कामरखाजनमधील बेकायदा बांधकामांची पालिकेकडून पाहणी

तीन विद्यमान नगरसेवकांच्याच नातेवाईकांच्या बांधकामांचा समावेश

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
25th April, 12:05 am
कामरखाजनमधील बेकायदा बांधकामांची पालिकेकडून पाहणी

कामरखाजन-म्हापसा येथील बेकायदा बाधकांमाची पाहणी करताना पालिका अधिकारी व कामरखाजनाचो बांध टेनंन्ट संघटनेचे पदाधिकारी. (उमेश झर्मेकर)

म्हापसा : कामरखाजन-म्हापसा येथील मलनिस्सारण प्रकल्पाजवळील खाजन शेत जमिनीत बेकायदेशिररीत्या मातीचा भराव टाकून बांधलेल्या बाधकांमाची म्हापसा पालिकेकडून पाहणी करण्यात आली. या अवैध बांधकांमामध्ये तीन विद्यमान नगरसेवकांच्या नातेवाईकांचीही बांधकामे असल्याचे यावेळी दिसून आले आहे.


नगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता शुभ आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली पालिका कर्मचाऱ्यांनी कामरखाजनमधील शेत जमिनीत बेकायदेशिररीत्या उभारलेल्या सहा-सात बांधकामांची पाहणी केली व संबंधितांना आपली कागदपत्रे पालिकेत येऊन सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी कामरखाजनाचो बांध टेनंन्टस् असोसिएशनचे अध्यक्ष स्टीफन कुतिन्हो, जॉन लोबो, बेनेड्निट आरावजो, मार्कुस डिसोझा, स्टीवन कुतिन्हो, स्टेनली ब्रागांझा, गुरुदास साखळकर, फेर्मिन आरावजो व इतर पदाधिकारी उपस्थित होते.


गेल्या दोन-तीन वर्षांपासून या ठिकाणी खाजन जमिनीत मातीचा भराव टाकून बेकायदेशीरबांधकामे सुरू असल्याच्याप्रकरणी कूळ संघटनेने म्हापसा पालिका, नगरनियोजन खाते व संबंधितांकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे बुधवारी पालिकेतर्फे ही पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी या बांधकामांपैकी काही बांधकामे ही म्हापशाच्या विद्यमान तीन नगरसेवकांच्या नातेवाईकांची असल्याचे स्पष्ट झाले आहे.


संघटनेचे माजी अध्यक्ष जॉन लोबो म्हणाले, या सर्व बांधकामांना आरोग्य कायद्यांतर्गत नळ आणि वीज जोडणी बहाल करण्यात आली आहे. म्हापसा तसेच राज्यातील अशा प्रकारच्या बेकायदा बांधकामांना त्यांच्या वैध कागदपत्रांची चौकशी व पडताळणी न करता सर्रासपणे नळ व वीज जोडणी दिली जाते. यामुळेच शेत जमिनीत अशी बेकायदा बांधकामे उभी राहतात. त्यामुळे सरकारने आरोग्य कायद्यांतर्गत मिळणाऱ्या या सुविधांवर कडक निर्बंध घालावेत. तसेच संबंधितांनी ही बेकायदा बांधकामे त्वरित पाडून जमीन पूर्वपदी आणावी, अशी मागणी त्यांनी केली.



कुळ संघटनेचे स्टीफन कुतिन्हो यांनी सांगितले. ही जागा म्हापसा शहरातील सर्वात खालचा भाग व शहरातील पावसाचे पाणी शोषून घेणारे ठिकाण आहे. सदर जमीन बुजवून त्यावर बांधकामे उभी केल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा कुठे जाणार? हे असेच राहिल्यास म्हापसा शहरही दुबईप्रमाणे बुडेल, असा दावा त्यांनी केला.



येथील अवैध बांधकाम करणारे आपणच जमिनीचे कूळ असल्याचे सांगत आहेत. परंतु, ते मूळ कूळ नाहीत. या लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्या नावे कागदपत्रांमध्ये टेनंन्ट म्हणून घुसवली आहेत. _ स्टीफन कुतिन्हो, कूळ संघटनेचे सदस्य

कामारखाजन येथील बेकायदा बांधकामांची पाहणी केली असता या बांधकामांना नळ व वीज जोडणी ना हरकत दाखल्यासह पालिकेकडून त्यांना घर क्रमांकही बहाल केला आहे. या अवैध प्रकाराबद्दल म्हापसा पालिका अधिकारीदेखील संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत.