डिजिटल जाहिरातींवर ५१ दिवसांत ६५ लाखांचा खर्च

काँग्रेस पक्ष आघाडीवर : भाजप दुसऱ्या क्रमांकावर

Story: पिनाक कल्लोळी । गोवन वार्ता |
06th May, 06:00 am
डिजिटल जाहिरातींवर  ५१ दिवसांत ६५ लाखांचा खर्च

पणजी : आचारसंहिता लागू झाल्यापासून म्हणजेच १६ मार्च ते ५ मे या ५१ दिवसांत गुगल अॅड या प्लॅटफॉर्मद्वारे डिजिटल जाहिरातींवर ६५ लाख ९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. यात गुगल सर्च इंजिन, विविध संकेतस्थळे अशा ऑनलाईन माध्यमातील राजकीय पक्षांच्या जाहिरातींचा समावेश आहे. गुगल अॅडच्या गोवा विभागात गोव्यासह महाराष्ट्रातील कुडाळ, सावंतवाडी, तर कर्नाटकमधील बेळगाव, दांडेली - अंकोला ते गोकर्ण या भागांचा समावेश आहे. या विभागात राजकीय जाहिरात देण्यात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे.            

गुगल अॅडने जाहीर केलेल्या आकेवारीनुसार, १६ मार्च ते ५ मे दरम्यान विविध ऑनलाईन माध्यमात एकूण २१ हजार १९३ जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. यामध्ये व्हिडिओ, छायाचित्रे आणि लिखित संदेश किंवा टेक्स्ट असे तीन उपप्रकार करण्यात आले आहेत. या तिन्ही प्रकारांत मिळून काँग्रेस पक्षाने ४० लाख १७ हजार रुपये खर्च केले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपने २० लाख २८ हजार रुपये खर्च केले आहेत. तर अन्य खासगी कपन्यांनी राजकीय जाहिरातींवर सुमारे १९ हजार ७५० रुपये खर्च केले आहेत.            

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्चपासून लागू झाली असली तरी गोवा विभागातील बहुतेक जाहिराती या १३ एप्रिल ते ५ मे दरम्यान प्रसिद्ध झाल्या आहेत. या विभागात २९ एप्रिल रोजी सर्वाधिक ६ लाख ८३ हजार रुपयांच्या राजकीय जाहिराती देण्यात आल्या होत्या. या काळात १२ एप्रिल रोजी सर्वांत कमी म्हणजे केवळ १ हजार रुपयांच्या राजकीय जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. केवळ एप्रिल या एका महिन्यात राजकीय जाहिरातींवर ४४ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.      सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. अर्थात सर्व मतदारांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नसल्याने जाहिरातींचा वापर केला जात आहे. 

सध्याच्या डिजिटल युगात विविध डिजिटल प्लॅटफॉर्मला महत्त्व आले आहे. मोबाईल, इंटरनेट जीवनाचा आवश्यक भाग बनला आहे. या माध्यमाद्वारे एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते. हे ओळखूनच विविध राजकीय पक्ष या डिजिटल प्लॅटफॉर्मवरही जाहिराती देत आहेत.

 व्हिडिओ जाहिरातींवर जास्त भर            

गोवा विभागात विविध राजकीय पक्षांनी सर्वाधिक भर ​व्हिडिओ स्वरूपाच्या जाहिरातींवर दिला आहे. १६ मार्च ते ५ मे दरम्यान या विभागात झालेल्या एकूण खर्चापैकी ८७.१ टक्के, म्हणजेच सुमारे ५० लाख ६७ हजार रुपये व्हिडिओ जाहिरातींवर खर्च झाले आहेत. केवळ छायाचित्रे असणाऱ्या जाहिरातींवर सुमारे ८ लाख ४० हजार रुपये, तर टेक्स्ट जाहिरातींवर सुमारे २५ हजार रुपये खर्च झाला आहे. 

मेटा अॅडमध्ये भाजप पुढे

मेटा (फेसबुक) या प्लॅटफॉर्मवर जाहिराती देण्यात भाजप पुढे आहे. ३१ जानेवारी ते २९ एप्रिल २०२४ याकाळात भाजपने मेटावर १३ कोटी ४० लाख रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत. यानंतर काँग्रेसने ६ कोटी ५४ लाख रुपये, बीजू जनता दलाने १ कोटी ७० लाख रुपये, तर तृणमूल काँग्रेसने सुमारे १ कोटी ४० लाख रुपये खर्च केले आहेत.  

गुगल अॅडद्वारे संपूर्ण देशात १११ कोटी रुपयांचा खर्च            

१६ मार्च ते ५ मे दरम्यान संपूर्ण देशात विविध राजकीय पक्षांनी गुगल अॅडवर तब्बल १११ कोटी रुपयांचा खर्च केला आहे. यामध्ये ३८.८ कोटी रुपयांच्या जाहिराती देऊन भाजप आघाडीवर आहे. याखालोखाल काँग्रेस (२९.६ कोटी रु.) , वाय एस आर काँग्रेस (७.४कोटी रु.), बीजू जनता दल (३.४ कोटी रु.), तेलगू देसम पार्टी (३.३० कोटी रु.) यांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा