सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर रामदेव यांनी पुन्हा मागितली माफी

वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले मोठे माफीनामा पत्र

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
24th April, 02:17 pm
सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर रामदेव यांनी पुन्हा मागितली माफी

नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पतंजलीने वृत्तपत्रांमध्ये मोठ्या नवी जाहिराती देत मोठ्या अक्षरांत माफीनामा दिला आहे. पतंजली आयुर्वेदाचे सह-संस्थापक योगगुरू रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी आज (ता. २४) वृत्तपत्रांमध्ये हा जाहीर माफीनामा जारी केला.

सर्वोच्च न्यायालयाने काल मंगळवारी अवमान प्रकरणावर सुनावणी करताना पतंजलीला फटकारले होते. तुम्ही ज्याची जाहिरात करत आहात तेवढ्याच माफीनामाच्या आकार असतात का? तुम्ही नेहमी या आकाराची जाहिरात करता का? असे प्रश्न विचारले होते. तसेच मोठ्या अक्षरात पुन्हा माफीनामा देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार आज पुन्हा मोठ्या आकारात माफीनामा जाहीर करण्यात आला.

पतंजलीच्या नव्या माफीमध्ये काय आहे?

स्वामी रामदेव, पतंजली आणि बाळकृष्ण यांच्या नावाने वृत्तपत्रांमध्ये माफीनामा दिला आहे. पतंजलीने ‘बिनशर्त सार्वजनिक माफी’ या नावाने वृत्तपत्रांमध्ये मोठ्या आकाराचा माफीनामा प्रसिद्ध केला आहे. ‘भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्याच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सूचना/आदेशांचे पालन न केल्याबद्दल आम्ही वैयक्तिकरित्या तसेच कंपनीच्या वतीने बिनशर्त दिलगिरी व्यक्त करतो’, असे त्या जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

२२.११.२०२३ रोजी मीटिंग, पत्रकार परिषद आयोजित केल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आमच्या जाहिरातींच्या प्रकाशनात झालेल्या चुकीबद्दल आम्ही मनापासून माफी मागतो आणि अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची मनापासून वचनबद्धता व्यक्त करतो. आम्ही माननीय न्यायालयाच्या सूचनांचे अत्यंत काळजीपूर्वक आणि अत्यंत निष्ठेने पालन करण्यास वचनबद्ध आहोत. आम्ही न्यायालयाच्या वैभवाचा आदर राखण्याचे आणि लागू कायदे आणि माननीय न्यायालय/संबंधित प्राधिकरणांच्या सूचनांचे पालन करण्याचे वचन देतो, असेही त्यात नमूद केले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार आहे.