भाजपची मदार बार्देश तालुक्यावरच

सातपैकी सहा विधानसभा मतदारंघात भाजपचे आमदार

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
05th May, 11:51 pm

म्हापसा : उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार्‍या भाजप, काँग्रेस व रिव्होल्युशनरी गोवन्स या तिन्ही राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेत गाठीभेटी घेऊन मतदारांना आपल्या उमेदवारांकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यावेळीही भाजपची बार्देशवरच मदार असल्याचे चित्र आहे.
भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक हे सलग सहाव्यांदा विजय मिळवण्याच्या हेतूने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी केंद्रीय कायदा मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप हे काँग्रेसच्या उमेदवारीवर रिंगणात आहेत. आरजी पक्षातर्फे पक्षप्रमुख तुकाराम उर्फ मनोज परब निवडणूक लढवत आहेत. शिवाय बहुजन समाज पार्टी मिलन वायंगणकर, अखिल भारतीय परिवार पार्टीतर्फे सखाराम नाईक, तर अपक्ष म्हणून थॉमस फर्नांडिस, अ‍ॅड. विशाल नाईक व शकील जमाल शेख असे आठ उमेदवार रिंगणात आहेत.
प्रचार कार्याचा आढावा घेतल्यास भाजप व काँग्रेस या दोन पक्षांमध्येच ही थेट लढत होणार असल्याची चिन्हे दिसत असून आरजी पक्षाच्या मतांवर भाजप आणि काँग्रेसचा उत्तर गोव्यातील विजय अवलंबून असेल. काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी उमेदवारी मिळण्यास उशीर होऊनही मतदारांच्या गाठीभेटी व कोपरा बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चालवला आहे. नवे व जुने पक्ष कार्यकर्ते भाईंच्या पाठीशी उभे राहिले आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा व इतर नेत्यांसह राष्ट्रीय नेते डॉ. शशी थरूर, अलका लांबा, माणिकराव ठाकरे, हर्षद शर्मा यांच्यासह इतर नेत्यांनी कोपरा बैठकांतून मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
आरजीचे आमदार विरेश बोरकर यांच्या समवेत युवा कार्यकर्त्यांच्या बळावर मनोज परब यांनी उत्तर गोव्यातील मतदारांशी गाठीभेठी घेऊन आरजीला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. इतर पाच उमेदवारांनी वैयक्तिक तसेच सोशल मिडियाच्या माध्यमातून मतदारांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे.
या लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यातील बार्देश तालुका हा सर्वांत मोठा तालुका. बार्देशसह पेडणे, सत्तरी, डिचोली, तिसवाडी व फोंडा तालुक्यातील प्रियोळ असे मिळून एकूण २० विधानसभा मतदारसंघांचा समाविष्ट आहे. बार्देशमध्ये थिवी, म्हापसा, शिवोली, साळगाव, कळंगुट, हळदोणा व पर्वरी असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. मागील तीन लोकसभा निवडणूकीचा आढावा घेतल्यास कळंगुट व हळदोणा वगळता इतर सर्व मतदारसंघ नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिलेले आहेत.
यंदा संपूर्ण उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात ५ लाख ८० हजार ५७७ मतदार आहेत. त्यातील बार्देशमधील या सातही मतदारसंघात १ लाख ६९ हजार ३३२ मतदार आहेत. तिसवाडीतील पाच मतदारसंघात १ लाख ३१ हजार ३९१, डिचोलीतील तीन मतदारसंघात ८५,९८६, सत्तरीतील दोन मतदारसंघात ६६,२३६, पेडणेतील दोन मतदारसंघात ६६,६८९ तर फोंडा तालुक्यातील प्रियोळ या मतदारसंघात ३१,२२० मतदारांचा समावेश आहे.
गत २०१४ च्या निवडणुकीवेळी बार्देश तालुक्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी सहा
भाजपकडे तर पर्वरी हा भाजप सरकारला सहकार्य केलेल्या अपक्ष आमदाराकडे होता. त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात एकही मतदारसंघ नव्हता. यावेळीही अशीच स्थिती आहे. सात पैकी एक आमदार काँग्रेसकडे तर सहा आमदार भाजपकडे आहेत.

२०१४ च्या लोकसभेत भाजपा ७६,८८० व काँग्रेसला ४३,०१४ मते मिळाली होती. भाजपला या तालुक्यातून ३३,८६६ मताधिक्य मिळाले होते. २०१९ मध्ये बार्देशमधून भाजपला ७४,०८६ तर काँग्रेसला ६३,१३१ मते मिळाली होती व भाजपाला १०,९५५ मतांची आघाडी मिळाली होती.
२००९ मध्ये भाजपाला ४७,५८३ तर काँग्रेसला ४१,९११ मते मिळाली होती व भाजपला ५,६७२ मतांची आघाडी मिळाली होती. २००९ मध्ये भाजपचे श्रीपाद नाईक हे ६३५३ मताधिक्क्यांनी विजयी झाले होते. त्यावेळी बार्देश तालुक्याने त्यांना तारले होते. त्याच्याविरोधात काँग्रेसचे जितेंद्र देशप्रभू निवडणूक रिंगणात होते.
२०१४ मध्ये काँग्रेसचे रवी नाईक यांचा श्रीपाद नाईक यांनी १ लाख ५ हजार ५९९ मतांनी पराभव केला होता. त्यावेळी भाजपला बार्देशमधून ३३,८६६ मतांची आघाडी मिळाली होती.
२०१९ मध्ये श्रीपाद नाईक यांनी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा ७९,३०९ मताधिक्क्याने पराभव केला होता. या निवडणूकीत बार्देशमधून भाजपला १०,९५५ मतांची आघाडी मिळाली होती.            

हेही वाचा