सवय खोटे बोलण्याची

आपल्या आयुष्यात कधी ना कधी मुलांच्या खोटं बोलण्याच्या सवयीमुळे आपण सगळेच त्रस्त झालो आहोत. तुमच्या मुलाच्या खोटे बोलण्याच्या सवयीमुळे कौटुंबिक वातावरण बिघडत जाते.

Story: पालकत्व |
18th May, 06:22 am
सवय खोटे बोलण्याची

जवळजवळ सर्वच पालक आपल्या मुलांना सत्य बोलावे आणि प्रामाणिक राहावे असे शिकवत असतात. मूल खोटं बोलतं तेव्हा पालकांना त्यांच्या पालकत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं की काय असं वाटणं साहजिकच आहे पण त्यात फार घाबरण्यासारखे काही नाही.

खोटे बोलण्याचे देखील वेगवेगळे प्रकार

(१) आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात जे क्षुल्लक खोटे बोलतो ते खरे तर आपल्या सामाजिक जीवनाचा भाग असतं. असे खोटे बोलणे प्रसंगानुरूप गरजेचे असते.

(२) काहीवेळा खोटे बोलणे हे नातेसंबंध खराब करते. विश्वास नष्ट करते.

(३) इतरांची त्रासदायक परिस्थिती दूर करण्यासाठी किंवा एखाद्याचा अहंकार कुरवाळण्यासाठी किंवा काही विशिष्ट आशा टिकवून ठेवण्यासाठी खोटे बोलले जाते.

अशाप्रकारे लहान मुलांचे खोटे बोलणे किंवा उगीच काहीतरी काल्पनिक कथा बनवणे हे सामान्य आहे. त्यासाठी घाबरण्याचे काही कारण नाही. किशोरवयीन असताना खोटे बोलणे ही चिंतेची बाब असू शकते, त्यामुळे किशोरवयीन मूल नेमके काय लपवण्यासाठी खोटे बोलले आहे, यावर लक्ष केंद्रित करा आणि मग योग्य उपाय शोधा.

लहान किंवा किशोरवयीन मूल खोटे का बोलते याची तीन मूलभूत कारणे समजून घ्या:

१) भीती : कधीकधी लहान किंवा किशोरवयीन मुले भीतीमुळे खोटे बोलतात. ही भीती मुख्यतः पालकांकडून शिवीगाळ किंवा मारहाण होण्याची  किंवा इच्छित कार्य करू न शकण्याची असू शकते. उदाहरणार्थ, जेव्हा मुले त्यांच्या हातातून महागडी क्रोकरी तोडतात, तेव्हा शिक्षा होईल या भीतीने पहिले खोटे बोलतात, नंतर ते लपवण्यासाठी, उद्भवणारी परिस्थिती त्यांना दुसरे खोटे बोलण्यास भाग पाडते आणि एकदा खोटे बोलल्यानंतर सलगपणे खोटे बोलले जाते. जर मुलाला खेळायचे असेल आणि तुम्ही त्याला काही काम सांगितले, तर अशा परिस्थितीत मूल ते काम टाळण्यासाठी खोटे बोलू शकते.

२) पालकांना आनंदी करण्यासाठी : बालमानसशास्त्रज्ञांच्या मते, मुलाचे त्याच्या पालकांशी एक अनोखे बंध असते आणि पालकांसोबतच्या त्यांच्या बंधामुळे मुलाला नेहमी त्यांना आनंदी पाहायचे असते. मुलांना त्यांच्या पालकांकडून त्यांच्याकडून ठेवलेल्या अपेक्षांचीही जाणीव असते, जसे की अधिक गुण मिळवणे, चांगले यश संपादन  करणे, बक्षिसे जिंकणे, कल्पकता वापरून एखादी कला अवगत करणे. परंतु जेव्हा ही गोष्ट त्यांच्याकडून शक्य होत नाही,  तेव्हा मुले पालकांना खुश करण्यासाठी खोटे बोलतात. या प्रकारचे खोटे बोलणे अनेकदा मुलाच्या स्वतःच्या कामगिरीबद्दल असते जसे की शाळेतील गुण, एखाद्या उपक्रमात सहभाग, गृहपाठ पूर्ण करणे इ.

३) विनाकारण खोटे बोलणे : मुले आणि किशोरवयीन मुलांचे जग प्रौढांच्या जगापेक्षा वेगळे असते. कारण त्यांची परिपक्वता पातळी वेगळी असते. म्हणूनच, अनेकदा ते असे खोटे बोलतात, ज्याने काही फरक पडेल असे त्यांना वाटत नाही. त्यांना काय बोलावे ते समजत नाही आणि जे मनात येईल ते बोलावे, असे वाटल्याने ते खोटेही असेल, याची त्यांना पर्वा नसते. खोटे बोलणे किती हानिकारक असू शकते हे त्यांना सहसा समजत नाही.

खोटे बोलण्याची सवय दूर करण्याचे मार्ग

१) त्वरीत सौम्य शिक्षा देणे : मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय कमी करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी सोदाहरण समजून घेऊया. समजा तुम्हाला तुमच्या मुलाच्या खोलीतून महागड्या फुलदाण्या पडल्याचा आवाज आला आणि तुम्ही खोलीत गेल्यावर तुम्हाला तुमचे मूल हातात क्रिकेटची बॅट घेतलेले दिसले. आता जर तुम्ही मुलाला ओरडून प्रश्न विचारलात की “हे कोणी केले? हे कसे घडले?" त्यामुळे मुलाला शिक्षा किती कठोर होईल हे माहीत नसल्यामुळे ते मूल खोटे बोलून पळून जाण्याचा प्रयत्न करेल. या ऐवजी जर तुम्ही थेट ती फुलदाणी आपल्या मुलानेच तोडली आहे असे स्वतःहूनच सांगून काही काळासाठी त्याचे चॉकलेट किंवा आईस्क्रीम रद्द करा. मग मुलाला त्याची शिक्षा कळेल जी फारशी गंभीर नाही, मग ते कदाचित सत्य सांगण्याचा प्रयत्न करेल.

२) स्वतःचे उदाहरण मांडणे : आपण स्वतःच जाणूनबुजून लहान-मोठ्या गोष्टींवर मुलांसमोर खोटे बोलतो. यातून मुले चुकीच्या गोष्टी शिकतात. त्यामुळे मुलांसमोर स्वतःच्या वागण्यावर लक्ष ठेवून ही सवय मुलांपर्यंत पोहचण्यापासून रोखता येते. पालकानी जाणलं पाहिजे की, त्यांच्या सर्व चांगल्या आणि वाईट सवयींचा त्यांच्या मुलांवर परिणाम होतो.

३) संवाद साधणे : खोटे बोलल्यामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल मुलाला सांगा पण त्यासाठी लाजिरवाणे शब्द आणि तसा टोन वापरू नका. तुमच्या मुलाशी त्याच्या मनात असलेल्या भीतीबद्दल बोला. त्यांना सांगा की सत्य बोलणे ही समस्या सोडवण्याची आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. खोटे बोलल्याने काही वेळासाठी संकटातून बाहेर पडण्याचा साधा सोपा मार्ग जरी उपलब्ध होत असला, तरी त्याचा भविष्यात दुष्परिणाम होऊ शकतो हे स्पष्ट करा, उदाहरणार्थ गृहपाठ पूर्ण न करण्याबद्दल खोटे बोलल्याने त्यांच्या गुणांवर परिणाम होऊ शकतो.

४) कारणे विचारणे : जर तुमचे मूल एखाद्या गोष्टीबाबत खोटं बोलत असल्यास, त्यामागील कारण काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

मुलं मोठी होत असताना ती कुणाच्या संपर्कात येतात, त्यांच्या चर्चेचे विषय काय असतात? या विषयी जागरूक राहणे, मुलांच्या संशयास्पद वर्तनावर लक्ष ठेवणे, आणि त्यांना चुकीचे पाऊल उचलण्यापासून रोखणे, हे प्रत्येक पालकाचे कर्तव्य आहे.


साधना पांडुरंग आरोंदेकर, डिचोली गोवा.