. तिळवी यांनी दिली. २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका दौऱ्यात दिलेल्या वचनाची पूर्ती यंदाच होणार असल्याची माहिती एरिक गार्सेटी यांनी दिली, असे डॉ. तिळवी म्हणाले.

हेही वाचा