पाळी... एवढ्या कमी वयात ?

दोन महिन्याआधीच तिचे पिरियड्स चालू झालेत... पाळी दरम्यान त्रास होतोच पण तेव्हापासून गप्प गप्प, अगदीच हिरमुसल्यासारखी असते ती... खेळण्याबागडण्याच्या वयात अगदी हरवल्यासारखी वागते. तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या जीजाची आई सांगत होती...

Story: आरोग्य |
18th May, 05:16 am
पाळी... एवढ्या कमी वयात ?

मुली पौगंडावस्थेत येताना, शारीरिक बदल चालू झाले की मासिक पाळी येते. साधारणपणे मुलींमधे हे बदल साडेदहा ते अकरा वर्षांच्या दरम्यान होतात. पण हळूहळू गेल्या काही वर्षांत मुलींना मासिक पाळी येण्याचे वय खूपच अलीकडे सरकले आहे. मुलींच्या शरीरात होणारे नैसर्गिक बदल वेळेआधीच झालेले दिसत आहेत व जीजासारख्या ६ ते ९ या वयोगटातील मुलींना आताच मासिक पाळी सुरु होऊ लागलेली आहे. 

मासिक पाळी येण्याआधी मुलींच्या शरीरात हार्मोन्समुळे काही नैसर्गिक बदल घडून येतात. मुलींच्या स्तनांची वाढ व्हायला सुरुवात होते. नंतर काखेत, जननेंद्रियावर केस येतात. मग उंची वेगानं वाढायला लागते. साधारण दीड वर्षे चालू राहणाऱ्या ह्या बदलांच्या क्रमवारीनंतर जेव्हा मासिक पाळी येते, तेव्हा त्याला 'नाॅर्मल प्युबर्टी' म्हटले जाते. पण पाळी अपेक्षित वयापेक्षा लवकर आल्यास त्याला ‘अर्ली मेनार्की’ असे म्हटले जाते. ‘अर्ली मेनार्की’मध्ये शरीरात स्तनांची वाढ होणे, काखेत, जननेंद्रियावर केस वाढणे, उंची वाढणे हे बदल दिसून येण्याआधीच पाळी येऊ शकते किंवा शरीराची एकूणच लय बिघडल्यामुळे ह्या सगळ्या बदलांसोबत वयाच्या आधी मासिक पाळी येऊ शकते.

पाळी लवकर येण्याची कारणे :

१. थायराॅइडचा त्रास, पिट्युरटी ग्रंथीचे आजार, अॅड्रेनल ग्रंथी संबंधित त्रास, अंडाशयाशी निगडित आजार यासारख्या वैद्यकीय कारणांमुळे पाळी लवकर येऊ शकते.

२. बैठी जीवनशैली, शारीरिक हालचाल कमी असणे, स्थूलपणा, शरीरात फॅट्सचे प्रमाण वाढलेले असणे ही कारणेही पाळी लवकर येण्यास कारणीभूत ठरू शकतात.

३. बाहेरील पॅक्ड खाद्याचे सेवन, पर्यावरणातील बदल, प्रदूषण यामुळेही मासिक पाळी लवकर येते.

लवकर पाळी आल्यावर काय होते?

लवकर पाळी आल्यामुळे मुलींच्या शरीरातील सर्व बदल लवकर होत असतात. शरीराची सर्व यंत्रणा लवकर काम करायला लागते. यामुळे पुढे कमी वयात रक्तदाब, मधुमेह होण्याची शक्यता असते. मुलींची उंची वाढण्यास अडथळे येऊ शकतात. मासिक पाळी लवकर म्हणजेच वयाच्या ७-८ व्या वर्षीच आल्याने या परिस्थितीशी जुळवून घेण्याइतका समजूतदारपणा मुलींमध्ये आलेला नसतो. या वयात मुलींमध्ये अल्लडपणा असतो. अशावेळी याच वयोगटाच्या बाकीच्या मुली मस्त हसत, खेळत, बागडत असतात. आपण त्यांच्यासारखे नसल्याची आणि वेगळेपणाची भावना तसेच आपल्या बाॅडी इमेजबद्दल प्रश्न त्यांना सतावू शकतात. अशा स्थितीत त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो, नैराश्य येऊ शकते.

कोणती काळजी घ्यावी?

ही स्थिती टाळण्यासाठी आधीपासूनच मुलींच्या शारीरिक हालचाली जास्त होतील याकडे लक्ष द्यावे. शरीराच्या हालचाली होणारे खेळ, सायकलिंग, स्विमिंग अशा गोष्टींत त्याना रमवावे.

मुलींच्या आहाराकडे लक्ष द्यावे. वाढत्या वयात शारीरिक बदल घडत असताना त्यांना योग्य पोषण मिळणे आवश्यक असते. बाहेरील पेये व पॅकेज्ड खाद्यपदार्थ टाळावेत.

मुलींना आपले मन मोकळे करू द्यावे. घरी अगदी कडक वातावरण असल्यास, आई बाबा कामानिमित्त दिवसभर बाहेर असल्यास साहजिकच त्यांना मन मोकळे करता येत नाही किंवा जवळीक तुटल्याने मुली अशा स्थितीत एकलकोंड्या होतात, गप्प गप्प रहातात व नैराश्याच्या बळी होऊ शकतात.

टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप, सोशल मिडीयाचा अतिवापर टाळावा. मर्यादित स्क्रीन टाइम ठेवावा.

मुली ७-८ तास शांत झोपत आहेत याकडे पालकांनी लक्ष द्यावे. कमी झोपेमुळे मेंदूतील मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी मुलींनी व्यवस्थित झोप घेणं आवश्यक आहे.

अचानक पाळी सुरू झाल्यामुळे जीजासारख्या अनेक मुलींवर परिणाम होऊ शकतो. मुलींच्या शारीरिक वाढीसंबंधित बदल लवकर होत असल्याचे दिसून आल्यास, पाळी वयापेक्षा लवकर सुरू झाल्याचे आढळून आल्यास स्त्रीरोगतज्ज्ञाची भेट घेऊन त्यामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा स्थितीत आधीच मुलींना सॅनिटरी नॅपकीन वापरण्याची, विल्हेवाट लावायची, पाळी आली असताना घ्यायची काळजी आणि शारीरिक स्वच्छता याबद्दल सजग करावे. या वयात त्यांना वेळ द्यावा, त्यांना समजून घ्यावे व शारीरिक आरोग्यासोबत त्यांचे मानसिक आरोग्यही सांभाळावे.


डॉ. श्वेता राऊत मुळगावकर