दुबई : सौदी सरकार गेल्या काही वर्षांपासून क्लाऊड सीडिंगचा अवलंब करून कृत्रिम पाऊस पाडत आहे. याद्वारे नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते. पण गेल्याच महिन्यात या मुळे मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन बऱ्याच प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसानंतर सौदीत मक्का आणि मदिनाजवळील वाळवंटातील काही भाग हिरवेगार झाले आहेत. हा नजारा मक्का आणि मदिनाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्यांसाठी सुखद अनुभव ठरत आहे.
हा बदल विशेषतः पश्चिमेकडील भागांत जास्त प्रमाणात दिसून आला आहे. या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस पडला होता. जास्त पाणी, योग्य त्या प्रमाणात सूर्यप्रकाश आणि जमिनीतून उपलब्ध असलेली आवश्यक जीवनसत्वे मिळाल्याने गवत आणि इतर वनस्पतींची वाढ मोठ्याप्रमाणात झाल्याने भर वाळवंटात आता हिरवळ पसरलेली दिसत आहे. उंट आणि इतर प्राणी या हिरव्यागार चारीवर चरत असल्याचे दृश्य ठिकठिकाणी दिसत आहे.